Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींनी 'तो' निर्णय का घेतला?

Khari Kujbuj Political Satire: फोंड्याच्या रवी पात्रांवाच्या अनेक आठवणी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर सांगितल्या गेल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

रवींनी ‘तो’ निर्णय का घेतला?

फोंड्याच्या रवी पात्रांवाच्या अनेक आठवणी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर सांगितल्या गेल्या. त्यात सर्वसामान्यांप्रति त्यांच्यामध्ये असलेली तळमळ व गृहमंत्री असताना गुन्हेगारांवर बसविलेला वचक यांचा समावेश आहे. नगरसेवक ते आमदार, मंत्री व मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीचेही असेच आहे. मगोप, काँग्रेस, भाजप, पुन्हा काँग्रेस व पुन्हा भाजप हा त्यांचा राजकीय प्रवासही अनेकांना विचार करायला लावतो. पण पर्रीकरांबरोबर एकदा भाजपमध्‍ये जाऊन बाहेर पडलेले पात्रांव नंतर पुन्हा त्‍या पक्षात का प्रवेशकर्ते झाले?, साधे मंत्री का बनले? या प्रश्‍‍नांची उत्तरे मात्र राजकीय चिकित्सकांना मिळू शकलेली नाहीत. किंबहुना रवींच्‍या निधनानंतरही कुणी त्यावर प्रकाशही पाडलेला नाही. रवी यांची एकंदर वाटचाल पाहिली तर ते एखाद्या पदासाठी पुन्हा भाजपमध्‍ये दाखल झाले असे वाटत नाही, मग त्यांचा हेतू कोणता असावा बरे? ∙∙∙

खाकी वर्दीसाठी नामुष्की

माजोर्डा येथे आयोजित धीरयोत एका माणसाचा बळी जाऊन आता महिना उलटला तरी पोलिस अजूनही त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊ शकलेले नाहीत. वास्‍तविक त्यांना खरेच तेथपर्यंत जावयाचे आहे ना?, असा सवाल उपस्‍थित होतोय. मुख्य संशयित गणली जाणारी रुई नामक व्यक्ती तर अजून पोलिसांच्या हाती लागू शकलेली नाही. ती मिळण्याची शक्यताही आता धूसर बनली आहे. कारण सदर व्यक्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विदेशात निसटली आहे असे पोलिसच सांगत आहेत. तर, लोकांच्‍या मते पोलिसांनीच त्याला निसटायला संधी दिली. कारण सर्वांचे साटेलोटे. पण मुद्दा तो नाही तर सदर संशयिताच्या पासपोर्टचा क्रमांकही पोलिसांना मिळू शकलेला नाही. म्हणजे सदर व्यक्ती विनापासपोर्ट विदेशात निसटली की काय, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. अन्य प्रकरणांत गुन्हेगारांना २४ तासांत गजाआड केल्याचा दावा करणारे हेच का ते पोलिस? अशी विचारणा होऊ लागली आहे.

मायकलला असाही अनुभव

समुद्रकिनारी भागात विशेषत: कळंगुट, बागा परिसरातील बांधकामांवर विशेष नजर ठेवणारे आमदार मायकल यांनाच वेगळ्या अनुभवास सामोरे जावे लागले आहे. किनारी भागातील बांधकामे बंद पाडण्यासाठी प्रसिद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते चर्चेत असतात. मायकल यांनी किनारी भागात जमीन विकत घेतली. त्या जमिनीला दगडी कुंपण बांधताना या नेहमीच पुढे-पुढे करणाऱ्यांनी मायकलचे ते काम बंद पाडले. यामुळे मायकल संतप्त बनले. त्यांनी या कार्यकर्त्यांवर तोंडसुख घेणे सुरू केले आहे. मायकलच्या कामाला विरोध केल्यावर त्यांना या सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख पटली काय? इतर वेळी त्यांना का रोखले नाही? अशी कुजबूज या मतदारसंघात सुरू झाली आहे. ∙

चोरट्यांनी दिला नरकासुरालाही दणका

राज्यात अलीकडच्‍या काळात चोऱ्यांच्या घटना वाढत चालल्‍या आहेत. चोरट्यांनी जणू पोलिसांनाच आव्हानच दिले आहे. त्‍यातच आता मालीम-बेती येथील एक चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्‍यात घराबाहेर उभा केलेला नरकासुर चोरटे मध्यरात्री चोरून नेताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे त्या व्हिडिओत चोरट्यांची टोळीच दिसत आहे. कारण चोरटे नरकासुर घेऊन काही अंतरावर उभ्या असलेल्या टोळक्याला जाऊन मिळतात, असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. विशेष म्‍हणजे नरकासुराची चोरी करणाऱ्या त्‍या टोळीत एका युवतीचाही सहभाग आहे. यावरून चोरट्यांनी नरकासुरालाही सोडले नाही असेच म्हणावे लागेल.

खरेच फायदा होईल?

राज्‍यात पेयजल या स्‍वतंत्र खात्‍याची जबाबदारी मिळताच मंत्री सुभाष फळदेसाई यांनी जलगळती थांबवून गोमंतकीय जनतेला पुरेसे पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याची हमी दिली. ‘पाणी मुरते कुठे?’ याचा लवकरात लवकर शोध घेणार असल्‍याचेही त्‍यांनी त्‍यावेळी स्‍पष्‍ट केले होते. परंतु अनेक दिवस झाले तरी त्‍यांचे खाते मात्र याबाबत कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीय. अनेक भागांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्‍यांतील बिघाड आणि पाण्‍याची गळती मीडियाला या खात्‍यापर्यंत पोहोचवावी लागते. त्‍यामुळे खरेच या खात्‍याचा जनतेला काही उपयोग आहे का? अशा प्रश्‍‍न प्रामुख्‍याने उत्तर गोव्‍यातील अनेक मतदारसंघांतील जनतेला पडला आहे

तुयेने घालून दिला धडा

पेडणे तालुक्यातील तुयेच्या ग्रामसभेने गावाची धारण क्षमता तपासली जात नाही, तोवर नवे प्रकल्प नको अशी भूमिका घेतली आहे. या गावाची १४ लाखाहून अधिक चौरस मीटर जमीन सरकारी प्रकल्पांसाठी घेतली गेली. मात्र गावातील कोणालाही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे आधी अर्धवट प्रकल्प पूर्ण करा, त्यानंतर नवे प्रकल्प आणा असेही ग्रामस्थांनी ठणकावले आहे. सरकार जर स्थानिक स्वराज्य संस्था असे पंचायतींना संबोधत असेल तर ग्रामसभेत घेतलेला ठराव सरकारलाही बंधनकारक असावा अशी चर्चा पेडण्यात सुरू झाली आहे. तुयेने सर्वांसमोर आदर्श ठेवल्याचेही बोलले जात आहे.

एक सोहळा, दोन उमेदवार!

सावर्डेचे माजी आमदार व माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपला ५२वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्‍याने साजरा केला. २०२७ची निवडणूक लढविण्‍याची गर्जना करण्‍यासाठी त्‍यांनी या वाढदिवस सोहळ्‍याचे आयोजन केले होते. त्‍यामुळेच या समारंभाला कोण-कोण येणार, याची सर्वांना उत्‍सुकता लागून राहिली होती. दीपकरावांच्‍या वाढदिवसाला वेगवेगळ्‍या क्षेत्रातील लोक आले. पण त्‍यातील एक महत्त्‍वाची व्‍यक्‍ती म्‍हणजे माजी खासदार विनय तेंडुलकर. तसे या कार्यक्रमाला माजी मंत्री महादेव नाईकही उपस्‍थित होते. तरीसुद्धा विनयरावांची उपस्‍थिती सर्वांसाठी कुतूहलाची बाब ठरली. कारण यावेळी सावर्डेतून आपणही निवडणूक लढविणार असे यापूर्वीच विनयरावांनी सांगितले आहे. त्‍यामुळे दोन संभाव्‍य उमेदवार एकाच समारंभात, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

पाटकर का नाहीत?

फातोर्डा येथे झालेल्‍या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा, आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजीपी) अध्‍यक्ष मनोज परब यांनी एका व्‍यासपीठावर उपस्‍थित राहून विरोधकांच्‍या एकीचे दर्शन घडवले. सरदेसाई यांच्‍या पक्षाची काँग्रेससोबत युती अगोदरपासूनच आहे. त्‍यात गत पावसाळी अधिवेशनात त्‍यांनी ‘आरजीपी’शीही युतीचे संकेत दिले होते. त्‍यानुसार या तिन्‍ही पक्षांचे वरिष्‍ठ नेते एकत्र आले. परंतु यात काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर मात्र झळकले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना युती मान्‍य नाही की यामागे इतर कोणते कारण आहे? असा प्रश्‍‍न प्रदेश काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत.

त्यांचे असेही धाडस!

सरकारने २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वीच्या घरांना अभय दिले आहे. विविध कायदा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आता त्यानंतर बांधलेली घरे सरकार कधी ना कधी कायदेशीर, नियमित करेल असे अनेकांना वाटू लागले आहे. असे आता केले जाणारे बांधकाम नजरेस येऊ नये यासाठी एक कपडा लावून त्यामागे बांधकाम करण्याची शक्कल लढवण्यात येत आहे. पैरा येथे असा कपडा लावून त्यामागे काहीतरी हालचाली सुरू असल्याचे दिसून येते. मध्यंतरी सरकारने बेकायदा बांधकामांसाठी तलाठ्यांना जबाबदार धरू असे म्हटले होते. तलाठ्याचे लक्ष स्थलांतरितांच्या मालमत्तेतील अशा कृत्यांकडे कधी जाणार? असा प्रश्‍‍न यामुळे चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT