Goa Chess Association Election  Dainik Gomantak
गोवा

खासदार विनय तेंडुलकर 'चेकमेट' का झाले?

नुकत्याच झालेल्या गोवा बुध्दिबळ संघटना कार्यकारी समितीच्या निवडणूकीत राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर यांच्या गटाचा पराभव झाला. सत्ताधारी भाजपने स्नातक तेंडूलकर 'चेकमेट' होणे ह्या स्थिंत्यंरामागे अनेक अंतरंग होते. त्याचा घेतलेला आढावा

किशोर पेटकर

Rajya Sabha member Vinay Tendulkar : सन 2002 साली गोव्यात जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा झाली. देशात ही स्पर्धा होण्याची तिसरी वेळ होती. सन २००६ हे वर्ष गोमंतकीय बुद्धिबळात ऐतिहासिक ठरले. त्यावर्षी जून महिन्यात इराणमधील तेहरान येथे झालेल्या आशियाई वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या भक्ती कुलकर्णी हिने १४ वर्षांखालील मुलींत सुवर्णपदक जिंकले.

त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये जॉर्जिया देशातील बाटुमी येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय इव्हाना फुर्तादो आठ वर्षांखालील मुलींत जगज्जेती बनली. तेव्हा ती फक्त ७ वर्षे व २२६ दिवसांची होती. भक्ती आणि इव्हाना यांच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील यशोगाथेनंतर गोव्यातील बुद्धिबळ क्षेत्र ढवळून निघाले.

अन् बुद्धिबळात क्रांती

पूर्वी फक्त राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागापुरता गोमंतकीय बुद्धिबळ दिसायचे, सारे काही हौशी धर्तीवर होते. पण, भक्ती आणि इव्हानाच्या यशानंतर गोमंतकीय बुद्धिबळास मार्गदर्शक दिशा गवसली. २००६ नंतर गोमंतकीय बुद्धिबळात क्रांती घडली. फिडेचा किताब मिळविणारी भक्ती पहिली गोमंतकीय बुद्धिबळपटू ठरली.

नंतर भक्तीने सीनियर गटातही विजयी पताका फडकावली. राष्ट्रीय महिला विजेतेपदाचा मान मिळविला. चिकाटीने खेळत तिने ऑलिंपियाड पदकासह गोव्याची अवघी तिसरी आणि राज्य बुद्धिबळातील पहिलीच अर्जुन पुरस्कारप्राप्त बनण्याइतपत उंच शिखर पादाक्रांत केले. इव्हानाने दोन वेळा जगज्जेतेपद मिळविले.

अनुराग म्हामल गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला. त्यानंतर लिऑन मेंडोसाने ग्रँडमास्टर बनण्याइतपत यश प्राप्त केले. गोमंतकीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर, वूमन ग्रँडमास्टर, इंटरनॅशनल मास्टर बनू शकतात हे सिद्ध झाले.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष समीर साळगावकर यांनी द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांना गोमंतकीय युवा बुद्धिबळपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले. भक्ती, इव्हानाची प्रतिभा गोखले यांच्या मार्गदर्शनाखालीच बहरली. अध्यक्ष या नात्याने समीर यांनी गोमंतकीय बुद्धिबळूंना व्यासपीठ मिळवून दिले.

महासंघाचे लाभले बळ

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही राज्यातील बुद्धिबळास खतपाणी घातले. कालांतराने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या प्रशासकीय कामकाजात नवे चेहरे आहे. नव्या लोकांनीही बुद्धिबळाच्या विकासासाठी चांगले काम केले.

राजकारणी बुद्धिबळ प्रशासनात असल्यास खेळाचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल असे वाटल्याने विनय तेंडुलकर, नीलेश काब्राल हे राजकारणी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष बनले. त्यांनीही कार्यकारी समितीतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राज्यातील बुद्धिबळास प्रोत्साहन सातत्याने दिले.

श्रीनिवास धेंपे, दिलीप साळगावकर या उद्योगपतींनी गोव्यातील बुद्धिबळ गुणवत्तेला आर्थिक पाठबळ दिले व अजूनही देत आहेत. किशोर बांदेकर यांनी महासंघात खजिनदारपद भूषविले. अध्यक्षपदी नीलेश काब्राल असताना गोव्यात २०१८ साली प्रथमच आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन झाले.

नंतर २०१९ साली स्पर्धेची दुसरी आवृत्ती झाली. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव स्पर्धेला देण्यात आले. २०२० साली कोविडमुळे स्पर्धा नाही. त्याचवर्षी बांदेकर यांची महासंघाचे खजिनदार या नात्याने मुदत संपली आणि २०२१ मधील निवडणुकीत ते पराभूत झाले.

तेंडुलकर राहिले गाफील

तेव्हाच्या निवडणुकीत महासंघात दोन गट झाले होते. तरीही गोव्यातील बुद्धिबळात सारे चित्र आश्वासक असताना २०२०-२०२१ च्या आसपास कुठेतरी माशी शिंकली. राज्य बुद्धिबळात बांदेकर यांना विरोध करणारा मोठा गट तयार झाला.

