Goa Congress lok sabha election south goa constituency Capt Viriato Fernandes Yuri Alemao Amit Patkar bjp  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेस नेतृत्वाला कधी जाग येणार? दक्षिण गोव्यातील विजयाने हुरळून न जाता वस्तुस्थिती समजणं गरजेचं

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress: गोव्याचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला सध्या बेभरंवशाच्या, आळशी आणि कामचुकार नेतृत्वाने ग्रासले असून, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि कार्लुस फेरेरा यांच्याविषयी पक्षात असंतोष खदखदत आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आताच दखल घेऊन त्वरित उपाययोजना न केल्यास पक्षाची पुढील वाटचाल खडतर होणार आहे.

दक्षिण गोव्यात काँग्रेस उमेदवाराचा विजय हा स्थानिक नेतृत्वामुळे नव्हे, तर जनतेने भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार केल्यानेच शक्य झाला, हे ‘गोमन्तक’ने आकडेवारीसह यापूर्वी प्रसिद्ध केले आहे; परंतु पक्षाचे नेते मात्र त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी काम केलेल्या समाजसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांची नाराजी काँग्रेस ने ओढवून घेतली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकसुद्धा न घेता परस्पर काही निर्णय घेतले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यानंतर निवडणूक प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठीही पक्षाची बैठकच झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकंदर ‘इंडिया’ आघाडीतील इतर राजकीय पक्षांवर विसंबून राहून, काँग्रेस च्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वाने दूरच ठेवल्याने गट समित्यांपासून प्रदेश काँग्रेस समिती सदस्यांमध्ये प्रचंड राग आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुथ पातळीवर संघटनात्मक बांधणी केल्याचा अनेकवेळा केलेला दावा सपशेल खोटा असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उघड झाले. उत्तर आणि दक्षिण गोव्यात केवळ कागदावरच संघटना अस्तित्वात असल्याचा अनुभव दोन्ही उमेदवारांनी घेतला. उत्तरेचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनीही पक्ष संघटना कमी पडल्याचे मान्य करून एकप्रकारे स्थानिक नेतृत्वाला घरचा अहेरच दिला आहे.

काँग्रेस च्या कारभारात अमित पाटकरांच्या काही निकटवर्तीयांची वाढती ढवळाढवळ प्रदेशाध्यक्षांना मारक ठरत असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्व सूत्रे त्यांनी काही संबंधितांकडेच दिली होती, असे कळते. निवडणूक प्रचारासाठी नेमलेली एजन्सी केवळ त्यांचेच आदेश पाळत असल्याचे कळल्यानंतर अनेकांनी प्रचारातून अंग काढून घेतले. अनेक पत्रकारांचा रोषही त्यांच्यामुळेच पाटकरांनी ओढवून घेतला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विधिमंडळ गटनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता आणि हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्याकडून महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि सेवादल या पक्षाच्या सहयोगी संघटना तसेच काँग्रेस गट समित्यांसाठी कोणतीच मदत मिळत नसल्याची तक्रार असून, आमदारच दखल घेत नसतील तर काम कसे व का करायचे, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

जनतेच्या प्रश्नांकडेही काँग्रेस नेतृत्वाचे दुर्लक्ष होत असून, विधानसभा अधिवेशन महिन्यावर आलेले असताना पक्षाच्या आमदारांनी साध्या बैठकाही घेतलेल्या नाहीत. आगामी अधिवेशनात सात विरोधी आमदार एकत्र असतील का, याचीही सध्या खात्री देता येत नाही.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी लोकांकडून सूचना मागवून एकप्रकारे काँग्रेस आमदारांना शह देण्याचाच प्रयत्न केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत असून, पक्षातील एका गटाने विजय सरदेसाई यांच्या कृतीचे स्वागत करून युरी आलेमाव यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर ‘स्मार्ट सिटी’ पणजीत ताडमाड येथे गटार कोसळणे, मतांच्या ध्रुवीकरणावर भाजपने ख्रिस्ती धर्मगुरूंना दिलेला दोष, वीज दरवाढ, मडगाव नगरपालिकेतील आर्थिक घोटाळा, सांत आंद्रे मतदारसंघात सापडलेले अर्भकाचे पाय आणि त्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने केलेले बेजबाबदार विधान, यांवर प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते आणि इतर दोन आमदारांनी एक शब्दही काढला नसल्याने त्यांच्या एकंदर भूमिकेवर आता पक्ष कार्यकर्तेच संशय घेत आहेत.

बाणावली मतदारसंघातील जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत स्थानिक गट समितीचा प्रखर विरोध डावलून आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय आणि या उमेदवाराचा निवडणूक अर्ज भरताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची उपस्थिती, यावरही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वडिलांच्या आजारपणाचे कारण देऊन आपल्या निष्क्रीयतेवर पांघरूण घालण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी वेळ देता येत नसेल तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद एल्टन वा कार्लुस यांच्याकडे द्यावे, असे आता काँग्रेस कार्यकर्तेच बोलू लागले आहेत. काँग्रेस आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे इतर पक्षांचे आमदार आपले राजकीय महत्त्व व वजन वाढवून घेत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते.

२०२७ मध्ये ३० जागा जिकंण्याची घोषणा केलेल्या काँग्रेस नेतृत्वाने आताच आळस सोडून कामाला न लागल्यास आम आदमी, गोवा फॉरवर्ड, आरजी आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते काँग्रेस वर विसंबून न राहता आपली वेगळी चूल मांडण्याची जास्त शक्यता आहे. तसे झाल्यास ऐनवेळी योग्य उमेदवार शोधणे व पक्षांतराच्या संकटाला दूर ठेवणे काँग्रेस ला अशक्यप्राय होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT