Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियम शिथिल करण्याविषयी करावा लागणार फेरविचार?

Goa Corona Updates: गोवा सरकारला केंद्र सरकारने विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या चाचण्या करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ-7 या व्हेरियंटने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जगभर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य आरोग्यमंत्र्यांच्या घेतलेल्या बैठकीत विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची कडक तपासणी करण्याबरोबरच आवश्‍यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील सर्व विमानतळांवर कोविड सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली असून, परदेशी पर्यटकांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

जानेवारी व फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या या व्हेरियंटचा अधिक प्रसार होण्याची भीती व्यक्त होत असल्याने राज्य सरकारला आता मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जपान, कोरिया आणि थायलंड येथे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.

चीनमध्ये यापूर्वी आढळलेल्या कोरोनामुळे जगभर त्याचा उद्रेक झाला होता. आता त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीन हा देश खरी माहिती पुढे आणत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे जगभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्याप्रमाणे लोक गोव्यात येतात, तसे गोव्यातील लोक परदेशी आणि इतर ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. नवे वर्ष, नाताळ अशा सणांसाठी, त्याशिवाय विवाह समारंभासाठी अनेकांनी पुढील दोन-तीन महिन्यांतील विमान तिकीट आगाऊ बुकिंग केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविषयी भीती नको, असे म्हणत असले तरी केंद्रीय आरोग्यमंत्री मात्र कोणताही गलथानपणा करू नका, असे सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नाताळ व नववर्षानिमित्त राज्यात जे नियम शिथिल करण्याचा विचार करत आहेत, त्याचा त्यांना फेरविचार करावा लागणार आहे.

विमानतळावर येणाऱ्या सर्व पर्यटकांच्या चाचण्या करण्याविषयी केंद्र सरकारने राज्य सरकारला स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही हलगर्जीपणा करता येणार नाही. विशेष बाब म्हणजे अनेक राज्यांतील पर्यटक आपापली वाहने घेऊन राज्यात येतात, त्यांची कोरोना प्रमाणपत्राची तपासणीही राज्य सरकारला करावी लागेल. गोव्यात लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के झाले असल्याचे मानले जात असले तरी परराज्यांतून किंवा विदेशातून येणाऱ्या पर्यटकांबाबत काळजी घ्यावीच लागणार आहे.

सतर्कतेचा आदेश

जगभर आणि देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे आदेश दिले असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे 27 डिसेंबर रोजी मॉक ड्रिल करण्याची सूचना केली आहे.

सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेची तपासणी करा, खाटांची उपलब्धता तपासा, डॉक्टर, नर्स, साहाय्यक वैद्यकीय कर्मचारी, आयुष डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर, आशा, अंगणवाडी वर्कर यांची उपलब्धता तपासा, साधनसुविधांची माहिती घेण्याची सूचना केली आहे.

‘मोपा’वरील सेवांमध्ये बदलाची शक्यता

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 5 जानेवारीपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत आहेत. त्यासाठी विमान कंपन्यांनी पुरेपूर नियोजन केले आहे. परंतु जगभर पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असल्याने याठिकाणी होणाऱ्या सेवांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याशिवाय आरोग्य खात्याला विमानतळावर तपासणी यंत्रणा उभारण्याचे दिलेले आदेश मोपावरही पाळावे लागणार आहेत. नव्या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना तपासणी करूनच आता राज्यात पाऊल टाकावे लागणार आहे, हे निश्‍चित.

...या विमान प्रवाशांंची सक्तीने आरटी-पीसीआर

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सरसकट आरटी-पीसीआर चाचणीची सक्ती केलेली नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विमानतळांवरील कोरोना चाचण्या ऐच्छिक असतील. मात्र, आता चीनसह पाच देशांतील प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.

चीन, जपान, कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. यासोबतच या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात येणार आहे.

आता नाकावाटे लस देणार- राणे

जगभर वाढणाऱ्या बीएफ-7 या नव्या कोरोना व्हेरियंटमुळे केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्यातील सर्व प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संभाव्य कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर 27 डिसेंबर रोजी मॉक ड्रिलही आयोजित केले आहे. याशिवाय ऑक्सिजन प्लांटची तपासणी केली असून औषधसाठा, कोविशिल्ड आणि नाकावाटे द्यावयाची लस मागवण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

गोवा राज्यात 24 तासांत

  • 02 नवे बाधित सापडले.

  • 17 एकूण बाधित.

  • 378 शनिवारी घेतलेल्या चाचण्या.

  • 4,013 जणांचा आतापर्यंत मृत्यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT