Goa Drugs Connection Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ‘ताळगाव’ ड्रग्जच्या विळख्यात; युवा पिढीबाबत चिंता

एक समाजकंटक सूत्रधार असल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

Taleigao Drugs Connection: राज्यातील किनारपट्टी परिसरातील ड्रग्ज व्यवसायातील दलाल तसेच विक्रेते हे आता तिसवाडीतील ताळगाव, मेरशी, चिंबल व सांताक्रुझ या परिसरापर्यंत पोहोचले आहेत. ताळगावातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी जात आहे.

या ड्रग्जचा फैलाव या परिसरात करण्यामध्ये एका राजकारण्याशी जवळीक तसेच गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेल्या एका समाजकंटकाचा हात आहे.

या परिसरातील युवा पिढीला जाळ्यात ओढण्यात येत असून रात्री उशिरा या परिसरात अनेक ठिकाणी ड्रग्ज विक्रीचे प्रकार सर्रास होत असतानाही पोलिसांकडून मात्र त्याकडे काणाडोळा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यात ड्रग्ज विक्री करणारे काही दलाल काही हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचले आहेत. त्यातील कर्मचारी वर्गच या ड्रग्ज विक्री प्रकरणात गुंतले आहेत.

काही शाळांच्या आवाराबाहेर ड्रग्जच्या आहारी गेलेले तरुण नशा करताना दिसतात. त्यातून काहीजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. सांताक्रुझ येथील समाजकंटकांचा हा ड्रग्ज मेरशी व चिंबल या परिसरात आणण्यामध्ये मोठा हात आहे.

मेरशी व चिंबल तसेच सांताक्रुझ येथील परिसरात शालेय मुलेही गांजासारख्या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहेत. हल्लीच काही दिवसांपूर्वी ताळगावातील एका हायस्कूलच्या बाहेर दिवसाढवळ्या पाच किलो गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमलीपदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली होती.

तर कांपाल येथे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या नशेबाज अल्पवयीन तरुणांच्या गटात ड्रग्जमुळे पूर्ववैमनस्य निर्माण होऊन त्यांच्यातीलच एका अल्पवयीनाला बेदम मारहाण झाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस राजधानी पणजीच्या बाजूला असलेल्या ताळगावातही ड्रग्जचा सुळसुळाट आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी तिसवाडी तालुक्यात ड्रग्जच्या पाच प्रकरणांची नोंद झाली आहे व त्यामधून गांजा जप्त करण्यात आला आहे.

काही वर्षापूर्वी व्हडलेक्षाट-ताळगाव येथे राहत असलेल्या वृद्धाला स्कूटरवरून १० किलो गांजा घेऊन जाताना पणजी पोलिसांनी अटक केली होती.

त्यामुळे ताळगावात गांजा विक्री ही अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याकडे पोलिसांकडून डोळेझाक झाल्यानेच या व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळत आहे.

ड्रग्ज दलालांचा सुळसुळाट

माजी महापौर उदय मडकईकर यांनी कांपाल येथील पाईपमध्ये वास्तव्य करून राहत असलेल्या फेरीवाल्यांचा पर्दाफाश करताना त्यांच्याकडून पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता.

पणजी शहरात फुगे व इतर साहित्य विकणारे फेरीवाले या गांजा विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांचा ड्रग्ज दलालांशी संबंध असून हे दलाल त्यांची ड्रग्ज विक्रीसाठी मदत घेत असल्याचे दिसून येत आहे.

गोव्यातही गांजाची लागवड

गोव्यात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड चोरट्या मार्गाने सुरू आहे. काहींनी भाडेपट्टीवर घेतलेल्या फ्लॅटमध्ये तरी काहींनी भाडेपट्टीवर घेतलेल्या व्हिलाच्या परिसरात कुंपण करून ही लागवड केली आहे.

त्यामध्ये अधिक तर विदेशी नागरिक गुंतले असल्याचे पोलिसांनी केलेल्या छापेमारीवरून समोर आले आहे. अधिककरून किनारी भागात गांजा सहज उपलब्ध होतो.

सहज मिळतात ड्रग्ज

राज्यातील जिल्हा पोलिस, क्राईम ब्रँच, अमलीपदार्थविरोधी कक्ष तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी ड्रग्ज दलाल व विक्रेत्यांविरोधात कारवाई करत असले तरी गोव्याती ड्रग्जची उलाढाल कोट्यवधीची आहे.

किनारपट्टी परिसरात तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये ड्रग्ज पर्यटकांना उपलब्ध होऊ लागले आहेत. गोव्यात रस्ता मार्गाने मोठ्या प्रमाणात गांजा पोहचत आहे व स्वस्त असल्याने मौजमजेसाठी गोव्यात आलेले हे पर्यटक गांजाची मजा घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT