भाटलेतील राम मंदिराजवळ सुमारे पन्नास मीटर अंतरावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर्स घालण्यात आले आहेत. वाहनांच्या बोजामुळे पेव्हर्स उखडले जात असून, खराब न झालेला रस्ताही आता या कामामुळे खड्डेमय झाला आहे.
मळ्यातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने आणि त्यातून आमदार व महापौरांवर टीका होऊ लागल्यामुळे रस्त्यावतील खड्डे बुजवण्याचे काम मागील आठवड्यात घेण्यात आले. भाटलेतील राम मंदिरापासून ते धनलक्ष्मी सोसायटीपर्यंतचा सुमारे ५० मीटर अंतराच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर्सचा वापर करण्यात आला. पेव्हर्स घातल्याने रस्ता सुमारे एक ते सव्वा फूट उंच उचलण्यात आला. पेव्हर्स घालण्याचे काम झाले तेव्हा पावसाची विश्रांती होती; पण पाऊस पडल्यानंतर पेव्हर्स वाहनांच्या वजनांमुळे दबले गेले आणि काहींनी आपली जागाही सोडली. त्यामुळे पेव्हर्स बसविलेला रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकायदाक बनला होता.
दुसऱ्याच दिवशी रात्री याठिकाणी स्थानिक दुचाकीस्वार पडला आणि गंभीर जखमी झाला. याशिवाय काल (बुधवारी) सायंकाळी खड्ड्यांमुळे वयस्क महिला दुचाकीवरून पडल्याने जखमी झाली. रस्त्याच्या या कामाचा स्थानिक नगरसेवक उदय मडकईकर यांनी व्हिडिओ काढून कामावर प्रश्न उपस्थित केले होते.
या रस्त्याचे डांबरीकरण केलेल्या कंत्राटदारालाच पुन्हा रस्ता दुरुस्तीचे काम दिले गेले आहे. या कामावर देखरेख ठेवत आहे त्या साहाय्यक अभियंत्यास निलंबित करावे आणि काम करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे. मुख्यमंत्र्यांनी जर या कामाविषयी कारवाई करणार असल्याचे सांगितले असेल तर काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल.
भाटलेतील रस्ता डांबरीकरण केल्यानंतर तो पन्नास दिवसांत वाहून गेला. आता खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर्स घालण्याचे काम केले आणि पाच दिवसांत ते उखडून गेले आहेत. त्यामुळे या कामात किती भ्रष्टाचार झाला आहे, हे जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना शहरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष घालण्यासाठी वेळ नाही, अशी स्थिती सध्या दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.