डॉ. मंजुनाथ देसाई (निधन ) Dainik Gomantak
गोवा

डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनाने राज्याला धक्का

कर्करोगाशी देत असलेली झुंज ठरली अपयशी

Dainik Gomantak

Goa: शिरशिरे-बोरी गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) डॉ. मंजुनाथ प्रेमानंद देसाई यांचे आज रविवारी पहाटे चार वाजता निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते दूर्धर अशा कर्करोगाने आजारी होते (Cancer sufferer) . गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) ते हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, भावजय व इतर परिवार आहे.

डॉ. मंजुनाथ देसाई (Dr Manjunath Desai) हे आपल्या कुटुंबासमवेत मिरामार-पणजी येथे वास्तव्याला होते; मात्र गेले काही दिवस आजार बळावल्याने ते शिरशिरे-बोरी येथील आपल्या मूळ घरी रहायला आले होते. कर्करोगाशी सामना देत असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य क्षेत्रात इतरांना जीवदान देणारा ‘देवदूत’ अचानक हरपला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी सर्वांनीच व्यक्त केल्या. दुपारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू नवनाथ देसाई यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला.

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच केंद्रीय जहाजोद्योग व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, वीजमंत्री नीलेश काब्राल, आमदार रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड, माजी मंत्री महादेव नाईक, खासदार नरेंद्र सावईकर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर तसेच नवदुर्गा संस्थानचे अध्यक्ष शाम प्रभुदेसाई, दिलीपकुमार देवारी, प्रा. मीनानाथ उपाध्ये आणि इस्पितळातील अन्य डॉक्टर्स, परिचारिका तसेच इतर मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांची यावेळी रीघ लागली होती.

हुशार विद्यार्थी ते प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ

मंजुनाथ देसाई यांचे प्राथमिक शिक्षण शिरशिरे-बोरी येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर स्वामी विवेकानंद विद्यालय व पुढील शिक्षण काणकोण येथील नवोदय विद्यालयात त्यांनी घेतले. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मंजुनाथ देसाई यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस'साठी प्रवेश मिळाला.

बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिल्यानंतर त्यांनी बंगलोर, पॉंडिचेरी येथे वैद्यकीय सेवा दिली. हृदयरोगासंबंधी उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. हृदयरोगासंबंधीचे एक उत्कृष्ट शल्यविशारद म्हणून त्यांना मान्यता मिळाली. सध्या ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

मनोहर पर्रीकर यांनी ओळखला हिरा

माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी इस्पितळ बनवण्यासाठी आणि खास करून हृदयरोगासंबंधीचे रुग्ण वाढल्याने प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांबोळी इस्पितळात सेवेसाठी निमंत्रण दिले, आणि डॉ. मंजुनाथ देसाई यांनी ते लगेच स्विकारले. आपल्या राज्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी आपल्या सेवेची जर गरज असेल तर आपण गोव्यात वैद्यकीय सेवा द्यायला तयार असल्याचे त्यांनी कळवले आणि बांबोळी इस्पितळात ते रूजूही झाले.

डॉ. मंजुनाथ देसाई यांनी बांबोळी इस्पितळातील आपल्या कार्यकाळात हृदयरोगासंबंधी शेकडो शस्त्रक्रिया केल्या. डॉ. मंजुनाथ आहे ना, मग चिंता नसल्याच्या प्रतिक्रिया रुग्ण व त्याच्या नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जायच्या. शेकडो लोकांना डॉ. मंजुनाथ यांनी जीवदान दिले. एकापरीने अनेक रुग्णांना देवदूत बनलेले डॉ. मंजुनाथ मात्र अल्पवयातच निघून गेल्याने ही वार्ता ऐकलेल्या त्यांच्या शेकडो रुग्ण व त्यांच्या परिवाराने दुखवटा व्यक्त केला आहे.

देवदूत हरपला!

गोव्याचा आज एक देवदूत गेला. नामवंत हृदयरोग तज्ज्ञांच्या अकाली जाण्याने मला धक्का बसला. अनेकांना जीवदान देणाऱ्या डॉ. देसाई यांना धन्यवाद. आपण सर्वांच्या हृदयात कायम राहणार. त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार तसेच रुग्ण यांच्या दु:खात मी सहभागी आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

राज्याचे मोठे नुकसान

डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले व मोठा धक्का बसला. माझा अजूनही विश्वास बसत नाही की डॉ. मंजुनाथ आमच्यामध्ये नाहीत. हे केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाचे रुग्णालयाचे नुकसान नाही तर ते माझे वैयक्तिक नुकसान आहे. ती एक अपवादात्मक आणि अद्‍भूत व्यक्ती होती ज्याने अनेकांच्या जीवनांना स्पर्श केला आणि अनेक मौल्यवान जीव वाचवले होते. गोवा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.

- विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळातील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अतिव दु:ख झाले. त्यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT