Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: नववर्ष अन् कोरोना सोबतच! 'खरी कुजबूज'

Goa Corona Update: कोरोना काही मानवजातीची पाठ सोडत नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: गोवा राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. सर्व व्यवहार ठप्प झाले. 2021 पर्यंत कोरोनाचा प्रभाव कायम राहिला. त्यामुळे राज्यातील दोन्ही पर्यटन हंगामांचे वाटोळे झाले. खाण व्यवसायापाठोपाठ पर्यटन व्यवसाय हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेली दोन वर्षे या पाठीच्या कण्याला कोरोनाचे जबरदस्त हादरे बसले. यंदा नाताळ व नववर्ष सोहळा सुखाचा व कोरोनामुक्त जाईल, असा अंदाज होता.

मात्र, वाकड्या हाताच्या देशात कोरोनाचा उद्रेक झालाच व त्याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. त्याचा जबरदस्त परिणाम पर्यटन नकाशावर असलेल्या गोवा राज्यावर झाला आहे. ऐन नववर्षाच्या आरंभी लॉकडाऊन झाल्यास काय करावे, अशी चर्चा सध्या टॅक्सीचालक, पर्यटन व्यावसायिक ते सामान्य टपरी मालकांमध्ये सुरू झाली आहे. शेवटी कोरोना काही मानवजातीची पाठ सोडत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कुडचडेतील चंदेरी दुनिया!

चंदेरी दुनियेचे अप्रुप कोणाला नाही? आता म्हणे कुडचडेत तेरा दिवसांची चंदेरी दुनिया अवतरणार आहे. दयानंद कला केंद्राने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांच्या मदतीने भव्य चंदेरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी या चंदेरी महोत्सवाला प्रखर विरोध केला होता. मात्र, मंत्र्यांच्या जिद्दीपुढे हा विरोध फिका पडला.

काब्रालबाब म्हणतात, जे रिकामटेकडे आहेत ते विरोध आणि टीकाही करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ‘चंदेरी दुनिया’ फुलवायचा ध्यास काब्राल यांनी घेतला आहे. व्यापारी जरी शांत असले तरी ते दुःखी आहेत; कारण ऐन हंगामात धंदा करणार बाहेरील विक्रेते व दीड लाख रुपये कमावणार पालिका. जनता मनमुराद आनंद लुटणार, पण आमचे काय? असे आम्ही नव्हे, स्थानिक व्यापारीच प्रश्‍न करत आहेत.

म्हणे ‘सात’ साथ!

काँग्रेसचे आठ आमदार भाजप पक्षात सामील झाल्यानंतर आता विरोधकांची संख्या फक्त ‘सात’ झाली आहे. या विदारक अशा परिस्थितीतही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची विनोदबुध्दी तल्लख असावी.

कारण त्यांनी सर्व विरोधी आमदार विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करणार असे सांगताना, ''हम सात, साथ है'' असे सुरेख यमक जुळवले आहे. हे अधिवेशन आहेच मुळात चार दिवसांचे. त्यातही आमदारांना फक्त मागच्या पाच वर्षांत काय झाले, त्याचीच माहिती मागता येणार आहे. या चार दिवसांत हे सात वेडे वीर कुठपर्यंत घोडदौड करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. नाही तरी घोडा आणि मैदान जवळच आहे म्हणा!

आता कुठे गेला विकासाचा मुद्दा?

रायचे सरपंच ज्युडास क्वाद्रुश हे विकासकामे करत नाहीत, असा आरोप करत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी गटातील दोन पंचांनी बंडखोरी करत त्यांना पाडले होते. मात्र, नंतरच्या 15 दिवसांत काय उलाढाल झाली ते माहीत नाही.

पण या दोन्ही बंडखोरांनी काल घरवापसी करत पुन्हा त्यांना जीवदान दिले. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे तो असा. मागच्या 15 दिवसांत त्यांच्या प्रभागात विकासाचा पाऊस झाला, म्हणून त्यांचे मन परिवर्तन झाले की, अन्य कशाचा पाऊस पडला म्हणून त्यांना पूर्वीच्या सरपंचांच्या प्रेमाचे भरते आले? काहीच कळत नाही बुवा!

येणार...इलेक्ट्रिक बस येणार..!

