म्हापसा: बार्देश तालुक्यासाठी शनिवारची सकाळ धक्कादायक ठरली. दिवस उगवताच खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली.
निसर्गरम्य गोव्यातील किनाऱ्यांवर पर्यटन किंवा रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांच्या भाऊगर्दीत आज सकाळी एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण कळंगुट परिसर हादरला. पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा राग मनात धरून एका २८ वर्षीय तरुणाने आपल्याच मित्राची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली.
कळंगुट पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयिताला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पाचजणांचा हा गट आयपीएल बेटिंगसाठी तसेच कॅसिनोमध्ये कामासाठी गोव्यात आला होता. त्यांनी कळंगुट येथे उतरलेल्या
गेस्ट हाऊसमध्ये चार खोल्या आरक्षित केल्या होत्या. यादरम्यान राजभर रविनारायण रामदर्शनभाई आणि कमल बरास्कर यांच्यात वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
राजभर रविनारायण रामदर्शनभाई याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित कमल बरास्कर (वय २८ वर्षे, रा. मध्य प्रदेश) याला वास्को येथून ताब्यात घेऊन अटक केली, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी दिली. या प्रकरणातील इतर संशयित फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
मित्राच्या पत्नीचा फोटो पाहण्याचा हट्ट भोवला
उपलब्ध माहितीनुसार, सुरत (गुजरात) येथील रहिवासी असलेला राजभर हा मित्रांसोबत मुंबईतून गोव्यात आला होता. शनिवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास राजभर आणि कमल यांच्यात जोरदार वाद झाला. राजभरने कमलच्या पत्नीबद्दल केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे आणि मोबाईलमधील काही गोष्टी पाहण्यावरून हा वाद विकोपाला गेला. राजभरने कमलकडे त्याच्या पत्नीचा फोटो पाहण्याचा हट्ट धरला; परंतु ही गोष्ट कमलला रुचली नाही. अखेर या वादाचे रूपांतर खुनाच्या घटनेमध्ये झाले.
चाकूने केले सपासप वार : दोघांमधील झटापट हॉटेलच्या परिसरापर्यंत पोहोचली आणि एका रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ कमलने राजभरवर चाकूने वार केले. राजभरच्या छातीवर वर्मी घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने साथीदारांसह तिथून पळ काढला. रिसॉर्टच्या मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य संशयिताला अटक केली.
बोडगिणी-म्हापसा येथे शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृताचा एक कान कापलेला असून चेहऱ्यावर जखम असल्याने घातपाताच्या संशयाने म्हापसा पोलिस या प्रकाराचा कसून तपास करत आहेत.
शनिवारी (२८ मार्च) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मरडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याशेजारील शेतजमिनीत नागरिकांना एक मृतदेह पडलेला आढळला. याची माहिती मिळताच म्हापसा पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हापसा पोलिसांकडून घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मृतदेहाचा एक कान कापलेला असून तो गायब आहे. तसेच चेहऱ्यावर जखम असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे.
ओळख पटेना
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल. सध्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. म्हापसा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
पलायनाचा प्रयत्न असफल
जीव वाचवण्यासाठी जखमी राजभर रक्ताळलेल्या अवस्थेतच हॉटेलबाहेर पडला. त्याने रस्ता ओलांडून समोरील एका रिसॉर्टमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या कमलने त्याचा पाठलाग केला. रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ संशयितांनी राजभर याला पकडले आणि कमलने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या राजभरचा तिथेच मृत्यू झाला. संशयिताने तो चाकू स्विमिंग पूलमध्ये फेकून दिला आणि पोबारा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.