१२ पैकी ७ तालुका संघटनांना बांदेकर पुन्हा कार्यकारिणीत नको होते. तालुका संघटनांचा मताचा कानोसा घेत तेव्हा वीजमंत्री असलेल्या काब्राल यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदासाठी आणखी एक टर्म नाकारली. बिनविरोध असल्यासच अध्यक्ष बनू अशी त्यांची भूमिका होती. काब्राल यांचे समर्थन बांदेकर व त्यांच्या गटाला होते; परंतु बहुमत असलेल्या सात तालुका संघटनांना बांदेकर संघटनेत नको होते.

काब्राल यांनी बहुमताचा आदर केला. त्यांच्या नकारानंतर राज्यसभेचे खासदार असलेले विनय तेंडुलकर दुसऱ्यांदा संघटनेचे अध्यक्ष बनण्यास राजी झाले; मात्र त्याच वेळी त्यांनी संघटनेतील बहुमतातील गटाचा कानोसा घेतला नाही. एकसंध असलेल्या सात तालुका संघटनांकडे दुर्लक्ष केले गेले. भाजपची राज्यात सत्ता असल्यामुळे विरोध दडपता येईल अशीच त्यांची व त्यांच्या गटाची भावना बनली.

अखेरीस बहुमताकडे काणाडोळा करणे तेंडुलकर यांना महागात पडले. रविवारी बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत खासदार असूनही पराभूत होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.

म्‍हणून फिरवली पाठ

खरं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील एका प्रमुख पक्षाचा खासदार या नात्याने त्यांनी जबाबदारपणे विचार केला असता, तर मागील दोन वर्षांत राज्यातील बुद्धिबळ खेळास न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या नसत्या. कोणत्याही थरास जाऊन सत्ता काबीज करणे हे ध्येय बुद्धिबळासाठी मारक ठरले.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वेळापत्रकातून गोव्यातील प्रतिष्ठेची ग्रँडमास्टर स्पर्धा गायब झाली. त्यांचे खंदे समर्थक किशोर बांदेकर यांचा महासंघावर राग आहे, कारण तेथील गटबाजीमुळे ते दोन वर्षांपूर्वी महासंघाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. महासंघाचे माजी सचिव भारतसिंह चौहान यांना शह देण्यासाठी बांदेकर यांनी खासदार तेंडुलकर व गोवा बुद्धिबळ संघटना यांना प्यादे केले.

तेंडुलकर यांनी तेव्हाच संबंधितांना खडसावले असते, तर आज संघटना गुण्यागोविंदाने नांदताना दिसली असती. शेवटपर्यंत एकसंध राहिलेल्या सात तालुका बुद्धिबळ संघटनांचा तेंडुलकर यांना विरोध नव्हता, ते ही बाब वेळोवेळी बोलून दाखवत होते. त्यांना माजी सचिव बांदेकर यांची कार्यशैली पसंत नव्हती व त्यांच्यासोबत काम करायचे नव्हते. त्यामुळे सात तालुका संघटनांत

भाजपशी जवळीक असलेली काही लोकं असूनही त्यांनी निवडणुकीत तेंडुलकर यांना मत दिले नाही, त्यांच्याकडे पाठ केली.

सरकारची तटस्‍थ भूमिका

राज्य सरकारनेही या प्रकरणात लक्ष घातले नाही किंवा ढवळाढवळ केली नाही हे चांगलेच झाले. त्यामुळे एकजूट दाखविलेल्या सात तालुका संघटना प्रतिनिधींवर डगमगण्याची पाळी आली नाही. १० ऑगस्ट २०२१ रोजी गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत अनैतिकतेची बिजे रोवली गेली आणि त्याचे समर्थन करण्याचा चुकी पायंडा पाडला गेला.

कार्यकारिणीतील बारापैकी सात जागा बिनविरोध ठरल्यानंतर महत्त्वाच्या अध्यक्ष, सचिव व खजिनदार या जागांसाठी प्रतिष्ठा पणास लागली. निवडणूक लढविणे हा लोकशाहीतील हक्क आहे.

मात्र, बुद्धिबळ संघटनेतील महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक होऊ नये यासाठी चार उमेदवारांचे अर्ज तेव्हाच्या निवडणूक अधिकाऱ्याने अखेरच्या क्षणी फेटाळले. ही पद्धत चुकीची होती हे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाच्या तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवाड्यावरून सिद्ध झाले.

ही तर धोक्‍याची घंटा...

सत्तेत असला तरी कायदा हातात घेता येत नाही किंवा त्यात हस्तक्षेप करता येत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो ही बाब बुद्धिबळ संघटनेतील एकंदरीत प्रकरणातून सिद्ध झाली आहे. बुद्धिबळ निवडणुकीत काही जणांनी अहंभावातून नीतीमत्ता बासनात गुंडाळून ठेवली नसती, तर खासदार तेंडुलकर यांना आज मानाने संघटनेचे अध्यक्षपद मिरवता आले असते.

असंगाशी संग केल्याने काय होते हे त्यांनी ऐव्हाना जाणलेच असेल. या महिन्यात तेंडुलकर यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपत आहे. त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते स्थानिक राजकारणात सक्रिय होऊ शकतात, तरीही भाजप त्यांच्याप्रति किती गंभीर आहे हे बुद्धिबळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट झाले आहे. बुद्धिबळ संघटनेतील पराभव तेंडुलकर यांच्यासाठी धोक्याचाच इशाराच आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT