पणजी: ‘आप’ने (AAP) रविवारी (Sunday) राज्यात (Goa) विविध ठिकाणी एकाचवेळी 80 सभा घेतल्या. या सभांमध्ये सुमारे 5 हजार तरूणांनी प्रतिसाद देत नोंदणी केल्याची माहिती ‘आप’चे राज्य संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांनी दिली. भाजपच्या (BJP) फसव्या अश्वासनांना गोवेकर कंटाळल्याचे हे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रोजगार हमी योजना घराघरांत पोहोचविण्यासाठी ‘आप’कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल रविवारी राज्याच्या विविध भागात पेडणे ते काणकोणपर्यंत एकाचवेळी 80 सभा आयोजित केल्या होत्या. या सभांमध्ये 200 नेत्यांनी मार्गदर्शन केले. या सभांमध्ये भाग घेतलेल्या 5 हजार तरूणांपैकी 90 टक्के तरूणांनी रोजगार हमी अश्वासनाला पाठिंबा दर्शविला.
‘आप’ने 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे सर्वप्रथम आश्वासन दिले आहे. आता त्यानंतर बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. सत्ताधारी आपल्या ओळखीच्या व वशिल्याद्वारे नोकऱ्या देत असल्याचा आरोप ‘आप’कडून केला जात आहे. तशी बॅनरबाजीही त्यांनी सुरू केली आहे.
भाजपने गोमंतकीयांना केवळ गृहीत धरले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे ‘सरकार तुमच्या दारी’ म्हणत फिरत आहेत. पाच वर्षे ते झोपले होते का? हे सरकार गोवेकरांचे काही भले करू शकत नाही.
-महादेव नाईक, ‘आप’चे उपाध्यक्ष
आम्ही गोवेकरांच्या समस्यांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे लोकांना सामोरे जाताना त्यांच्या समस्यांबाबत अचूक मार्गदर्शन आमचे नेते करीत आहेत. सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता आता केवळ ‘आप’ हा एकमेव पर्याय आहे, हे सिद्ध झाले आहे.
- राहुल म्हांबरे, ‘आप’चे राज्य संयोजक
बेरोजगारांवर उपासमारीचे संकट
टाळेबंदीमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मये, डिचोली आणि साखळी या खाणपट्ट्यात खाणी सुरू न झाल्याने अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवल्याच्या प्रतिक्रिया यावेळी सभांमध्ये उमटल्या. पर्यटनप्रवण बाणावली आणि कळंगुट परिसरात कोविड महामारीमुळे अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.