काँग्रेसची सारी मदार महिलांवरच!
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बहुतेक सगळे पक्ष आळस झटकून कामाला लागलेले आहेत, असे चित्र असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये मात्र नेमके काय चालले आहे, अशी विचारणा कॉंग्रेसवालेच करताना दिसतात. विशेषतः महिला कॉंग्रेसने मंगळवारी पणजीत आयोजित केलेल्या ‘नेतृत्व सृजन’ प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये खालच्या सुरांत ही चर्चा होती. या कार्यक्रमाला पक्षाचे गोवा प्रभारी माणीकराव ठाकरे तसेच प्रभारी सचिव अंजली निंबाळकर व अन्य नेते उपस्थित होते. पण निमंत्रण असूनही अनेक स्थानिक नेते म्हणे तिकडे फिरकले नाहीत. या कार्यक्रमानंतर आगामी जिल्हापंचायत निवडणुकीबाबतचा पक्षाचा पवित्रा म्हणे निश्चित केला जाणार होता. पण प्रमुख मंडळी बैठकीकडे न फिरकल्याने ‘सगळे मुसळ केरात’ अशी स्थिती झाली, त्यामुळे पक्ष एकदिलाने या निवडणुकीस कसा जाणार हा प्रश्न निर्माण झाला. त्याच प्रमाणे कॉंग्रेसची सारी मदार महिलांवरच सोपविण्यात आली आहे की काय, असा प्रश्न पडावा,असे चित्र दिसू लागले आहे.
बाबूश नावाची शक्ती
ताळगावमध्ये बाबूश मोन्सेरात यांच्या मान्यतेशिवाय पानही हलू शकत नाही. अगदी स्व. मनोहर पर्रीकर यांनाही त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागले होते. ताळगाव पंचायत निवडणुकीत एका तरी भाजप सदस्याला संधी मिळावी म्हणून तत्कालीन भाजप संघटन सचिव सतीश धोंड यांनाही मिनतवारी करावी लागली होती. तरीही बाबूश नमले नव्हते. आताही त्यांचा तोच दरारा कायम आहे. त्यांनी भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच परस्पर भाजपचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. ताळगावचे माजी पंच रघुवीर कुंकळ्येंकर यांना ही उमेदवारी मिळेल, असे बाबूश यांनी सांगितले आहे. भाजपच्या पक्षशिस्तीचा बुरखा टराटरा फाडण्याची संधी बाबूश यांनी हातची जाऊ दिली नसल्याचेच यावरून दिसते, नाही का?.
मायकल यांचे मत महत्त्वाचे
जिल्हा पंचायत निवडणुकीचा उमेदवार ठरवताना स्थानिक आमदारांचे मत महत्वाचे असेल यावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या भाजप आणि हितचिंतकांकडून उमेदवारीविषयी मते जाणून घेतली जात आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष बसून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील. कळंगुट परिसरातील उमेदवारीबाबत आपले म्हणणे महत्वाचे असेल, असेही लोबो यांनी सांगितले आहे. यामुळे आमदार म्हणेल तोच उमेदवार यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे.
प्रियाचा पत्ता कट का?
प्रिया च्यारी या फोंडा मतदारसंघातील कुर्टीच्या विद्यमान झेडपी. आगामी निवडणुकीतही त्यांनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली होती. गेली पाच वर्षे त्यांनी झेडपी म्हणून चांगले कार्य केल्यामुळे त्यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यताही होती. पण आता हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे प्रियाचा पत्ता आपोआप कट झाला आहे. फोंड्याचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्याशी असलेली बांधिलकी त्यांना भोवली, असे खांडेपार भागात बोलले जात आहे. त्या झेडपीतर्फे होणाऱ्या बहुतेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कै. रवी नाईक यांच्याऐवजी भाटीकरांनाच बोलवायच्या म्हणे. ही बाब फोंड्यातील काही स्थानिक भाजप नेत्यांच्या नजरेत आली आणि त्यांनी फोंड्याची आगामी पोट निवडणूक लक्षात घेऊन भाटीकरा ना शह देण्याकरता ही ‘चाल खेळली’ असे बोलले जात आहे. आता यात तथ्य किती हे सांगणे कठीण असले तरी राजकारणात सगळे माफ असते, एवढे मात्र शंभर टक्के खरे
पाऊसकरांचा सुटकेचा निश्वास
पूजा नाईक हिने आपल्याकडून एका मंत्र्यानेही पैसे घेतले होते, असे सांगितल्यानंतर तो मंत्री कोण? याविषयी सगळीकडे कुतूहल निर्माण झाले होते. आपण जो व्यवहार केला होता तो २०१९ च्या काळात असे म्हटल्यावर त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असलेले दीपक पाऊसकर यांच्याकडेही काहीजण संशयाने पाहू लागले. मात्र ज्या मंत्र्याने पैसे घेतले तो मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहे, असा खुलासा पूजा हिने केल्यानंतर सर्वांत आधी सुटकेचा श्वास जर काेणी साेडला असेल तर तो दीपक पाऊसकर यांनीच असेल. कारण पाऊसकर आता मंत्री नाहीत. त्यामुळे हे पैसे पाऊसकर यांनी घेतले नव्हते, हे स्पष्ट झाल्याने त्यांनाही एकप्रकारे परस्पर ‘क्लीनचिट’ मिळाली, असेच म्हणावे लागेल.दुसऱ्या बाजूला हा जो मंत्री आहे, तो भाजपचा नाही, हेही स्पष्ट होऊ लागले आहे. त्याचे नावही सर्वांच्या तोंडी आले आहे, त्यामुळे भाजपवालेही सुटकेचा निश्वास सोडू लागले आहेत.
‘त्या’ बडतर्फ पोलिसाचे कारनामे ...
एका बडतर्फ पोलिसाने आपले उपद्रवमूल्य पुन्हा एकदा सुरू केले आहे, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा पोलिस सध्या बडतर्फ आहे खरा. मात्र, त्याचा माज काही उतरलेला नाही. हल्लीच सासष्टीतल्या किनारपट्टी भागात त्याने आपण क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून काहीजणांकडून खंडणी उकळली. पोलिसांकडे याबाबत काहीजणांनी आपली कैफियतही मांडली, मात्र त्या बडतर्फ पोलिसाला काही बड्या साहेबांचा छुपा आशीर्वाद असल्याने ठाण्यातील पोलिसांचीही काही मात्रा चालली नाही. शेवटी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, असे त्या पोलिसाबाबत प्रामाणिक पोलिस खासगीत बोलून दाखवितात. सर्व वाईट गुणांनी युक्त असलेल्या या पोलिसाला वठणीवर आणणार तरी कोण? हेच तर खरे दुखणे आहे.
एल्टनच्या वाढदिवसाची गर्दी...
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी मंगळवारी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. एल्टनने आपल्या वाढदिवसाचे आमंत्रण मतदारसंघातील सर्वांना दिले होते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला किती गर्दी होते याबद्दल लोकांना उत्सूकता होतीच. या वाढदिवसाला फक्त काँग्रेसचेच कार्यकर्ते उपस्थित होते, असे नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांचीही बऱ्यापैकी उपस्थिती होती. त्यात काही बाबू कवळेकर यांच्या जवळच्या समर्थकांचाही समावेश होता. मंगळवारीच बाबू कवळेकर यांनीही आपल्या घरी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते, असे सांगितले जाते. कवळेकर यांना कला अकादमी मिळाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केले होते, असे जरी सांगितले जात असले तरी त्यामागे आपल्या कार्यकर्त्यांनी एल्टनच्या वाढदिवसाला जाऊ नये, हा अंतस्थ हेतू होताच. असे असतानाही बाबूंचे कार्यकर्ते एल्टनच्या वाढदिवसाला उपस्थित होते. याचा अर्थ काय बरे घेणे शक्य आहे?
माध्यमांवर अशाही दुगाण्या
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिची मुलाखत प्रसारित केल्यावरून एका वृत्तवाहिनीवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आगपाखड केली आहे. नेमक्या त्याच वृत्तवाहिनीला ही मुलाखत कशी मिळते, असे कोडे सर्वांना पडले असतानाच ढवळीकर यांचे विधान चर्चेचे ठरले आहे. पूजा हिने ती वृत्तवाहिनी विकत घेतली की काय, असे म्हणत ढवळीकर यांनी असे प्रकार होत असतात यावर शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे अशा गोष्टी करण्याचा ढवळीकर यांना अनुभव असावा, अशी चर्चा कानी पडू लागली आहे.
अभिजीत भाजपचे उमेदवार?
झेडपी निवडणूक आता महिन्यावर आल्यामुळे वातावरण तापू लागले आहे.फोंडा तालुक्यातील कुर्टी झेडपी आदिवासी जाती करता आरक्षित झाल्यामुळे सगळ्या पक्षांचे लक्ष आता या जमातीतल्या प्रभावी उमेदवाराकडे लागले आहे. भाजपचे खांडेपारचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच आभिजीत गावडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यांनी तशी तयारी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. आता यात तथ्य किती, हे येत्या काही दिवसांत कळेलच. पण या झेडपीत चुरशीची लढत होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागलेत!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.