Goa Trinamool Congress :कॅसिनोंच्या व्यवहारात पारदर्शकता आणि जबाबदारी अधोरेखित करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. नियामक संस्थेच्या कमतरतेमुळे अनियंत्रित व्यवसायाचे वातावरण निर्माण होऊन त्यात बेकायदेशीरपणा येतो आणि त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर होतो, असे सांगत तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी (ता.१४) कॅसिनो व्यवसायावर नजर ठेवण्यासाठी सरकारने त्वरित गेमिंग आयोग नेमावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेस तृणमूलचे संयुक्त संयोजक मारियानो रॉड्रिग्स, समील वळवईकर आणि ‘एआयटीसी’चे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांची उपस्थिती होती.
कॅसिनोवरील २८ टक्के कर कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याच्या मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेत वळवईकर म्हणाले, भाजप सरकारच्या प्राधान्यक्रम आणि हेतूंबद्दल आता चिंता वाटू लागली आहे.
सरकारला खरोखरच कर कमी करायचा असेल तर सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणारा कर कमी करायला हवा. कॅसिनो हा श्रीमंतांसाठी आहे, समाजातील उपेक्षित घटकांना नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.
रुग्णांच्या औषधांवर कर लावला जात होता, तेव्हा भाजपच्या मंत्र्यांकडून फारसा विरोध होत नव्हता. कॅसिनोवर कर लावला की तो कमी करण्यासाठी मंत्री धावतात. कॅसिनोंच्या व्यवहारातील पारदर्शकता असावी, यासाठी गेमिंग आयोगाची नितांत गरज आहे. कॅसिनोंमध्ये पॅनकार्ड अनिवार्य नाही, त्यामुळे तेथे येणाऱ्या व्यक्तीच्या व्यवहाराची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक लोक वारंवार तेथे खेळण्यासाठी येतात.
ट्रोजन डिमेलो, ‘एआयटीसी’चे राष्ट्रीय प्रवक्ते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.