Goa Politician  Dainik Gomantak
गोवा

Goa Politician: मंत्र्याच्या सेक्स स्कॅंडल प्रकरणामुळे राज्यात खळबळ, सत्ताधाऱ्यांची पुरती नाचक्की

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politician दाबोळी विमानतळ आम्ही बंद पडण्यापासून वाचवला, याचा आनंद साजरा करण्याची संधी आज सरकारला मिळाली नाही.

कारण एका मंत्र्याच्या तरुण महिला पंच सदस्यासोबतच्या भानगडीचे वृत्त आज राज्यभर वाऱ्यासारखे पसरले आणि माध्यमेच कशाला, लोकांपासूनही तोंड लपवण्याची वेळ संबंधितांवर आली.

कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याचे हे दुसरे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची पुरती नाचक्की झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो, रोहन खंवटे आणि खासदार सदानंद शेट तानावडे हे शुक्रवारी दिल्लीत हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटले आणि दाबोळी विमानतळ सुरू ठेवण्याची आश्वासने त्यांनी मिळवली.

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून बैठकीची माहिती पत्रकारांना दिली. राज्यात परतल्यानंतर दाबोळी विमानतळ आम्ही बंद होऊ देणार नाही, असे विधानसभेत दिलेले आश्वासन आम्ही पाळले, असे प्रसार माध्यमांकरवी जनतेला सांगण्याचे त्यांचे नियोजन होते.

दाबोळीचे आमदार म्हणून मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासाठी विमानतळ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. विमानतळापासून केवळ ५० मीटर जागा सोडून बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यासाठी १५ दिवसांत बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी खुद्द संरक्षणमंत्र्यांकडून मिळवले होते.

मात्र, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी आणखीन एक मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला आहे का, अशी थेट विचारणा ट्विटरवर करून गुदिन्हो यांनाही आपण दिल्लीत दाबोळी विमानतळ वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचण्यापासून वंचित केल्याचे दिसून आले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगभरातून पर्यटक येतील, याविषयी दिल्लीत झालेल्या निर्णयांची आज राज्यात येऊन पत्रकारांना माहिती देऊ शकले नाहीत. सर्वसाधारणपणे दिल्ली दौऱ्यानंतर संबोधित केली जाणारी पत्रकार परिषदही मुख्यमंत्र्यांनी आज घेतली नाही.

चोडणकर यांनी ट्विटरवर आणखी एक मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला आहे का, याचे उत्तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपने द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबत त्यांनी एक कात्रणही जोडले असून ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ असा हॅश टॅग देऊन त्यांनी भाजपची खिल्ली उडवण्याची संधी सोडलेली नाही.

त्यांनी सोबत जोडलेल्या कात्रणात म्हटले आहे की, बंदराच्या शहरात एका शक्तिशाली राजकारण्याने वाढदिवसाच्या मेजवानीनंतर एक तरुण पंचसदस्य महिलेला आपला खरा रंग दाखवल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

तिच्या नवऱ्याला आपली बायको घरी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने शोधाशोध सुरू केली असता, ‘सर’ तिला घेऊन गेल्याचे त्याला समजले. त्याने थेट त्या राजकारण्याचे फार्म हाऊस गाठले. तेथे सुरक्षा रक्षकांशी दादागिरी करत पती आत पोचला असता, त्याला नेमके सत्य दिसून आले.

त्यावर त्या राजकारण्याने ताबडतोब पोलिसांना दम दिला की, याविषयी तक्रार आली तर ती नोंदवून घेऊ नका. त्यानुसार याविषयीची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. त्या महिलेचा पती चिखलीतील आपल्या घरी पोचला असता, त्याला एक दिवस त्याच्याच घरात कुलुपबंद ठेवण्यात आले होते, असेही या वृत्तात म्हटले आहे.

सध्या मी दिल्लीत आहे. या प्रकरणाची माहिती मला नाही. गोव्यात परत आल्यावर माहिती घेऊन आवश्यकता असल्यास या विषयावर बोलेन. कोणीतरी, काहीतरी आरोप केले म्हणून तत्काळ प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असे नाही.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

मिलींद नाईक यांच्या प्रकरणाचा भांडाफोेड गिरीश चोडणकर यांनीच केला होता. त्यावेळी ते प्रकरण धसास लावून धरणारे तेव्हाचे कॉंग्रेस नेते संकल्प आमोणकर आता कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आमदार होऊन भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात केवळ विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री योग्य ती कृती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सखोल चौकशी करा : केरकर

सेक्स स्कॅन्डलच्या वृत्ताने ‘सवेरा’ या बिगर सरकारी संस्थेच्या तारा केरकर या संतप्त झाल्या आहेत. ‘तो मंत्री महिला पंचांना घरे बांधून देईपर्यंत सारे झोपले होते का’ अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, ही सारी माहिती विधानसभा सभापतींना पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र सोमवारी पाठवण्यात येणार आहे.

दिल्लीतील महत्त्वाच्या निर्णयांची गोड वार्ता सांगण्याची संधी हुकली

डिचोली परिसरात घडली घटना

हा प्रकार डिचोली परिसरातील एका फार्म हाऊसवर घडल्याची माहिती चोडणकर यांनी केलेल्या चौकशीतून बाहेर आली. शुक्रवारी चोडणकर यांना याविषयी समजले. त्यांनी त्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी आपले खबरे कामाला लावले.

डिचोली परिसरात ही घटना घडली, अशी खात्रीलायक माहिती त्यांना मिळाली. चोडणकर यांनीही या माहितीची पुष्टी केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून काही पुरावे हाती लागतात का, याचीही चाचपणी करण्यात आली आहे. यातून कोणते पुरावे सापडले, हे सांगण्यास मात्र चोडणकर यांनी नकार दिला.

‘त्या’ आमदाराची मंत्रिपदावर नजर

जोवर ‘ती’ व्यक्ती मंत्रिमंडळात आहे, तोवर आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळणार नाही, असे वाटणाऱ्या एका तरुण आमदाराने या सेक्स स्कॅन्डलची माहिती उघड केल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाला हिरवा कंदील मिळत नाही.

कधी कर्नाटकची निवडणूक, तर कधी ईशान्येकडील राज्यांतील अशांतता अशी कारणे देत टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे एका मंत्र्याला वगळल्याशिवाय आपल्याला संधी नाही, अशी मनाशी ठाम खूणगाठ मारलेल्या या नेत्याने पाळत ठेवली आणि ही माहिती माध्यमांपर्यंत पोचवण्याची संधी साधली, अशी चर्चा सुरू आहे.

दिल्लीत पोचली खबर : राज्यातील मंत्र्याची ही आगळीक दिल्लीत कळवण्याची संधी त्या मंत्र्याच्या पदावर टपून बसलेल्यांनी सोडलेली नाही. भाजपच्या एका वरिष्ठ जबाबदार नेत्याला त्या बातमीचे कात्रण व त्या मंत्र्याचे नाव भाजपच्याच एका नेत्याने कळवले आहे. याआधी अशाच प्रकरणामुळे भाजप सरकारचे नाव खराब झाले होते.

मंत्री मुख्यमंत्र्यांना शरण: आता हे प्रकरण विरोधकांनी लावून धरले तर दक्षिण गोव्यात लोकसभेवेळी सत्ताधारी पक्षाला मार बसू शकतो, असे गृहीतक दिल्लीपर्यंत पोचवण्यात आले आहे.

त्यामुळे ‘त्या’ मंत्र्याचा राजीनामा घेण्याची सूचना दिल्लीतून मिळू शकते. या साऱ्या घडामोडींमुळे मंत्रिपद जाण्याच्या भीतीने त्या राजकारण्याला पछाडले असून त्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना सारे काही सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT