Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; बाबाशानचा दुटप्‍पीपणा

Khari Kujbuj Political Satire: पोर्तुगीजमध्ये आरामदायी खुर्चीला व्हॉल्तेर म्हणतात. आज या शब्दाचा वापर कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत एवर्सन वालीस यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

बाबाशानचा दुटप्‍पीपणा

काँग्रेसमधून जिंकून येऊन नंतर भाजपात गेलेले नुवेचे माजी आमदार बाबाशान डिसा यांनी नुवे मतदारसंघात आपला संपूर्ण पाठिंबा आम आदमी पक्षाचे लुईस बार्रेटो यांना दिला आहे आणि त्‍यांच्‍यासाठी ते कामही करत आहेत. यामुळे आम आदमी पक्षावर पक्ष फुटीरांचा आधार घेतल्‍याची टीकाही होऊ लागली आहे. मात्र, जवळच्‍या कोलवा मतदारसंघात हेच बाबाशान अपक्ष उमेदवार नेली रॉड्रीगीस यांच्‍यामागे आहेत. या मतदारसंघात आपने आंतोनियो फर्नांडिस यांना उभे केले आहे. पण बाबाशानचा त्‍यांना विरोध आहे. बाबाशानच्‍या या दुटप्‍पीपणाला म्‍हणावे तरी काय?

फोंडा तालुक्यातील व्यूहरचना

‘मगोप’चे एक खंदे कार्यकर्ते केतन भाटीकर यांनी पक्ष का सोडला याची चर्चा फोंड्यात सुरू आहे. परंतु त्याच्याशी जिल्हा पंचायतीच्या कुर्टी-खांडेपार जागेचा काहीही संबंध नाही. ही जागा फोंडा मतदारसंघात येत असल्याने भाजपने तिच्यावर दावा केला होता, जी ‘मगोप’ नेतृत्वाने कोणतीही खळखळ न करता मान्य केली. परंतु महत्त्वाचे कारण- २०२७च्या विधानसभा निवडणुकीचे आहे. २०२७च्या निवडणुकीत मगोप-भाजप युती होणार आहे. ढवळीकरांनी यापूर्वीच युतीत राहण्याचे निश्चित केले आहे व तशी ग्वाही त्यांनी अमित शहांच्या भेटीच्यावेळी दिली. रवी पुत्राला ही उमेदवारी मिळावी यासाठीही दीपक ढवळीकर आग्रही आहेत. परंतु त्याबदल्यात पक्षाचा दावा प्रियोळ मतदारसंघावर असून गोविंद गावडे पक्षापासून स्वतः दूर होत असल्याने दीपक ढवळीकरांचा त्या जागेवरील दावा आणखी भक्कम बनला आहे. २०२७मधील युती व ढवळीकरांची व्यूहरचना भाटीकरांच्या लक्षात आल्याने त्यांनी आधीच राजकीय डाव टाकला. ढवळीकरांना २०२७च्या निवडणुकीत चार जागा मिळाल्या तरी समाधान मानायची तयारी आहे, असे म्हणतात.

सावियो यांचे भाकित!

गोवा भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य सावियो रॉड्रिग्ज यांचा दिल्लीत दबदबा आहे काय, याची चर्चा भाजपात सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे ते सतत रिपब्लिकन टीव्हीवर अर्णब गोस्वामींच्या कार्यक्रमात झळकतात. हडफडे आग प्रकरणात त्यांनी राज्य सरकारला व मुख्यमंत्र्यांनाही शिंगावर घेतले आहे. ते वारंवार अमित शहा यांची भेट घेत असल्याने, ते पक्षश्रेष्ठींना निकट असल्याचे भासवले जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना हवे तसे त्यांचे वर्तन आहे काय, याची चर्चा होते. परंतु पक्षातले जाणकार सांगतात की, मुळात भाजपात अल्पसंख्याक कमीच असल्याने असल्या काही सदस्यांना नेत्यांकडे उठबस करण्याची संधी मिळते. परंतु त्यापलीकडे त्यांच्या अस्तित्वाला फारसा अर्थ नाही. गेल्या निवडणुकीत सावियोंची अनामत रक्कम जप्त झाली होती, याची संघटनात्मक नेते आठवण करून देतात. त्यामुळेच सावियो जानेवारीत काहीतरी ‘घडणार’ असल्याचे जे भाकित वर्तवतात, त्याला काही अर्थ नाही, असे सांगण्यात येते.

दिगंबर-मोदी भेटीचे कवित्व

दिगंबर कामत संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले याचा धसका भाजप सरकारमधील काहींनी घेतला असावा. त्यामुळे अलीकडे काहींनी दिगंबर कामत यांच्याविरोधात जाहीर सभांमधून फुत्कार सोडले असल्याची चर्चा आहे. वास्तविक मोदींना पर्तगाळच्या समारंभात कामत भेटले व आपल्याला कुटुंबासह तुमची भेट घ्यायची आहे, अशी विनंती त्यांनी केली व ती तत्काळ मान्य झाली. वास्तविक या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे मोदींना एकाबरोबर तीन-चारच जण भेटू शकतात; पण कामत मुलाच्या सासऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला घेऊन त्यांना भेटू शकले, याचे वैषम्य पक्षातील काहींना वाटले आहे. मोदींनी एवढी मोठी भेट पक्षातील इतर कोणालाही दिलेली नाही, हे वैशिष्ट्य!

‘त्या’ केवळ वल्गना बरे का!

हडफडे नाईट क्लबमधील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज झालेत व त्यांना तंबी देण्यात आली असल्याच्या वार्ता भाजपमधूनच पसरविल्या जात आहेत. भाजप समर्थक वृत्तवाहिन्या सक्रिय झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही भाजप समर्थक पत्रकारांनीही तसा निष्कर्ष काढला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता अद्याप कोणीही मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप केलेला नाही, अशी माहिती मिळते. शनिवारी पहाटे ही घटना घडल्यानंतर सकाळी सहा वाजता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून राहतकार्याची माहिती घेतली होती. एका वृत्तपत्राने तर नेतृत्वबदलाची बातमीही पहिल्या पानावर दिली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री शर्यतीत चारजण असल्याचीही अफवा सुरू झाली आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्यांविरोधात काम करणारी एक लॉबी बऱ्याच काळापासून कार्यरत असल्याचीही चर्चा आहे.

शहा-ढवळीकर भेट

हडफडे अग्निकांडानंतर पूजा नाईक प्रकरण काहीसे विस्मृतीत गेलेले असले तरी ‘मगोप’चे नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर दिल्लीत जाऊन अमित शहा यांना गुपचूप भेटून आले. ‘मगोप’च्या ढवळीकरांना पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. यापूर्वी अमित शहा गोव्यात सरकारच्या योजनांचा शुभारंभ करण्यासाठी आले तेव्हा व्यासपीठानिकटच्या खोलीत शहा-सुदिन यांची वैयक्तिक बैठक झाली होती व त्यामुळे शहा यांनी मुख्यमंत्र्यांना काही वेळेसाठी बाहेर पाठवले होते. आताही ढवळीकरांनी वेळ मागतात त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले व आपल्यावर हे ‘बालंट’ असल्याचे ‘मगोप’च्या नेत्यांनी त्यांना सांगितले व शहा यांनी त्यांना अभय जाहीर केले. त्यामुळे ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील हवाच निघून गेली आहे!

सुभाष फळदेसाई डॉक्टर झाले!

नदी परिवहन व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नावासमोर आता डॉक्टर ही पदवी लागणार आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून ही पदवी मिळविली नाही, तर नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवार्ड अकादमीने ऑस्ट्रेलियाच्या मदर तेरेझा विद्यापीठाच्या सहकार्याने ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ६ तारखेला हा पदवी प्रदान कार्यक्रम गोव्यात तारांकित हॉटेलमध्ये पार पडला. राजकीय आणि सामाजिक सेवांमधील फळदेसाई यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल अकादमीने घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी दिली आहे. आता फळदेसाई आपल्या नामफलकासमोर ‘डॉ.’ हे पद लावण्यास मोकळे. त्याशिवाय कार्यक्रमांतून त्यांचा उल्लेख डॉ. फळदेसाई म्हणून कोणी केला तर आश्चर्य वाटायला नको एवढेच.

व्हॉल्तेरावर बसलेला राजकारणी

पोर्तुगीजमध्ये आरामदायी खुर्चीला व्हॉल्तेर म्हणतात. आज या शब्दाचा वापर कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत एवर्सन वालीस यांनी केला. नुवेत म्हणे एक राजकारणी आहे जो व्हॉल्तेरावर बसून राजकारण करतो. अशाप्रकारचे राजकारणी आम्हाला नको असेही वालीस म्हणतात. तो एरव्ही कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला तरी कॉंग्रेसचे नेते आपल्याकडे आले असे तो सांगत सुटला आहे. यात तथ्य आहे की नाही हे वालीस यांनाच जास्त माहीत असणार. पण हा व्हॉल्तेरावर बसून राजकारण करणारा नुवेतील नेमका राजकारणी कोण? हे जरी वालीस यांनी स्पष्ट केले नसले तरी तमाम गोमंतकीयांना हा राजकारणी कोण याचा अंदाज आला असेल.

केजरीवाल यांच्या सभेची गर्दी फायद्याची ठरेल?

आपचे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी काल केपे तालुक्‍यात समाविष्‍ट होणाऱ्या शेल्‍डे मतदारसंघात जाहीर सभा घेतली आणि या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दीही होती. आता सभांना होणाऱ्या गर्दीवर निवडणूक जिंकता येते असे कुणी म्‍हटल्‍यास निवडणुकीतील जाणकार असलेले त्‍याला निश्चितच वेड्यात काढतील. मात्र, कालच्या सभेला झालेली गर्दी पाहून आपचे शेल्‍डेचे उमेदवार जेम्‍स फर्नांडिस आणि आपचे एकूणच पदाधिकारी यांच्‍या मनात नक्‍कीच खुषीचे लाडू फुटले असतील. या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा असून त्‍याच्‍यामुळे मतविभागणी झाली तर त्‍याचा फायदा निश्चितच भाजपला होणार आहे आणि भाजपचे शेल्‍डेचे उमेदवार सिद्धार्थ गावस देसाई हे तसे लोकप्रियही आहेत. त्‍यामुळे कालची गर्दी जेम्‍स सरांना फायद्याची ठरेल की लोक केजरीवाल काय बोलतात हे ऐकण्‍यासाठी आले होते हे २२ तारखेला स्‍पष्‍ट होणार हे कळण्‍यासाठी तोपर्यंत वाट पाहावी लागणार हेच खरे.

रेडकर तुम्ही चुकलातच!

रोशन रेडकर तुम्ही चुकलातच. सरपंच म्हणून आपले काही कर्तव्य असते. आपल्यावर बालंट आल्यावर पोलिस स्टेशनवर जमाव नेऊन प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न तुम्ही केला. शिवाय भाजपमध्ये असल्याने आपले कोणी काही वाकडे करणार नाही, अशी मनधारणा धरून त्यांनी जे कृत्य केले असेल ते निषेधार्ह नक्कीच आहे. बेकायदेशीर व्यवसाय आपल्या पंचायत क्षेत्रात चालतात म्हणून तुम्ही त्याविरोधात आंदोलन केले की आमरण उपोषणास बसलात, हे कितीजणांना माहीत. परंतु भाजपला धडा शिकवणारच ही तुमची भीष्मप्रतिज्ञा आता अनेकांच्याच नव्हे, तर भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या डोक्यात पक्की बसली असेल. सरपंच म्हणून गावाचा कारभार हातात दिलेला असतो, तो कारभार पारदर्शी आणि सरळमार्गी चालवावा लागतो. तुम्ही स्वतःला दोषी मानत नसाल, तर तुमच्या काळात घडत असलेल्या बेकायदेशीर प्रकाराला तुमचा मूक पाठिंबा कसा? वाहत्या गंगेत हात तुम्हीही धुऊन घेतला नसेलच हेही कशावरून? हे केवळ तुमच्याविषयीच प्रश्न पडणार नाहीत, तर इतर किनारी भागातील पंचायतींच्या सरपंचांबाबतही असणार आहेत.

मटकेवाला आणि पेंटर

निवडणुकीचे वारे वाहू लागले की राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतात. ते एवढ्या थराला जातात की नंतर ते वैयक्तिक स्तरावर पोहोचते. केपेतील एका माजी मंत्र्याने म्हणे कॉंग्रेसच्या एका उमेदवाराला ‘तो पेंटर मरे’ असे जाहीर सभेत हिणवले. याचा आमदार एल्टनबाबला राग आला. त्याने त्या माजी मंत्र्यांच्या व्यवसायाचा उल्लेख केला. पेंटींग हा चांगला, प्रामाणिक व अधिकृत धंदा. या धंद्यामुळे कुणाच्या घराचे तुकडे होत नसतात, पण मटक्यामुळे कित्येक घरे बरबाद होतात. जे मटका खेळतात ते श्रीमंत होत नाहीत. तर जे मटका घेतात ते मात्र इतरांच्या कुटुंबांना सुरुंग लावून आपण ऐशोआरामात जगतात. एल्टनबाबचे हे शब्दच त्या राजकारण्याला पुरेसे आहेत. एक मात्र खरे एका राजकारण्याने दुसऱ्या राजकारण्यावर टीका करताना आपणसुद्धा आरशाच्या घरात राहतो हे विसरू नये असे लोक बोलू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT