Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: धक्कादायक! ‘इसीस’च्‍या दहशतवाद्यांकडून गोव्‍यात रेकी; पोलिस यंत्रणा अनभिज्ञ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने पश्‍चिम घाटातील गोव्यासह कर्नाटकातील काही भागांत आपले तळ उभारण्याची तसेच रासायनिक बॉम्‍बस्फोट घडवून आणण्याची तयारी सुरू केली होती, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

सोमवारी दिल्लीतून ‘इसिस’च्या तीन दहशतवाद्यांना गजाआड करण्यात आले. त्‍यानंतर झालेल्या उलगड्यामुळे गोवा हे दहशतवाद्यांचे आश्रयस्‍थान बनत असल्‍याचे पुन्‍हा स्‍पष्‍ट झाले आहे.

‘इसिस’ने गोव्यावर लक्ष केंद्रीत केले असले तरी राज्यातील पोलिस यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. यापूर्वीही गोव्यात अनेक दहशतवादी राहून गेले आहेत. गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले असून दहशतवादी आश्रय घेण्याचे प्रकार घडूनही त्याचा थांगपत्ताही गोवा पोलिसांना लागला नव्हता.

एनआयए पथकाने गजाआड केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून ते गोव्यात राहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक झालेल्या या तीन दहशतवाद्यांपैकी एकजण गोव्यात तळ उभारण्यासाठी पश्‍चिम घाटातील जंगलात जागा शोधण्यासाठी येऊन गेला होता, अशी माहिती चौकशीत उघड केली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा गोवा हे दहशतवाद्यांच्या नकाशावर अजूनही कायम आहे, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्या दृष्टीने गोव्यातील पोलिस यंत्रणा आणि सरकारही सुस्त आहे.

26/11 पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला तब्बल 18 ठिकाणी करण्याच्या तयारी करत असलेल्या ‘इसिस’च्या मुहंमद शाहनवाज आलम ऊर्फ अब्दुला ऊर्फ इब्राहीम ऊर्फ प्रिन्स (31), मुहंमद रिजवान अश्रफ (28) आणि मुहंमद अर्शद वारसी (29) या तिघांना एनआयएने अटक केली आहे.

यातील शाहनवाज हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. तो ‘इसिस’साठी काम करतो. या तिघांनी अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक सध्या जामिया मिलिया इस्लामिया येथून पीएच.डी. करत आहे.

...येथे केली होती रेकी

पश्चिम घाटात गोव्यासह लवासा (पुणे), महाबळेश्वर (सातारा), हुबळी आणि उडुपी (कर्नाटक) तसेच केरळमधील वलसाड वन्यजीव अभयारण्य, नल्लामला पर्वत रांगा आणि चांदौली येथे तळ उभारण्यासाठी त्यांनी जागा शोधल्या होत्या. त्यानंतर काही ठिकाणी तळ उभारले.

पुण्याजवळील लवासाच्या जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाची पहिली चाचणीही घेतली होती. नंतर दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे अनेक ठिकाणी चाचण्या त्यांनी घेतल्या होत्या.

दखल नाहीच!

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत इसिसच्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून गोव्याचा उल्लेख होऊनही येथील पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. तसेच दिल्लीतील एनआयए या तपास यंत्रणेशी संपर्कही साधलेला नाही.

गृह खात्याच्या स्तरावरून यासंदर्भात अधिक माहिती मागवण्यात आलेली नाही. हा प्रकार उघड झाल्यानंतर येथील पोलिस यंत्रणेनेही गोव्यातील पश्‍चिम घाटात कोठे तळासाठी जागेचा शोध घेण्यात आला, याचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

यासंदर्भात अतिरेकीविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, यासंदर्भात त्यांना कोणतीच माहिती दिल्लीतील एनआयएकडून देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

18 ठिकाणी घडवणार होते स्फोट

1 हिंदू मंदिरे, मजार यांसह मुंबई, सुरत, वडोदरा, गांधीनगर आणि अहमदाबादमधील व्हीआयपी राजकीय नेत्यांचे मार्ग अशा तब्बल 18 ठिकाणी रासायनिक बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा ‘इसिस’च्या या दहशतवाद्यांनी कट रचला होता.

2 त्यासाठी काही भागांची रेकीदेखील केली होती. दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी पुणे, बंगळुरू आदी ठिकाणांहून तरुणांचे ब्रेनवॉश करून आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले होते.

3 रासायनिक बॉम्ब कसे बनवायचे आणि कट यशस्वी कसा करायचा, यांचे या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी इसिसने देशभरात तळ उभारले होते. यातील एक तळ गोव्यातही होता. हे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर राज्यात घबराट निर्माण झाली आहे.

भाडेकरू तपासणीचा फार्स

यापूर्वी यासीन भटकळ, डेव्‍हीड हेडली हे जागतिक स्तरावरील दहशतवादी गोव्‍यात बराच काळ वास्‍तव करून गेल्‍याचे उघड झाले होते.

आजही गोव्‍यात गुन्‍हेगारी पार्श्वभूमी असलेली व्‍यक्‍ती सहजगत्‍या राहू शकते, असा समज दृढ झाला आहे; कारण येथील यंत्रणा गाफील असते. राज्‍यात भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतल्‍याचा फार्स होतो, प्रत्‍यक्षात त्‍यात सातत्‍य राहात नाही.

‘इसिस’च्या तिघा दहशतवाद्यांना अटक केली असली तरी त्यासंदर्भातील माहिती एनआयएने गोवा पोलिसांना दिलेली नाही. गोव्यात त्यांनी नेमके कोठे तळ उभारण्यासाठी रेकी केली होती, याबाबतच्या माहितीसाठीही यंत्रणेने संपर्क साधलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात गोवा पोलिसांकडून चौकशी करण्याचा तूर्त तरी प्रश्‍नच उद्‍भवत नाही.
जसपाल सिंग, पोलिस महासंचालक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT