पणजी: गोव्याचा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) २०१९ अंतिम करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली वेगवान केल्या आहेत. या आराखड्यात आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती, सूचना, शिफारशी किंवा भौगोलिक नकाशे तातडीने सादर करण्याचे निर्देश पर्यावरण व हवामान बदल खात्याने विविध सरकारी विभागांना दिले आहेत.
पर्यावरण खात्याचे संचालक सचिन देसाई यांनी यासंदर्भात कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग, मत्स्यव्यवसाय संचालनालय, वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड्स विभाग, नगरविकास खाते, पंचायत संचालनालय आणि पर्यटन विभागाला ई-मेल पाठविला होता. ‘सीझेडएमपी २०१९’मध्ये आणखी कोणती माहिती किंवा बाब समाविष्ट करणे आवश्यक आहे का? याबाबत संबंधित विभागांनी कळवावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित विभागांकडे उपलब्ध असलेले आवश्यक माहिती संच (डेटासेट्स), भौगोलिक नकाशांच्या फाइल्स (शेप फाइल्स) आणि अन्य सूचना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ‘सीझेडएमपी २०१९’ अंतिम करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत आणखी विलंब होऊ नये, अशी भूमिका पर्यावरण खात्याने घेतली आहे.
या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी विविध सरकारी विभागांकडील माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे. किनारी भागातील जमिनींच्या नोंदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दी, बेटांची स्थाने, मत्स्यव्यवसायाशी संबंधित माहिती, वनक्षेत्र आणि पर्यटनाशी संबंधित बाबींचा समावेश या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपापल्या अखत्यारीतील माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.