मडगाव: भाजपविरोधी वातावरणाचा फायदा घेत निदान दक्षिण गोव्यात तरी काँग्रेस पक्षाला जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ता मिळू शकली असती. मात्र, काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही संधी हातची गेली, अशी भावना काँग्रेसमध्ये निर्माण झाली असून याला दोषी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हेच आहेत, असा आरोप होऊ लागला आहे.
कोणत्याही स्थितीत विरोधी पक्षांची युती व्हायलाच पाहिजे, असा हट्ट धरणारे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही दक्षिण गोव्यात (Goa) सत्ता मिळवू शकलो नाही, असा स्पष्ट उल्लेख करताना याची कारणे काय हे आम्ही केंद्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवू, असे सांगितले.
डिकॉस्टा म्हणाले, मी किमान चार मतदारसंघ असे सांगू शकतो, जिथे आम्ही सुचवलेले उमेदवार निवडणुकीत उभे केले असते तर ते जिंकले असते; पण त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. पक्षाच्या भल्यासाठी जे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी स्वतःचा नव्हे, तर पक्षाच्या हिताचा विचार करणे आवश्यक होते. काहीजणांकडे मवाळ तर काही निवडक लोकांकडे कडक हे धोरण वापरणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सर्व विरोधी पक्षांची युती होऊ नये, असे आमच्याच काही नेत्यांना वाटत होते. त्याची फळे आता दिसून येत आहेत, असे ते म्हणाले.
निवडणूक अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर उमेदवार जाहीर केले तर निवडणूक जिंकता येत नाही. निवडणूक जिंकायची असेल तर हे निर्णय आधी घ्यावे लागतात. हे आमच्या स्थानिक नेत्यांना कळणे गरजेचे आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर आताच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानेही तेच दाखवून दिले आहे, असे डिकॉस्टा म्हणाले.
अमित पाटकर (Amit Patkar) यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त करताना डिकॉस्टा म्हणाले, मी, युरी आलेमाव आणि कार्लुस फेरेरा या तिघांनीही आमचे मतदारसंघ जिंकून दिले. पण अमित पाटकर यांच्याकडे जो मतदारसंघ दिला होता तो शेल्डे जि.पं. मतदारसंघ का जिंकता आला नाही, त्याचा त्यांनी विचार करावा. या मतदारसंघात माझ्या केपे मतदारसंघात येणाऱ्या अवेडे पंचायतीत काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाली. पण इतर ठिकाणी ती मिळाली नाही. वास्तविक या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला जी मते मिळाली आहेत, ती त्या उमेदवाराच्या ताकदीवर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.