Grain Scam |Goa News
Grain Scam |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: धान्यचोरी सरकारी गोदामांतूनच; पोलिसांच्या दाव्यामुळे खळबळ

दैनिक गोमन्तक

Goa News: गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धान्यचोरी प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर नागरी पुरवठा खाते आणि पोलिस यांच्यात जप्त केलेला साठा कोणाचा, यावरून बराच गोंधळ उडाला होता. दोन दिवसांनंतर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी नागरी पुरवठा खात्याला क्लिन चीट देत धान्य दुकानदारांकडे बोट केले होते.

मात्र, जप्त केलेले धान्य हे सरकारी गोदामातीलच असल्याचा दावा पोलिसांनी केला असून कागदोपत्री तशी नोंदही केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नागरी पुरवठा खात्याला अभय देण्याचा प्रयत्न फोल ठरणार आहे.

जप्त केलेला धान्यसाठा हा नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातूनच गायब केला असून या कट-कारस्थानामध्ये गुंतलेल्यांचा शोध घेण्यासाठी मुख्य सूत्रधार सचिन बोरकर याच्या पोलिस कोठडीची आवश्‍यकता असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या उत्तरात केला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री नागरी पुरवठा खात्याची पाठराखण करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून धान्यसाठा चोरीला गेला नाही, असे सरकारी अधिकाऱ्यांचे मत असले तरी या काळ्या बाजारामध्ये स्वस्त धान्य दुकानमालक, नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील व कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच हा साठा खरेदी करणाऱ्या दलालांचे मोठे रॅकेट असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

कुर्टी-नागझर येथे सचिन बोरकर याच्या गोदामावर छापा टाकला, तेव्हा त्याच्या मालकीच्या कर्नाटक नोंदणी असलेल्या ट्रकमध्ये तांदूळ व गव्हाची पोती भरण्याचे काम सुरू होते. या गोदामातून 77 तांदळाची पोती जप्त केली होती. संशयिताने भाड्याची वाहने घेऊन सांगे, फोंडा व पणजीतील नागरी पुरवठा गोदामातून धान्यसाठा उचलला होता.

संशयित प्रकाश कोरीशेट्टर याला बोरकर हा धान्याची प्रतिकिलो 18 रुपये याप्रमाणे विक्री करत होता. अनेकदा त्याने हा धान्यसाठा विक्री केला आहे. प्रत्येक वेळी बोरकर त्याला किमान 10 टन धान्याचा पुरवठा करत होता व तो विविध गोदामांतून स्वतःच्या ट्रकमधून कर्नाटकला धान्य पाठवत होता. त्यामुळे या प्रकरणाची उकल करण्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे. त्यामुळे बोरकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, अशी विनंती क्राईम ब्रँचने न्यायालयाला केली आहे.

अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी

धान्यसाठा काळाबाजार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन बोरकर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी पोलिसांकडून उत्तर देण्यास विलंब झाल्याने आज ही सुनावणी होऊ शकली नाही. ती आता सोमवार, 21 रोजी ठेवली आहे. या प्रकरणातील संशयित वीरेंद्र म्हार्दोळकर याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीही 21 रोजी होणार आहे.

न्यायाधीशांमार्फत चौकशी करा : कॉंग्रेस

लोकांसाठी आणलेले स्वस्त धान्य परस्पर कर्नाटकच्या व्यापाऱ्यांना विकणाऱ्या नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच त्यांचे मंत्री पाठीशी घालत आहेत असा आरोप विरोधकांनी केला असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत नागरी पुरवठा खात्याच्या 2020 पासूनच्या कामाचा पूर्ण लेखाजोखा तपासावा, अशी मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

खात्याच्या वाहनांना ‘जीपीएस’ : पण बायोमेट्रिक यंत्रणा कुचकामी

नागरी पुरवठा खात्यातील धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या वाहनातून नेत असल्याने हा काळाबाजार होतो. तो रोखण्यासाठी सरकारने जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनातूनच तो पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी खात्याने निविदाही काढली आहे. जीपीएस वाहनांमुळे धान्यसाठा दुकानदारांना त्यांच्या दुकानापर्यंत पोच मिळणार आहे. मात्र, या दुकानदारांकडून होणाऱ्या काळ्या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली बायोमेट्रिक यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

ट्रकचालकाच्या जबानीतून ‘सत्य’ उघड; बोरकरच मुख्य सूत्रधार

ट्रकचालक राजकुमार याने दिलेल्या जबानीत संशयित सचिन नाईक यानेच आपल्याला कुठ्ठाळ्ळी गोदामातून ट्रकमध्ये धान्यसाठा भरण्यासाठी नेले होते, असे सांगितले.

त्यामुळे या प्रकरणामध्ये संशयित बोरकर हा मुख्य सूत्रधार असल्याने त्याची कोठडी महत्त्वाची आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरी पुरवठा खात्याला दिलेल्या क्लिन चीटबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

... तर नागरी पुरवठा खाते गोत्यात :

क्राईम ब्रँचच्या पथकाने गुरुवारी कुठ्ठाळी येथील खात्याच्या गोदामातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यातून कुंडई येथे जप्त केलेल्या ट्रकमधील पोती कुठ्ठाळ्ळीतील गोदामातूनच भरल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे बोरकर याने कोणाच्या निर्देशावरून ही पोती भरण्यास परवानगी घेतली, याचीही माहिती पोलिस मिळवत आहेत. या माहितीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्यास नागरी पुरवठा खाते पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे.

"क्राईम ब्रँचने धान्यसाठा जप्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर फोंडा, सांगे, कुठ्ठाळी तसेच पणजीतील गोदामांतील धान्य साठ्याच्या वितरणाची तसेच शिल्लक मालाची माहिती मागवली होती. पोलिसांनी जप्त केलेले धान्य हे सरकारी गोदामांमधील नाही. त्याची सविस्तर माहिती आम्ही पडताळून पाहिली आहे."

- गोपाळ पार्सेकर, संचालक, नागरी पुरवठा खाते.

"धान्य घोटाळा प्रकरणात भाजपशी लागेबांधे असलेल्या बड्या नेत्यांचा हात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कोंबडा झाकला तरी सकाळी आरवतोच. या प्रकरणामुळे भाजपची लक्तरे वेशीवर लटकली आहेत. जनताच त्यांना धडा शिकवेल."

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT