मडगाव : सावधान! आणखी तीन दिवसांनी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी एका राजकारण्याच्या पुतण्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त फात्राडे आणि वार्का या भागात तब्बल पाच ठिकाणी धिरयोंचे (रेड्यांच्या झुंजी) आयोजन करण्यात येणार आहे. (Dhiryo In Goa)
या अशा धिरयोंच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊन गोव्यात अशा झुंजीवर बंदी आणणाऱ्या पीपल फॉर ॲनिमल्स (गोवा) (People For Animals, Goa) या संघटनेच्या निमंत्रक नॉर्मा आल्वारिस यांनी कोलवा पोलिसांना एक निवेदन देऊन याविषयी सतर्क केले आहे. राजकीय आशीर्वादाने आयोजित केल्या जाणाऱ्या या बेकायदा झुंजी रोखा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कायद्याने अशा धिरयोंवर बंदी असली तरी बेकायदेशीररीत्या त्या आयोजित करणे बंद झालेले नाही. विशेषतः सासष्टीत हे प्रकार जास्त आहेत. बाणावली, सुरावली, कासावली, कोलवा, फात्राडे या भागात त्यांचे खुलेआम आयोजन केले जात असून, या झुंजीमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण लपल्याने पोलिसही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका प्राणीप्रेमींकडून होते.
आल्वारिस यांनी वेर्णा पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ७, ८ आणि ९ ऑगस्ट असे सतत तीन दिवस कासावली येथील दुबाश्री मैदानावर चार झुंजी आयोजित करण्यात आल्या. त्यातील ९ रोजी दोन झुंजी झाल्या. त्यापैकी पहिली 'फॉरेनर' व 'मवाली' या रेड्यांमध्ये तर दुसरी 'रिक्षाकार' आणि 'हाऱ्याबांध' या रेड्यांमध्ये लागल्याचे आल्वारिस यांनी म्हटले आहे.
कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतही जुलै महिन्यात अशा झुंजी लागोपाठ आयोजित करण्यात आल्याचा आल्वारिस यांचा दावा असून, १२ जुलै रोजी माजोर्डा, १३ जुलै रोजी बाणावली आणि २५ जुलै रोजी सुरावली येथे अशा झुंजी आयोजित केल्या गेल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. अशा झुंजींची जरी तक्रार केली तरी पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप त्यांनी केला.
फात्राडेची झुंज रोखली
फात्राडे-वार्का येथे आज, बुधवारी दुपारी अशीच एक झुंज आयोजित केली, पण त्याच्या सुगावा पोलिसांना आधीच लागल्याने ती रोखण्यात आली, अशी माहिती कोलवाचे पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी दिली. बेकायदेशीर धिरयोंचे आयोजन होऊ नये यासाठी गस्ती पथक ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
फेसबुकचा वापर
या धिरयोंचे आयोजन नेमके कुठे आणि कुठल्यावेळी केले जाणार हे कळविण्यासाठी अशा झुंजी आयोजित करणाऱ्यांनी आपले फेसबुक अकाऊंट सुरू केले आहे. 'कानाबॉयस बुलफाईट गोवा', 'बुलफायटिंग गोवा ऑफिशियल', 'बुलफाईट गोवा', 'गोवा बुलफाईट धिरियो लव्हर्स', 'गोवन बुलफाईटिंग' अशा काही साईट्स तयार करण्यात आल्या आहेत.
प्रचंड अर्थकारण
गोव्यात रेड्यांच्या आणि पाड्यांच्या (बैलांच्या) झुंजी आयोजित करण्यात येत असून, एका झुंजीमागे १० लाखांपासून २५ लाख रुपयांपर्यंत पैजा लावल्या जातात. सध्या जे प्रसिद्ध पाडे आहेत त्यात ‘भाई’ आणि ‘शूटर’ हे नंबर एकचे बैल असून, ‘राजा’ आणि ‘राम’ हे रेड्यांच्या झुंजीतील मातब्बर खेळाडू असल्याचे सांगितले जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.