Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; पुरुषांनी काय घोडे मारलेय?

Khari Kujbuj Political Satire: बेतोडा मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे पार मोडून गेले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे मुश्‍किलीचे ठरले आहे.

Sameer Panditrao

पुरुषांनी काय घोडे मारलेय?

मुख्यमंत्र्यांनी आज खासगी नोकरी करणाऱ्या महिलांना बस तिकिटात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. खरे तर शेजारच्या कर्नाटक राज्यात महिलांना प्रवास मोफत करण्यात आला आहे. अशा अनेक योजना केवळ महिलांसाठीच राबविल्या जातात... या विविध योजनांच्या लाभार्थी केवळ महिलाच का? पुरुषांनी कुणाचे काय घोडे मारले आहे... अशी मजेशीर चर्चा सध्या रंगत आहे. सरकार कोणाचेही असो योजना मात्र महिलांसाठी असे का..? किमान एक तरी अशी योजना आणावी ज्यात महिलांसोबत पुरुषही लाभार्थी असतील ∙∙∙

उशिरा सुचलेले शहाणपण

गोव्यात बहुतेक शहरांत डबघाईस आलेल्या जीर्ण इमारती आहेत. त्यातील काही सरकारी मालकीच्याही आहेत, पण लोकांसाठी धोकादायक ठरलेल्या इमारतींवर कारवाई करून त्या पाडाव्यात असे संबंधितांना काही वाटले नाही. त्यातील काही इमारती अर्धवट कोसळू लागल्या, नशीब की त्यात जीवितहानी झाली नाही. कारण त्या रात्रीच्या वेळी कोसळल्या. असे दोन प्रकार एकाच आठवड्यात मडगावात घडले. त्याला आता महिना-दीड महिना उलटला व आता कोठे जिल्हा प्रशासनाने अशा इमारती कोणाचीही वाट न पाहता जमीनदोस्त करण्याचे फर्मान काढले आहे, पण मुद्दा तो नाही तर हा धोका कळायला इतका काळ का लागला? आपत्कालीन व्यवस्थापनसारख्यांना वेळीच या बाबी लक्षात का येत नाहीत? एखादे झाड कमकुवत होऊन कोसळल्यावर अशा झाडांबाबत पावले उचलण्यासारखाच हा प्रकार नव्हे का? असे प्रश्न केले जाऊ लागले आहेत.∙∙∙

बैल गेला अन् झोपा केला!

बेतोडा मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे पार मोडून गेले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे मुश्‍किलीचे ठरले आहे, मात्र यासंबंधी स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर आता मशिनद्वारे रस्त्यांचे पॅचिंग करण्यास सुरवात झाली आहे. वास्तविक हे पॅचिंगचे काम पावसाळ्यापूर्वी व्हायला हवे होते, पण आता पाऊस सुरू झाल्यानंतर हे पॅचिंगचे काम सुरू झाल्यामुळे हे दुरुस्तीकाम किती काळ टिकेल, याबाबत सध्या चर्चा होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे असेच असते, बैल गेला आणि झोपा केला...!∙∙∙

चोरट्याचा पोलिसाला हिसका...

चोरटे आता पोलिसांनाही शिरजोर ठरू लागले आहेत. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर एका पोलिसांनी आपली बुलेट पार्क करून ठेवली होती. चोरट्याने या दुचाकीची बॅटरीच चोरून नेली. काम संपवून तो पोलिस आपली दुचाकी स्टार्ट करू लागला. मात्र, दुचाकी काही स्टार्ट होण्याचे नावच घेईना .त्यावेळी त्याला बिचाऱ्याला बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलिस असल्याने तक्रार कशी करणार. आपल्या सहकाऱ्यांना त्याने झालेली गोष्ट सांगितली. बिचाऱ्याने नंतर नवीन बॅटरी बसविली. आता तो चोरटा कधी हाती लागतो, या प्रतीक्षेत पोलिस आहेत. चुकून माकून तो चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याचे काही खरे नाही. पण तो सापडणार कधी, हाच तर खरा प्रश्‍न आहे. ∙∙∙

तवडकरांना लॉटरी?

सभापती रमेश तवडकर यांनी दोन तीन दिवस राज्याबाहेरील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना या दोन तीन दिवसांत राज्याबाहेर राहू नका, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे सभापती डॉ.रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रतिष्ठेचे सभापती पद कुणाकडे जाणार, त्या पदाला तवडकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती अबाधित राहील काय, हा प्रश्‍नही चर्चिला जात आहे. मात्र, बदल ही काळाची गरज असून ती होतच राहणार असाही कार्यकर्त्यांत सूर आहे. ∙∙∙

गुरांच्या सुरक्षेसाठी तुरुंगरक्षक!

कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. कारागृहातील ओल्या पार्ट्या, ड्रग्जची व मोबाईलची तस्करी हे तर नेहमीचेच झालेय. यावर तेथे असलेले कर्मचारीही कैद्यांबरोबर सामील असल्याने हे शक्य आहे, हे सर्वजणच मान्य करतील. मात्र आजपर्यंत या कारागृहाच्या अधिकाऱ्यांना या तस्करीवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. किती तरी तुरुंग कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई झाली आहे, मात्र ही कारवाई नाममात्र असल्याने हे कर्मचारी या कारवाईला घाबरत नाहीत. तुरुंग कर्मचारी व कैद्यांचे ‘सेटींग’ आहे, त्यामुळेच हल्ली कारागृहात असलेल्या गुराच्या गोठ्यात भरदिवसा ओली पार्टी सुरू असताना कोणाचेही लक्ष गेले नाही. जो तुरुंग रक्षक या गुरांच्या गोठ्याच्या ठिकाणी तैनात केला होता, तो असून नसल्यासारखाच होता. या गुरांच्या गोठ्याच्या ठिकाणी २४ तास एका तुरुंगरक्षकाची वर्णी लावलेली असते. या गोठ्यात दोनच गुरे आहेत व त्यांच्या सुरक्षेसाठी तुरुंगरक्षकाची वर्णी लावणे म्हणजे अधिकाऱ्यांनी तोडलेले अकलेचे तारे. कैद्यांच्या खोल्यांबाहेर सुरक्षिततेसाठी तुरुंगरक्षकांची कमतरता असताना गुरे पळून जातील, या भीतीपोटी या तुरुंगरक्षक तैनात करणे, चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙

स्मार्ट सिटीचे ‘कवित्व’

पणजीला स्मार्ट सिटी करण्याचा मुहूर्त २०१६ मध्ये लागला आणि अजूनही पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झालेली नाहीत. स्मार्ट सिटीवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण शहराचा चेरहामोहरा किती बदलला आणि त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन किती सुसह्य झाले, याची उत्तरे शोधावी लागतील. महत्त्वाची बाब म्हणजे सरकार आता पणजीनंतर म्हापसा, वास्को आणि मडगाव यांचा स्मार्ट सिटीत समावेश करण्याचा प्रयत्न असणार आहे. तिन्ही शहरे पाहिली तर तेथील रस्ते अरुंद आहेत, त्याशिवाय वास्को सारख्या शहरातून सांडपाणी व्यवस्था निर्माण करणे किती जिकिरीचे ठरू शकेल, हे पणजीतील कामांवरून स्पष्ट होते. शहरे जरूर स्मार्ट झाली पाहिजेत, पण त्यांची गत पणजीतील कामांसारखी होऊन चालणार नाहीत, म्हणजे अगोदर सुशोभिकरण आणि नंतर पायाभूत सुविधा, असा प्रकार पणजीत घडला आहे. त्यामुळे चार शहरे जरूर स्मार्ट करावीत पण त्या कामांची जबाबदारी पार पाडणारी संस्था पारदर्शकपणे काम करेल का, हा प्रश्न आहे.. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT