फोंडा : गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत 167 पैकी 166 जणांनी मतदान केले. एकजण आजारी असल्याने मतदान करू शकला नाही. अन्यथा शंभर टक्के मतदान झाले असते. आज सोमवारी मतमोजणी होणार आहे. कुर्टी - फोंडा येथील सहकार भवनमध्ये हे मतदान झाले. निवडणूक अधिकारी राजू मगदूम व इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामकाज हाताळले.(Goa Dairy Election News)
गोवा डेअरीच्या बारा संचालकांच्या निवडीसाठी एकूण 38 उमेदवारांसाठी हे मतदान झाले. तीन पॅनल या निवडणुकीत उतरले आहेत. त्यात माधव सहकारी व श्रीकांत नाईक यांचा प्रत्येकी एक, तर राजेश फळदेसाई व विठोबा देसाई यांचा संयुक्त एक पॅनल मिळून तीन पॅनल रिंगणात आहेत. गोवा डेअरीची गेल्या 2017 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता पाच वर्षांनी ही निवडणूक झाली असून या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.
गोवा डेअरीचा मागचा कार्यकाळ हा प्रशासकाच्या नियुक्तीवर चालला. त्यामुळे यावेळेला गोवा डेअरीवर आपले प्रतिनिधित्व असावे, या उद्देशाने 43 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. पण पाच जणांचे उमेदवारी अर्ज फेटाळल्याने शेवटी अडतीस उमेदवार निवडणुकीत शिल्लक राहिले आहेत.
डेअरीचे प्रशासन सुधारण्याबरोबरच शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे. आमचे पॅनल त्यादृष्टीने कार्यरत राहील, असे मत उमेदवार राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केले.
गोवा डेअरी बळकावण्यासाठी काही जणांनी प्रयत्न चालवले आहेत. पण ही डेअरी सर्वसामान्य दूध उत्पादकांची आहे याचा विचार सहकार क्षेत्रात असलेल्या काही तथाकथित धुरिणांना करायला लावणारी ही निवडणूक आहे, असे मत उमेदवार दुर्गेश शिरोडकर यांनी व्यक्त केले.
गेल्या निवडणुकीनंतर गोवा डेअरीवर बहुतांश काळ प्रशासकाची सद्दी राहिली. मात्र, आता संचालक निवडीमुळे गोवा डेअरीवर दूध उत्पादक प्रतिनिधी कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आवश्यक होती.
- माधव सहकारी (उमेदवार)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.