शेवटी हाती नारळ
कला अकादमीच्या नूतनीकरणात झालेल्या घोळाबाबत तसेच तेथील दुरवस्थेबाबत कला संस्कृती खात्याचा मंत्री या नात्याने जाब विचारला असता, गोविंद गावडे यांनी कलाकारांचा अपमान केला. तसेच ते उद्धटपणाने बोलत राहिले. कलाकारांना सुपारीबाज म्हटल्यानंतर त्यांनी गावडेंनाच ‘सुपारी’ देण्याचाही आंदोलनरूपी यत्न केला. त्यामुळे गोविंद गावडे यांना पदच्युत केल्यानंतर कलाकारांना आनंद होणे स्वाभाविकच होते. तो आनंद त्यांनी समाजमाध्यमांवर वरील छायाचित्र पोस्ट करून व्यक्त केला. या बोलक्या छायाचित्रात गावडेंच्या हाती नारळ दिल्याचे आणि कपाळावर आठ्याही पडल्याचे स्पष्ट दिसते. इतकेच नव्हे, तर नारळांची शकलेही हसताहेत.
गावडेंच्या नाटकावर पडदा
आपल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले गोविंद गावडे यांना अखेर मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. माजी कला आणि संस्कृती मंत्री म्हणून गोविंद गावडे ‘हटविले मंत्रिपद, अजूनही कला माझीच!’ असे सांस्कृतिक पथनाट्य सादर करणार का, याविषयी उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला, त्यावेळी डॉ. प्रमोद सावंत साखळीच्या रंगमंचावर भजनात तल्लीन होते, हा एक वेगळा योगायोग. गोविंद गावडे मात्र ''संस्कृती''तून उतरून थेट ‘संकट’कृतीत उतरलेत! खाल्ले सरकारचे, आणि भजन गायले कोणाचे? अशी खोचक विचारणा यानिमित्ताने होऊ लागलीय. गावडे यांच्या वादग्रस्त विधानांनी गाजवणारा मंत्रिपदाच्या राजकारणाचा पडदा अखेर खाली पडला. पडदा पाडा, पडदा पाडा, असे हाकारे ऐकू येत असतानाही, त्यांची स्टेज सोडायची तयारी नव्हती. काहीही म्हणा, ‘नाट्यशास्त्र’ हातात असलेला हा मंत्री अखेर स्वतःच नाट्य झाला. ‘कला माझी आहे, सरकार कोणाचेही असो!’ असे म्हणत आता गावडे बिनधास्त वावरणार का? भजनात रंगलेले मुख्यमंत्री आणि गाजावाजा संपलेला मंत्री. ही गोष्ट ‘सांस्कृतिक’ आहे की ‘राजकीय उपहास’? ठरवा तुम्हीच!
…उद्या वारीला गोविंदा येणार?
माशेलातून आषाढी एकादशीनिमित्त पूर्वी एकच पायीवारी निघत होती, पण अलीकडे त्यात दोन गट झाले, एका विठुरायांच्या दर्शनासाठी दोन गट वेगवगेळ्या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करू लागले, एका गटाला पांडुरंगाच्या शुभेच्छा आणि दुसऱ्या गटाला गोविंदाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटू दिल्या जातात. १७ रोजी एक गटाची वारी सुरू झाली, त्याला पांडुरंग ढवळीकरांनी शुभेच्छा दिल्या, सोबत काही वेळ ते वारीत फिरले, भजनही गायिले. पण उद्या २० रोजी गोविंदा शुभेच्छा द्यायला येणार का? या बाबत माशेल पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
मास्टर प्लॅनवर माजणार रण?
मडगावच्या विकासासाठी एक मास्टर प्लॅन हवा, अशी मागणी मागची कित्येक वर्षे होत असताना सध्या अशा तऱ्हेचा एक आराखडा ‘जीसुडा’ने तयार केला असून आज या आराखड्यावर चर्चाही ठेवण्यात आली आहे. मात्र, या आराखड्याला आतापासूनच विरोध होऊ लागला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय सरदेसाई यांनी गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सार्वजनिक प्रकल्पांसाठी वापरुन ते खासगी विकसकाच्या घशात घालण्याचे हे कारस्थान असे म्हटले आहे. इतर स्तरांतूनही या आराखड्याला विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे आज जेव्हा हा आराखडा चर्चेत येणार, तेव्हा मोठे रण तर माजणार नाही ना? अशी शंका बरेच शंकासुर व्यक्त करू लागले आहेत.
