केपे: सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांच्या कामात टाळाटाळ आणि दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रसंगी बडतर्फही करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
केपे येथे आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. केपे, कुडचडे आणि सांगे मतदारसंघांतील १८५ नागरिकांनी या कार्यक्रमात आपल्या समस्या आणि तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
‘माझे घर’, वन हक्क कायदा आणि अटल आसरा यांसारख्या योजनांचा लाभ देताना अधिकाऱ्यांनी अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत. कायद्याच्या तरतुदींच्या नावाखाली कामे प्रलंबित ठेवण्याऐवजी नियमांच्या चौकटीत ती सुलभ आणि जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नागरिकांना आपल्या समस्या घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे यावे लागणे ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल, माजी आमदार बाबू कवळेकर, कुशावती जिल्हाधिकारी गुरुदास देसाई आणि विविध सरकारी खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
...खनिज वाहतूक!
केपे येथील नवीन पोलिस स्थानकाच्या अपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे आणि स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिवण येथील ट्रक मालकांनी खाण व्यवसाय आणि खनिज वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन सादर केले. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन महिन्यांत खनिज वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.