पणजी : राज्याच्या दीर्घकालीन पर्यटनासाठी ‘ॲप बेस टॅक्सीस’ सर्वोत्तम उपाय असून, त्याची अमलबजावणी लवकरच करू, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. शिवोलीचे आमदार दिलायला लोबो यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित नसल्याने त्यांच्यावतीने मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील 9,457 टॅक्सींना मीटर बसविण्यात आले आहे. त्यापैकी मीटर भाड्यामध्ये सवलत मिळावी म्हणून 2268 टॅक्सी धारकांनी अर्ज केला आहे. त्यापैकी 1829 जणांना मीटरवरील अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मात्र, हा प्रश्न सवलतीने सुटणारा नाही. कारण बसवलेले मीटर टॅक्सी धारकांकडून चालवले जात नाही, हा यंत्रणेतून स्पष्ट होत आहे. बसवलेले मीटर वापरले जात नाही म्हणून तब्बल 3683 जणांना दंड आकारण्यात आला आणि दंडाची आकारणी सरसकट केल्यास सर्वच टॅक्सी चालकांना तालाव द्यावा लागेल.
मात्र, आतापर्यंतच्या अनुभवानंतर हे स्पष्ट झाले आहे की, टॅक्सीचालक मीटरचा वापर करीत नाहीत. पर्यटकांना तर फसवतातच शिवाय सरकार आणि न्यायालयाचीही दिशाभूल करत आहेत. यासाठी ॲप बेस टॅक्सी हाच गोव्याच्या दीर्घकालन पर्यटन व्यवसायासाठी उत्तम उपाय आहे, आता त्याला सभागृहातील कुणीही विरोध करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
टॅक्सी चालकांकडून मीटर वापराविना
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सर्व टॅक्सी धारकांना मीटर सक्तीचे केले आहे यासाठी राज्य सरकारने मीटरवर सवलत देऊन ते सर्व टॅक्सींना बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मीटरमधील जिवो यंत्रणेतून मिळालेल्या माहितीवरून ही मीटर वापरली जात नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे टॅक्सी धारकांकडून पर्यटकांबरोबरच सर्वांची लूट सुरूच आहे, अशा तक्रारीही येत आहेत. काही पर्यटक पोलिस आणि न्यायालयापर्यंत जातात मात्र, त्यांना परत परत राज्यात यावे लागत असल्याने ही प्रकरणे बंद होतात, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
लवकरच बोलविणार बैठक
राज्यातील पर्यटन व्यवसायासाठी टॅक्सी व्यवसाय महत्त्वाचा व्यवसाय आहे. टॅक्सी चालकांच्याप्रती सरकारला सहानुभूती आहे. मात्र, टॅक्सी चालक ज्या पद्धतीने व्यवसाय चालवला पाहिजे, त्या पद्धतीने चालवत नाहीत.
त्यासाठी सरकार लवकरच राज्यात ॲप बेस टॅक्सी सुरू करणार असून, यासंबंधीची सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित टॅक्सी चालक (भागधारक) यांची लवकरच बैठक बोलविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.