टीका गुलाब फुलासारखी हातात
कुठ्ठाळीचे आमदार आंतोनिओ वाझ विधानसभेत फार मोजकेपणाने बोलतात. कृतीवर त्यांचा जास्त भर असतो. त्यांना मात्र अलीकडे मोठे प्रमाणपत्र मिळाले आहे. ते टीका सकारात्मकपणे घेतात. आता हे आम्ही नाही म्हणत, तर हे मोठे प्रमाणपत्र दिले आहे सामाजिक कार्यकर्ते नारायण नाईक यांनी. हो, तेच, ज्यांच्या एका वक्तव्याने बरेच जण पाण्याच्या बाटल्या शोधू लागतात! सामाजिक कार्यकर्ते, पण थेट बोलायला अजिबात संकोच न करणारे! आता नारायण नाईक यांनी जर एखाद्याला ‘भल्याभल्यांना घाम फोडतो’ म्हणत सर्टिफिकेटच दिलं, तर समजून घ्या, आमदार वाझ साहेब कुठे कुठे घाम पुसत असतील! राजकारणात एवढे सकारात्मक मनोवृत्तीचे उदाहरण शोधायला गेलात, तर बहुतेक वेळा किंवा बहुतेक ठिकाणी फक्त ''नकारात्मक'' अनुभव येतात, पण आमदार वाझ मात्र टीकेच्या फुलांना हारात गुंफतात... आणि मग त्याच हाराने दुसऱ्यांनाच चिमटे घेतात! एकंदरीत, वाझ यांना टीका आवडते, सन्मानाने घेतात, आणि मग तिचं रूपांतर बॅनर, भाषण आणि मुलाखतीत करतात. नारायण नाईकांचे प्रमाणपत्र त्यांच्या खिशात, आणि ‘सकारात्मक टीकेचा’ बिल्ला छातीवर!
प्रियोळात अनेकांचे ‘हौसले बुलंद’?
गोविंद गावडेना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याची बातमी पसरल्यावर प्रियोळात अनेकांचे हौसले बुलंद होऊ लागलेत. आता मंत्रिपदावरून दूर केल्यानंतर गावडे ना भाजपची उमेदवारीही मिळणार नाही, अशी अटकळ बांधायला लगेच सुरुवात झाली आहे. आणि सोशल मीडियावरुन ही अटकळ व्हायरलही झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संदीप निगळ्येबरोबर अनेक इच्छुकांच्या भाजपची उमेदवारी मिळण्याच्या आशांना पालवी फुटू लागली आहे. तशी चर्चा प्रियोळबरोबर फोंड्यातही सुरू झाली आहे. या बाबतीत दिल्ली अजून थोडी दूर असली तरी शेवटी ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ हेही तेवढेच खरे आहे नाही का?
सोमवारीच फटाक्यांची खरेदी!
प्रियोळ मतदारसंघात काहींनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारीच फटाक्याची खरेदी केली होती, कोपऱ्या कोपऱ्यावर फटाक्यांचा धमाका करण्यात आला. एका मंत्र्यांला हटविले तर लाखो रुपयांचे फटाके फोडले जातात, तेही भविष्यवाणींनुसार दोन दिवसांपूर्वीच फटाके खरेदी केले जातात आणि क्रांतिदिनी आनंदोत्सव साजरा केला जातो, धन्य हे प्रियोळकर.
‘काणकोणातील’ अशीही मागणी!
काणकोणातील नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एक याचिका सादर केली आहे. मुद्दा असा की – "आधी व्यवस्था करा, मग परवाने द्या!" म्हणजे, आधी गटार, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा, वीज, रस्ते... सगळी सुखसोय उभी करा, मगच मोठमोठ्या हॉटेल्स आणि इमारतींचे स्वागत करा. अहो, हे काय विचित्र मागणी झाली! सरकारी नियोजनाचा हा अपमान आहे की काय? सध्या तर उलट पद्धत आहे, आधी परवाने, मग पाणी! आधी प्रकल्प, मग प्रवाह! आणि शेवटी, लोकांची आरडाओरड सुरू झाली की कुठे तरी एक शौचालय किंवा एक अर्धवट गटार उभे करायचे. या याचिकेचे खरेतर एक वेगळेच नाव ठेवले पाहिजे – ‘स्वप्नातला नगररचना विभाग’! असं कोणी म्हणालेच तर परवाने वाटणारे यंत्रणावाले चकितच होतील. कारण त्यांच्या दृष्टीने ‘बांधकाम आधी- बेसिक गरजा पुढे’ हेच धोरण तर विकासाचे गुढ तत्त्वज्ञान आहे.
दामू रवीला विसरले?
विजय सरदेसाई यांच्या वाढदिनी झालेल्या साेहळ्यात पूर्वी भाजप सरकारात मंत्री असलेले दयानंद मांद्रेकर आणि किरण कांदोळकर यांनी सरदेसाई यांचा बहुजनांचा कैवारी असा उल्लेख करतानाच विजय हे प्रति मनोहर पर्रीकर, असे म्हटले. या ज्येष्ठ नेत्यांचे हे उद्गार भाजप कार्यकारिणीला झोंबले नसतील तरच ते नवल. या वक्तव्याचा समाचार घेताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बहुजनांचे कैवारी जर कुणाला म्हणायचे असेल तर ते भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांनाच म्हणावे लागेल, असे स्पष्टीकरण दिले. मात्र असे म्हणताना, भंडारी समाजासाठी आतापर्यंत मोठे काम केलेले रवी नाईक यांचे नाव घेण्यास ते विसरले. आता दामूने हे अनवधानाने केले की मुद्दामहून? हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण सध्या काही भंडारी नेत्यात याबद्दल चर्चा मात्र सुरू झाली आहे, हे मात्र नक्की. समाज कार्यकर्ते राजेश दाभोलकर यांनीही समाजमाध्यमावर तीच मल्लीनाथी करत भाजपला रवी नाईक यांची आठवण करून दिली आहे.
गोमेकॉत ‘आॅडिट’?
गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील कार्डिओथोरासिक युनिटमध्ये मृत्यूदर वाढल्याने गोवा सरकार आता त्याचं अंतर्गत ‘आॅडिट’ करणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. काहीजण तर हे कोणाच्या तरी दबावामुळे किंवा युनिटची बदनामी करण्याच्या उद्देशाने केलं जात असल्याची चर्चा करताहेत. निवडणुकीच्या तोंडावर किंवा विशिष्ट व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी हे पाऊल उचललं जातंय का, अशी शंकाही काहींना आहे. हे ‘आॅडिट’ काही डॉक्टर्सना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी केलं जातंय का, अशीही चर्चा आहे. कुणाची तरी पदोन्नती रोखण्यासाठी किंवा बदलीसाठी ही खेळी असू शकते, असंही बोललं जातंय. आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वीरेशराव आधी समस्यांवर प्रकाश टाका!
सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संकेतस्थळ’ सुरू केल्याची माहिती ‘आरजीपी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी दिली. वीरेशने आपली कामे प्रकाशात आणण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले, ही चांगली गोष्ट केली. परंतु सध्या आजोशी – मंडूर पंचायतीचा वाद झाला असून एकाच दिवशी ताबा प्रमाणपत्र देण्याचा विषय बराच गाजला. एवढा महत्त्वाचा विषय वीरेशरावांच्या नजरेतून कसा काय सुटला. त्याशिवाय रस्ता पिलार ते आजोशी रस्ता अर्धाच हॉटमिक्स केला गेला. अशा असंख्य गोष्टींवर विरेश यांनी प्रकाश टाकावा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा सांतआंद्रेतून ऐकू येते.
निमंत्रणपत्रिका अन् चर्चा....
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा १८ जून रोजी, वाढदिन साजरा झाला. त्यानिमित्त बुधवारी लोबोंच्या निवासस्थानी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वाढदिनाच्या पूर्वसंध्येला एक माजी नगरसेवक या स्नेहसंमेलनाची निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर म्हणजे, अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड करून आग्रहाचे निमंत्रण देत होता. हा नगरसेवक म्हापसा पालिकेचा माजी नगरसेवक. या नगरसेवकाला म्हापशाचे प्रतिनिधित्व करण्याची राजकीय मनीषा आहे! सध्या सक्रिय राजकारणात नसले तरी, अंतर्गत ते बरेच सक्रिय आहेत. तसेच लोबोंच्या जवळच्या यादीत त्यांची गणना होते. सध्या म्हापशात पुन्हा आपला उगम व्हावा, कदाचित याकरिता लोबोंचा हात धरून ते म्हापशात पुनरागमन करू पाहत आहेत, अशी राजकीय चर्चा आहे. आता या महत्त्वाकांक्षी नेत्याला यश मिळते की नाही, हे येणाऱ्या काळात समजेल. परंतु, २०२७च्या विधानसभा निवडणुकीवेळी हे माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिल्यास कोणालाच आश्चर्य वाटणार नाही.
व्हॉटसअॅपवर स्टेटस बदलले
गावडेंना हटविल्याची वार्ता समजताच प्रियोळात अनेकांनी संध्याकाळी क्रांतिदिनाचा नारा दिला. मुख्यमंत्र्यांनी गोविंदाला हटवून क्रांती केली, म्हणून काहींनी सत्यमेव जयते, म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. तेही व्हॉटसअॅपवर स्टेटसवर... हा गावडेंबाबतचा विरोध की क्रांतीची सुरवात? याचे उत्तर प्रियोळकर आगामी काळात देण्याची शक्यता आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.