Goa Cabinet Reshuffle Maharashtra Government
पणजी: गोव्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष देण्यास भाजप पक्षश्रेष्ठींना सध्या वेळ नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल थोडा लांबणीवर पडला आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सोडविणे, सध्या भाजप पक्षश्रेष्ठींसाठी प्राधान्याचा विषय बनला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे (शिंदे गट) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे बिहार पॅटर्नप्रमाणे शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवावे, अशी शिवसेनेची (शिंदे गट) मागणी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) भाजपचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
यामुळे मुख्यमंत्रिपदी कोण, हा पेच तेथे निर्माण झाला आहे. लोकसभेच्या उत्तर प्रदेशच्या खालोखाल ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्रातील राजकीय पेच हाताळावा लागत आहे.
त्यातच संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याने तेथे आक्रमक झालेल्या विरोधकांना तोंड देण्यासाठी रणनीती आखण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. या साऱ्यात गोव्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यामुळेच बहुचर्चित मंत्रिमंडळ फेररचना लांबणीवर पडली आहे.
मंत्रिमंडळ फेररचना हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीतील विषय असला तरी भाजप पक्ष संघटनेकडून त्यांना फेररचना आवश्यक असल्याचे संकेत देण्यात आले आहे. पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री यांची या विषयावर चर्चा झालेली नाही, अशी पक्षाची अधिकृत भूमिका असली तरी अशी चर्चा झाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, असा त्या चर्चेचा सूर होता. मध्यंतरी ‘विकसित गोवा २०४७’चे लक्ष्य गाठण्यासाठी मंत्रिमंडळ फेररचना आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मंत्रिमंडळ फेररचना लांबणीवर पडली आहे. मंत्रिमंडळात आपल्या आमदाराचा समावेश व्हावा, असे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांत त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे.
सभापती रमेश तवडकर यांनी सरकारच्या कारभाराचा योग्य शब्दांत पंचनामा केल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच सभापतींसह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे सोमवारी दिल्लीत असल्याने राजकीय चर्चेला तोंड फुटले. भाजप पक्षश्रेष्ठींना गोव्याच्या विषयावर चर्चा करण्यास वेळ नसल्याने त्याविषयी चर्चा झाली नाही आणि आणखी काही दिवस मंत्रिमंडळ फेररचना पुढे ढकलली गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.