Good News For Cancer Patients In Goa
पणजी: आरोग्य संचालनालयासह गोमेकॉ इस्पितळात येणाऱ्या रुग्णांचीही फुफ्फुस कर्करोग तपासणी केली जाणार असून प्रोटोन थेरपी केंद्र स्थापन होणार आहे. कर्करोगाचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार व औषधे सुरू करून जीव वाचवणे शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान लवकर लागून लोकांचे जीव वाचवण्यासाठी सरकारने अग्रगण्य पाऊल उचलले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा संचालनालयाने ‘ॲस्ट्राझेनेका’ व ‘क्युरे.एआय’ सोबत दोन वर्षाचा नूतनीकरण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
गेल्यावर्षी आरोग्य सेवा संचालनालयाने ॲस्ट्राझेनेका व क्युरे.एआय सोबत सामंजस्य करार एका वर्षासाठी केला होता, त्यामध्ये आणखी दोन वर्षानी वाढ करण्यात आली आहे. रेडिओलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून सार्वजनिक आरोग्य परिणामांमध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने फुफ्फुसांच्या कर्करोग शोध तपासणी केली जाणार आहे.
तसेच जीवरक्षक अौषधेही स्वस्तात मिळणार आहेत. आरोग्य संचालनालयामार्फत १७ आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची फुफ्फुस कर्करोग तपासणी केली गेली. ३३,८०६ रुग्णांची ‘एक्स-रे’द्वारे छातीची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये ३,१४४ जणांमध्ये गाठी (नोड्युल्स) आढळून आले आहेत, त्यातील १४३ जणांमध्ये गाठी ( नोड्युल्स) धोकादायक होत्या. ३९ छाती तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीवेळी भेटी दिल्या तर २० जणांच्या छाती तपासणी केली. त्यामध्ये एकजणाला फुफ्फुस कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने त्याच्यावर उपचार करणे सोपे झाले आहे. आता ही तपासणी गोमेकॉ इस्पितळामध्येही सुरू केली जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर अस्ट्राझेनेकाचे कॉर्पोरेट व राज्य व्यवहार संचालक डॉ. अजय शर्मा व किरण केशवन तर आरोग्य संचालनालयातर्फे संचालक डॉ. रुपा नाईक यांनी स्वाक्षरी केल्या. डीन डॉ. शिवानंद बांदेकर, एनसीडीसी कक्षाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहनराव देसाई, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय सरदेसाई, आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी डॉ. राजनंद देसाई, सल्लागार डॉ. गीत देशमुख, फ्रेझेला आरावजो तसेच आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आता ही तपासणी गोमेकॉ इस्पितळामध्येही सुरू केली जाणार आहे. या आजारावरील उपचारासाठी लागणारी उपकरणे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोपनीय किंमत निश्चित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडला आहे. कमी किंमतीमधील औषधे उपलब्ध करण्यासाठी काही कंपन्या पुढे येत आहे, जेणेकरून रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होईल, असे राणे यांनी सांगितले.
मंत्री राणे म्हणाले, आमचे ध्येय नेहमीच गोव्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक उपाय आणणे हे राहिले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या लवकर निदानासाठी एआय-चालित साधनांच्या यशस्वी उपलब्धतेमुळे, जलद निदान आणि अधिक प्रभावी रेफरल्सच्या बाबतीत आम्हांला खरा परिणाम दिसून येत आहे.
नवीन प्रशिक्षण मॉड्यूल
या नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारामुळे या उपक्रमाचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये स्क्रीनिंगचा विस्तार करणे, रुग्णांचा मागोवा घेणे आणि आरोग्य संचालनालयाच्या केंद्रांमधील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रशिक्षण मॉड्यूल एकत्रित करण्याची योजना आहे. आरोग्य सेवेमध्ये ‘एआय’ स्वीकारण्यात गोवा सातत्याने आघाडीवर आहे आणि भारतातील इतर राज्यांसाठी एक बेंचमार्क स्थापित करत आहे, असे ते म्हणाले.
नर्स नेव्हिगेटर्सची नियुक्ती
या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उच्च जोखीम असलेल्या रुग्णांना सातत्यपूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन प्रदान करणारे नर्स नेव्हिगेटर्सची नियुक्ती, तपासणीपासून निदानापर्यंत एंड-टू-एंड फॉलो-अप सुनिश्चित करणे त्यामुळे वेळेवर क्लिनिकल हस्तक्षेपासाठी डॉक्टर, तज्ञ आणि निदान सुविधा एकत्रित करून एक मजबूत रेफरल यंत्रणा प्रभावीपणे स्थापित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.