Goa University: पेपर चोरी प्रकरण! साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद

Goa University News: विद्यापीठातील विविध प्राध्यापकांच्या केबिनच्या नकली चाव्या बनवल्या व त्यांच्या संमतीशिवाय काही प्राध्यापकांच्या कॅबिनमध्ये अनधिकृत प्रवेश केला.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरीप्रकरणी अखेर विद्यापीठाने दिलेल्या तक्रारीवर शनिवारी (२१ मार्च) रात्री ९ वाजता आगशी पोलिसांनी भौतिकशास्त्र विभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला.

कुलसचिव एस. एन. धुरी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६(३), ३२९ (४), ३३१(३) आणि ३१८(४) नुसार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलसचिव धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. प्रणव नाईक, यांनी विद्यापीठातील विविध प्राध्यापकांच्या केबिनच्या नकली चाव्या बनवल्या व त्यांच्या संमतीशिवाय काही प्राध्यापकांच्या कॅबिनमध्ये अनधिकृत प्रवेश केला. यामुळे संबंधित प्राध्यापकांच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा भंग झाला.

तसेच, एका महिला विद्यार्थिनीच्या परीक्षेच्या मूल्यमापनात हस्तक्षेप करून अन्य विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा अतिरिक्त तपास पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर करत आहेत.सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने काम सुरू करण्याआधीच विद्यापीठातील प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी गोवा विद्यापीठाने आगशी पोलिसांत तक्रार दिली आहे.

या प्रकरणी डॉ. प्रणव नाईक यांच्या अनधिकृत व बेकायदेशीर कृतींच्या पुढील तपासासाठी प्रथम माहिती अहवाल नोंदवण्याची मागणी तक्रारीत केल्याचे विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याआधी वैयक्तिक हेवेदाव्यातून हे आरोप केले असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत होते. विद्यापीठाने दोन विभागप्रमुखांची सत्यशोधन समिती नेमली होती. त्या समितीने अहवाल सादर केल्यावर तो कुलपती या नात्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यावेळी अनधिकृतपणे रसायने काढली त्याची तोंडी तक्रार आली होती. अन्य बाबींबाबत लेखी तक्रार नाही, अशी भूमिका कुलगुरू हरिलाल मेनन यांनी घेतली होती.

विद्यापीठाच्या कार्यकारी समितीसमोर २८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीसमोर तो अहवाल सादर केला जाईल, असे सांगण्यात येत होते. कुलगुरूंना कुलपतींनी पुढील कार्यवाही काय करावी, याविषयी मार्गदर्शन केले असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. त्या अहवालात नेमके काय म्हटले आहे, याचा उल्लेख मात्र त्यांनी आजवर केलेला नाही.

विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाकडून आज पत्रक जारी करून त्या अहवालात प्रश्नपत्रिका फोडल्याचे नमूद केल्याची अप्रत्यक्ष कबुली देण्यात आली आहे. शिस्तभंगाची कारवाई काय असावी, याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरवण्यात येईल, असे स्पष्टपणे विद्यापीठाने म्हटले आहे.

विद्यापीठाने समिती नेमल्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाने गुरुवारी (ता. २०) माजी न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समिती नेमली होती. अद्याप या समितीची पहिली बैठकच झालेली नाही. असे असताना विद्यापीठाने पोलिस तक्रार करून तूर्त आघाडी घेतली आहे. काशिनाश शेटये व इतरांनी आगशी पोलिसांत तक्रार दिली होती.

त्याविषयी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याआधीची (एफआयआर) प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आता विद्यापीठानेच तक्रार दिल्याने पोलिसांना ‘एफआयआर’ नोंदवून तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यार्थिनीच्या परीक्षा मूल्यमापनात हस्तक्षेप

अहवालाच्या आधारे तक्रार

विद्यापीठाने पत्रकात म्हटले आहे, की भौतिक आणि अनुप्रयुक्त विज्ञान शाळेत कार्यरत साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांनी कथितरित्या प्रश्नपत्रिका गळती केल्याच्या प्रकरणासंदर्भात विद्यापीठाने चौकशी केली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासासाठी विद्यापीठाने एक तथ्य शोध समिती स्थापन केली होती.

या समितीने आपला प्राथमिक अहवाल विद्यापीठाला सादर केला असून, त्याआधारे विद्यापीठाने आगशी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

महिनाअखेरीस ठरणार कारवाई

याअंतर्गत डॉ. प्रणव नाईक यांच्या अनधिकृत व बेकायदेशीर कृतींच्या पुढील तपासासाठी ‘एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणावर पुढील शिस्तभंगविषयक कारवाईसाठी कार्यकारी परिषद या शिस्तभंग प्राधिकरणासमोर हा विषय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेची बैठक मार्च २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे, ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती शिस्तभंग कारवाई ठरवली जाईल.

काशिनाथ शेट्ये यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी

गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील कथित प्रश्नपत्रिका चोरीप्रकरणी एफआयआर दाखल न केल्याने माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यासह इतरांनी आता जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्याची दखल न घेतल्याने तक्रारदारांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे त्याची प्रत दिली होती. तेथेही दाद न घेतल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी पोलिसांना नोटीस बजावून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी येत्या सोमवारी (२४ मार्च) होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com