पणजी: गोमंतकीय जनतेला आर्थिक भुर्दंड ठरणाऱ्या स्मार्ट वीज मीटरच्या जोडण्या पुढील १५ दिवसांत कायमस्वरूपी रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्विस गोम्स, अमरनाथ गावकर आदी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांच्या वीज बिलांत मोठी वाढ झाल्याचा दावा अमित पाटकर यांनी केला. सध्या मीटर जोडण्या तात्पुरत्या स्थगित केल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सक्ती होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्या कायमस्वरूपी रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. स्मार्ट मीटरचे तांत्रिक परिणाम मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्याची काँग्रेसची तयारी असून, ग्राहकांच्या गोपनीयतेलाही या मीटरमुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे पाटकर यांनी नमूद केले.
येथेच सक्ती का?
कर्नाटक उच्च न्यायालयाने स्मार्ट मीटरविरोधात निर्णय दिला असून, उत्तर प्रदेश व बिहारमध्येही स्मार्ट मीटर रद्द केल्याचा दावा एल्विस गोम्स यांनी केला. इतर राज्यांत असे निर्णय होत असताना गोवा सरकार स्मार्ट मीटरची सक्ती का करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. केंद्राकडून १५० कोटी, तर उर्वरित १,३०० कोटींचा खर्च राज्याला करावा लागेल, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.