कदंब महामंडळाच्या ताफ्यात दीडशे इलेक्ट्रिक बसेस येणार, त्या काही महिन्यांतच येणार, अमूक कालवधीनंतर येणार, असे महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर वरचेवर सांगत होते. परंतु आता या बसेसना पुढील वर्ष उजडणार असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. त्यासाठी किमान फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

इलेक्ट्रिक बसेस येणार म्हणून 2022 चा कार्यकाळ असाच काढला. त्यामुळे आश्‍वासने कशी द्यायची, याचे धडे पहिल्यांदाच आमदार झालेल्या तुयेकरांना भाजपच्या नेत्यांनी दिले, असेच म्हणावे लागेल. पक्के मुरब्बी राजकारणी असल्यासारखे तुयेकरांनी इलेक्ट्रिक बसेसच्या पत्रकारांच्या प्रश्‍नाला कसे सामोरे जायचे हे त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या प्रेमेंद्र शेट यांना दाखवून दिले.

आता फेब्रुवारी 2023 मध्ये तरी इलेक्ट्रिक बसेस येतील, अशी आशा करूया. अन्यथा उन्हाळा तोंडावर आला आणि विजेच्या कमतरेतमुळे चार्जिंगचा प्रश्‍न निर्माण झाल्यास येणाऱ्या बसेसचा प्रवास आणखी लांबणीवर जाणार तर नाही ना?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

चहाची ऑफर पडली महागात!

एका महिलेला चहाची ऑफर देणाऱ्या युवकाला चहा सोडाच, उलट बेदम मार खावा लागला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डिचोली शहरात पालिका इमारतीजवळील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या बाहेर घडला. एक बुरखाधारी महिला बँकेतून बाहेर येताच, एक तिशीतील युवक तिला चहा प्यायला येण्यासाठी आग्रह करीत होता. नेमके त्याचवेळी त्या महिलेचा मुलगा त्या ठिकाणी पोचला.

त्याला हा प्रकार कळताच त्याने संशयित युवकाची बेदम धुलाई सुरू केली. तोपर्यंत त्याठिकाणी बघ्यांचीही गर्दी जमली. त्या महिलेने आपल्या मुलाला अडविण्याचा प्रयत्न करताच संशयित युवकाने मोटारसायकलवरून तेथून पळ काढला. मात्र, अनोळखी महिलेला चहाची ऑफर देणे त्याला चांगलेच महागात पडले. या प्रकाराची नंतर शहरातील नाक्या- नाक्यावर खमंग चर्चा सुरू होती.

बाबू भटजी आणि माफीनामा...

युद्धात देखील शरण आलेल्यांना माफ केले जाते, तसेच देवसुद्धा आपल्या भक्तांना माफ करतो. त्यामुळे माणसांनी देखील माफ करणे शिकले पाहिजे, असे सूतोवाच कळंगुटमधील बाबू भटजी यांनी केले. बाबू भटजी यांनी गुरुवारी पर्रा येथे नाताळ सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलेले भाषण बरेच गाजले! बाबू भटजी हे या परिसरातील नामांकित गृहस्थ! यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षांतर केलेले मायकल लोबो, दिलायला लोबो आणि केदार नाईक हे तीन आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.

या लोकांच्या हातून चुका घडल्या आहेत. त्यांनी मंदिरात व चर्चमध्ये जाऊन शपथा घेतल्या, त्यांच्या हातून चूक घडलेली आहे खरी; पण आम्ही त्यांना माफ केले पाहिजे. भटजी आणि फादर यांनी त्यांना माफ केले पाहिजे, असे बाबू भटजींनी उदगार काढताच कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.

यावेळी मुख्यमंत्रीसाहेबही आपले हसू रोखू शकले नाहीत! जरी भटजींनी या लोकप्रनिधींना माफ केले असले तरी लोकांनी किंवा मतदारांनी त्यांना खरंच माफ केलं असेल का? ते काहीही असले तरी या बाबू भटजींचा हा अफलातून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, एवढे मात्र नक्की.

फोंड्यातील ध्रुवीकरण

गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी पात्रांव काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि नंतर अत्यल्प मताधिक्याने का असेना, निवडूनही आले. त्यानंतर मगो झाले गेले विसरून भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे फोंड्यातील राजकारण शांत होईल, असा कयास केला जात होता. पण नगराध्यक्ष असलेल्या रवीपुत्रावरील अविश्वासाने तो खोटा ठरविला.

त्यानंतर शांताराम कोलवेकर यांनी भाजपमध्ये डेरेदाखल होऊन नवेच समीकरण घडविले. आता पुन्हा नवी चाल खेळली जाऊ शकते, याचे संकेत सुनील देसाई यांच्या हालचाली देत असल्या तरी त्यांच्यावर अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे फोंड्यात आणखी ध्रुवीकरण शक्य नसल्याचे रवीसमर्थक छातीठोकपणे सांगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT