Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

Migrant crime cases Goa: जानेवारी ते जून या यंदाच्‍या पहिल्‍या सहा महिन्‍यांत दक्षिण गोव्‍यात ११ खुनांची नोंद झाली असून त्‍यातील ७० टक्‍के प्रकरणांत परप्रांतीयांचा समावेश आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: बायणा येथे भर वस्‍तीतील फ्‍लॅटवर पडलेल्‍या दरोड्यानंतर दक्षिण गोव्‍यातील वाढती गुन्‍हेगारी हा मुद्दा पुन्‍हा ऐरणीवर आला आहे.

जानेवारी ते जून या यंदाच्‍या पहिल्‍या सहा महिन्‍यांतील दक्षिण गोव्‍यातील गुन्‍हेगारीचा आढावा घेतल्‍यास बहुतेक प्रकरणात परप्रांतीय गुन्‍हेगारांचाच अधिक समावेश असल्‍याचे दिसून आले आहे. सासष्‍टीत हे प्रमाण सर्वात अधिक आहे.

जानेवारी ते जून या यंदाच्‍या पहिल्‍या सहा महिन्‍यांत दक्षिण गोव्‍यात ११ खुनांची नोंद झाली असून त्‍यातील ७० टक्‍के प्रकरणांत परप्रांतीयांचा समावेश आहे. फोंडा, मडगाव, मायणा-कुडतरी, वेर्णा, फातोर्डा आणि मुरगाव या पाेलिस स्‍थानकांच्‍या कक्षेत ही प्रकरणे झाली आहेत.

यातील बहुतेक प्रकरणांत परप्रांतीयच गुंतल्‍याचे आढळून आले आहे. फक्‍त खून प्रकरणांतच नव्‍हे तर अपहरणे, चोऱ्या आणि बलात्‍कार यासारख्‍याही गुन्‍ह्यांत मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा समावेश दिसून आला आहे.

यासंदर्भात ॲड. विधाता राजेश देसाई यांनी या गुन्‍हेगारीवर नियंत्रण आणण्‍यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. अशा गुन्‍ह्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी खास कृतिदल नेमण्‍याची गरज व्‍यक्‍त करतानाच गाेव्‍यात जे कामासाठी बाहेरच्‍या राज्‍यांतून येतात त्‍यांची सतत चौकशी करणे गरजेचे असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.

दरम्यान, ॲड. आनंद गावकर यांनीही परराज्‍यांतून येणाऱ्या कामगारांवर विशेष लक्ष ठेवण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. जी ठिकाणे धोक्‍याची वाटतात तिथे रात्रीची पोलिस गस्‍त वाढवण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त

ज्याप्रकारे गोव्यात चोऱ्या, दरोड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यावरून गोव्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे हे स्पष्ट होत आहे, असे मत माजी सरकारी अधिकारी व राजकारणी एल्विस गोम्स, ॲड. आनाक्लेत व्हिएगस व निवृत्त पोलिस अधिकारी बोसुएट सिल्वा यांनी व्यक्त केले आहे.

एल्विस गोम्स यांनी सांगितले की, गोव्यात गुंडाराज सुरू आहे, याला कारणे अनेक असतील. राजकीय हस्तक्षेप वाढला‌ आहे व त्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलिस आपले काम व कर्तव्य विसरलेले आहेत. केवळ राजकारण्यांना खूश ठेवण्याचे काम ते करीत आहेत. प्रशासन कोसळलेले आहे.

ॲड. आनाक्लेत व्हिएगस म्हणाले की, गोव्यात स्थलांतरितांची संख्या भयंकर वाढली आहे. बेकार मंजूर जास्त आहेत. हेच लोक चोरी, दरोड्यांमध्ये आहेत. त्यांची पडताळणी गंभीरपणे केली पाहिजे. त्यांच्यावर पाळत ठेवणे गरजेचे आहे.

गोव्यातील प्रत्येक प्रवेशद्वारांवर कडक पहारा आवश्यक आहे. पोलिस खात्याचे कशावरही नियंत्रण नाही. घरी वडीलधाऱ्यांचे जीवन धोक्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी पोलिस अधिकारी बोसुएट सिल्वा म्हणाले की, पोलिस खात्यात प्रत्यक्ष शहरात, गावात फिरून माहिती गोळा करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रात्रीच्या वेळी कडक पोलिस पहारा असायचा. आठ आठ दिवस पोलिस घरी जात नसत. आता पोलिस प्रत्येक दिवशी घरी जातात. वाहन किंवा इतर चोऱ्यांची नोंद होत नाही. पोलिसांना माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसत नाही. पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप होत आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काहींमुळे अनेकजण बदनाम!

दक्षिण गोवा पोलिस मुख्‍यालयातून प्राप्त माहितीनुसार, परराज्‍यांतून गोव्‍यात एकट्यानेच कामाला आलेल्या तरुण परप्रांतीयांचा गुन्‍हेगारीत समावेश दिसून आला आहे. सगळेच परप्रांतीय कामगार गुन्‍हेगार नसले तरी काही परप्रांतीय अशा गुन्‍हेगारीत दिसून येत असून त्‍यामुळे सगळ्‍याच परप्रांतीयांचे नाव खराब होऊ लागले आहे.

दक्षिण गोव्‍यात गुन्‍हेगारीशी संबंधित असलेले बहुतेक परप्रांतीय कर्नाटक, ओडिशा, आसाम, उत्तरप्रदेश व झारखंड या राज्‍यांतील असून गोव्‍यात कामासाठी आलेले हे परप्रांतीय भाड्याच्‍या घरात राहात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

SCROLL FOR NEXT