ईश्वराची साथ सगळ्यांनाच हवी असते. चांगले करणारेही देवाची भक्ती करतात आणि वाईट मार्गाने चालणारेही देवाचा धावा करतात. आपल्या राजकारण्याच्या गणेश भक्तीला आलेला भक्तीचा महापूर आपण सगळ्यांनी पाहिला. काही राजकारण्यांनी आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी चवथीचे वजे दिले. काही राजकारण्यांनी मतदारांना चवथीची माटोळी पाठवून दिली. काही राजकारण्यांनी मिठाई, करंज्या व मोदकांची भेट दिली. बहुतांश राजकारण्यांनी आपल्या मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ मोठे बॅनर व होर्डिंग्ज लावली. काही जणांनी आपल्याला मंत्रिपद मिळावे, म्हणून मुख्यमंत्र्याच्या घरी घुमट वाजविले. काही मंत्र्यांनी व आमदारांनी बेताल का होईना घुमटावर हात मारला. गणेश कृपेने ज्यांना राजकारणात बढती मिळाली, त्यांनी गणेशाचे भव्य स्वागत केले आणि ज्यांच्याकडे मंत्रिपद येता येता राहिले, त्यांनी गणेशाकडे गाऱ्हाणे घालून आपली मनोकामना पूर्ण होण्याची कामना केली. एक मात्र खरे आपल्या राजकारण्यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. ∙∙∙
गणपती विसर्जन आधी गाऱ्हाणे घातले जाते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही आपल्या वाड्यावरील गणपती समोर गाऱ्हाणे घातले. तसे बघितले तर दरवर्षी दामूबाब वाड्यावरील गणराया पुढे गाऱ्हाणे घालत होता. मात्र यावर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाल्याने या गाऱ्हाण्यालाही ग्लॅमर प्राप्त झाले होते. सोशल मीडियाचा जमाना असल्याने कुठल्याही गोष्टी आता ‘कॅच’ होत असतात. दामूचे गाऱ्हाणेबाबतही तसेच झाले. सर्वांचे चांगले होवो, असे सांगत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा संदेश दामूने सर्वांना दिला. सोशल मीडियावर त्याला चांगले कॉमेंट्सही मिळाले. दामू सर हे सर्व बघून आतून नक्कीच सुखावले असतील याबाबत दुमत नसावे. ∙∙∙
गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवसांत राज्यातील सर्व खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, ही ग्वाही हवेत विरली असेच दिसते. कारण गुरुवारी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला, तरी खड्डे जैसे थे आहेत. म्हापसा शहरातील अधिकतर ‘श्री’मूर्तींना तारीकडे म्हणजे म्हापसा नदीच्या पात्रात विसर्जित केले जाते. हा म्हापसा मार्केट परिसरातील रस्त्याची खराब स्थिती आहे. त्यामुळे लोक सध्या सरकार तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने बोट मोडत आहेत. तरीही प्रशासनाला लोकांच्या त्रासाचे कोणतेच सोयरसुतक पडलेले दिसत नाही. शेवटी राजकीय घोषणा व आश्वासने कधी सत्यात उतरत नसतात, हे काही उगाच बोलले जात नाही... ∙∙∙
कुठल्याही उत्सवाचा फायदा कसा करून घ्यावा, हे राजकारण्यांकडून शिकावे. सध्या चतुर्थीचा माहोल सुरू आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आपले फोटो मोठे व श्री गणेशाचे फोटो लहान अशा प्रकारात चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मोठे फलक लावलेले दिसतात. हे फलक पाहिले की, हे राजकारणी मोठे व श्री गणेशाचे महत्त्व नगण्य असा भास झाल्या शिवाय रहात नाही. राजकारणात मुरलेले व नवोदित राजकारणी सुद्धा चतुर्थीचा फायदा घेत आहेत, जे कधी कुणाच्या घरी जात नाहीत, ते मुद्दाम आपल्या मतदारसंघातील काही घरांना भेटी देऊन चतुर्थीच्या शुभेच्छा देताना दिसतात. काही जणांनी कधीही ढोल, तासा, ताळ वाजवलेला नसेल पण हे राजकारणी गणेशा समोर बसून ही वाद्ये वाजवत आरती म्हणताना दिसतात. एवढेच नव्हे, तर हे सर्व करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअप, इनस्टाग्रामवरुन व्हायरल करायला ते विसरत नाहीत. आता निवडणुका जवळ असल्याने या प्रकारांना आता ऊतच येणार आहे. लोक मात्र त्यामुळे फसले जाऊ नये, म्हणजे मिळवले. ∙∙∙
मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे गणेशोत्सवाचे फ्लेक्स शहरभर झळकले आहेत. मोठ्या उंचीचे हे फ्लेक्स नसले, तरी लहान आकारातील तयार करण्यात आलेले फ्लेक्स नजरेस पडत आहेत. विशेष बाब म्हणजे मळ्यात सध्या एका इच्छुक उमेदवाराने म्हणजेच महानगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याने फलक लावले आहेत. शहरात बॅनरबाजी सुरू आहे. ज्या प्रभागात आणि इतर ठिकाणी फलक लावले आहेत, त्यामुळे सत्ताधारी बाबूश गटातील असलेल्या नगरसेवकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यांनी याविषयीच्या तक्रारी आमदारांपर्यंत नेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवाचे निमित्त शोधून आपली एकप्रकारे उमेदवारीच जाहीर केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मळ्यात ज्या महिला नगरसेवकाच्या प्रभागात या इच्छुकाने फलक लावले आहेत, त्या महिला नगरसेवकाने आपला राग अनेकांसमोर व्यक्त केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूक काळात बाबूश या इच्छुकाला उमेदवारी देणार काय? हे त्यावेळी कळेलच. ∙∙∙
‘‘भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है।’’ असे आता दक्षिणेतील एसटी समाजातील लोक म्हणायला लागले आहेत. रमेश तवडकर यांच्याकडे ट्रायबल खाते आल्यामुळे आता एसटी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण होणार असा आशावाद दक्षिणेतील एसटी व्यक्त करायला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खाते रमेश तवडकर यांच्याकडे सुपूर्द करून तवडकर यांच्यावर विश्वास दाखवून तवडकरांचे वजन वाढविण्याचा दावा रमेश समर्थक करतात. गोविंद गावडे यांच्याकडील महत्त्वाची खाती रमेश तवडकर यांच्याकडे आल्यामुळे काणकोणकर खूश आहेतच. आता काणकोणात क्रिकेट स्टेडियम होण्यापासून. कोणीही अडवू शकत नाही, असे काणकोणकर अभिमानाने सांगायला लागले आहेत. आता पाहूया तवडकर गोविंदाला सक्षम पर्याय सिद्ध होतात की नाही. ∙∙∙
‘कष्ट्याक पेज आणि न्हिदतल्याक शीत’ अशी कोकणीत एक म्हण आहे. समाजकल्याण मंत्री व सांगेचे आमदार सुभाष फळ देसाई यांना मुख्यमंत्र्याचे ‘ब्ल्यू आय बॉय’ हे बिरुद दक्षिणेतील विरोधकांनी दिले आहे. मुख्यमंत्री आपल्या मित्राला मंत्रिपद बदलाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम खाते किंवा पर्यावरण खाते देणार असा कयास होता. मुख्यमंत्र्यांनी सुभाष फळदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम खात्यातून वेगळे केलेले पेय जल खाते देऊन तोंडाला पाणी लावले असे सुभाष समर्थक म्हणायला लागले आहेत. काही का असेना सुभाषला तूर्त दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार... ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.