Colvale Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृह नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. या कारागृहात कैद्यांकडे मोबाईलपासून अंमलीपदार्थ सापडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता तेथे चिकन वाढण्यावरुन कैद्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण हाणामारीत झाले.
बुधवारी (ता. ११) सायंकाळी जेवणावेळी चिकन वाढण्यावरुन हा प्रकार घडला. दरम्यान, या हाणामारीत सुपारी देऊन दोन कैद्यांना मारण्याचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या महिन्यात रुमडामळ येथे झालेल्या सादिक बेल्लारी खूनप्रकरणाशी ही घटना जोडली जात आहे.
सादिक बेल्लारी याचा खून सप्टेंबरमध्ये झाला होता. घरात झोपलेल्या अवस्थेत सहा संशयितांनी हल्ला चढवून त्याला ठार मारले होते. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता.
मायणा-कुडतरी पोलिसांकडून या प्रकरणातील अटक केलेल्या सर्व सहा संशयितांची रवानगी नंतर कोलवाळ कारागृहात केली होती.
या सहा संशयितांपैकी एकाने बेल्लारीचे कोलवाळ कारागृहात असलेले इतर दोन साथीदार इस्माईल मुल्ला आणि मुस्तफा शेख यांना मारण्यासाठी रचलेला हा कट होता अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चिकन वाढण्यावरुन हा वाद उरकून काढल्याचे समजते. या मारामारीत काही कैद्यी जखमी झाले. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन हा वाद तिथेच मिटवला.
कोलवाळ पोलिस स्थानकात आज गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाशी निगडित औपचारिक तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला नव्हता, अशी माहिती स्थानिक पोलिस निरीक्षकांनी दिली.
सुरे, विळ्यांचा खुलेआम वापर
कारागृहातील मेसमध्ये काम करणाऱ्या सुमारे २० कैद्यांनी एकत्रित येऊन हा हल्ला केला. हल्ल्यासाठी या सर्वांनी स्वयंपाकघरातील सुरे तसेच विळ्यांचा वापर केला. या हल्ल्यात इस्माईल मुल्ला याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून आठ टाके पडले आहे.
उपचारासाठी त्याला म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डोक्याला जबर दुखापत, सोबत उलट्या होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्याचा सल्ला दिला.
तर, त्याचा दुसरा साथीदार मुस्तफा शेख याच्या एका डोळ्याला दुखापत झाली. तसेच त्याच्या डोक्यालाही मार लागल्याने त्याला गंभीर अवस्थेत गोमेकॉत हलविले आहे. या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा वाढवून तिथे आयआरबीच्या जवानांना तैनात केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.