Goa Health : मडगाव येथील आके परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. तर उत्तर गोव्यात कळंगुट परिसरात डेंग्यूची लागण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
मडगाव नगरपालिका क्षेत्रातील प्रमुख लोकवस्ती असलेल्या मालभाट व पाजीफोंड या ठिकाणी चिकनगुनिया व डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण आटोक्यात येत असले तरी आके परिसरात चिकुनगुनियाचा फैलाव जोरात होत असल्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लोकांनी आपले घर व सभोवताली पाणी साचू न देण्याचे आवाहन मडगाव आरोग्य केंद्राचे डॉ. सुकूर क्वाद्रोस यांनी केले आहे. विशेष म्हणजे या जनजागृती कार्यक्रमात दारोदारी फिरून ते स्वतः लोकांना समजावत आहेत, माहिती देत आहेत.
(Chikungunya and Dengue Patients in goa)
आता आके आणि परिसरात चिकुनगुनिया रुग्णांची वाढ होत असल्याने या परिसरात आरोग्य केंद्रातर्फे औषध फवारणी करण्यात येत आहे. मडगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी त्यावर देखरेख ठेवून असून घराघरांना भेट देऊन लोकांमध्ये जागृती करीत आहेत.
मडगाव क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मधील सिनेलता, गांधी मार्केट, स्टेशन रोड, श्री हरी मंदिर या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे या काही दिवसांपासून सलगपणे औषध व धूरफवारणी करण्यात आली होती. शहरातील इतर भागांतही रुग्ण सापडत असले तरी त्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. सुकूर क्वाद्रोस यांनी सांगितले.
लोकांनी अशी घ्यावी काळजी
डासांचा फैलाव रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य तेवढेच गरजेचे आहे. फुलदाण्यांचा वापर करण्याबरोबरच टाक्या, नारळाच्या करवंट्या उघड्यावर ठेवू नयेत. पावसाचे पाणी त्यात कित्येक दिवस साचून राहिल्यास डासांची पैदास होऊन अशा रोगांना निमंत्रण दिले जाऊ शकते.
म्हणूनच आजूबाजूचा परिसर साफ व स्वच्छ ठेवावा. तसेच या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. अशा रुग्णांना मार्गदर्शन तसेच औषधीय उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. सुकूर क्वाद्रोस यांनी दिली.
कळंगुट परिसरात ‘डेंग्यू अलर्ट’ जारी
कळंगुटमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून वेक्टर-बोर्न (कीटकजन्य आजार) प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे, स्थानिकांसाठी आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत यांनी ‘डेंग्यू अलर्ट’ जारी केला आहे. तसेच ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याची आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करीत, यंत्रणेने मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना व जागृती मोहीम देखील सुरु केली आहे.
ज्या लोकांना ताप येतोय, अशांनी ताबडतोब मलेरिया, डेंग्यू आणि कोविडची मोफत तपासणी कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9ते 12 या वेळेत (सोमवार ते शनिवार) करुन घ्यावी, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे. शिवाय डासांची पैदास होऊच नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.