Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांची धावाधाव

Goa Latest Political News: प्रियोळातील माजी आमदार दीपक ढवळीकर गेले कुठे? असा प्रश्‍न विरोधकांसह मगोचे कार्यकर्तेही विचारत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांची धावाधाव!

सध्याचे दिवस हे दोतोर मुख्यमंत्र्याच्या कसोटीचे आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण तसे असले तरी दोतोराच्या चेहऱ्यावर मात्र तसे काहीच दिसत नाहीत. परवा विधानसभेत मीराबाग आंदोलकांनी दिलेल्या घोषणा व फडकावलेले फलक पाहून मात्र त्यांना संताप अनावर झाला खरा. पण एरवी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच दिसते. पण मुद्दा तो नाही, परवा कोणीतरी मुख्यमंत्र्यांनी मीराबाग आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत घालावी, असे विधान केल्याने आता प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सगळी कामे सोडून धावावे काय़ अशी विचारणाही होऊ लागली आहे. गेल्या महिन्यात युनिटी मॅालवरून सुरू केलेल्या आंदोलनकर्त्यांची तेथे त्यांनी भेट घेतली. त्यानंतर कलम ३९ए वरून उपोषण सुरू केलेल्या वीरेशरावांची समजूत घातली. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी समजूत काढावी, अशी मागणी तर पुढे आलेली नाही ना, असा मुद्दा सरकारसमर्थक करत आहेत. ती मान्य केली, तर आंदोलकांची समजूत मुख्यमंत्र्यांनी घालायची अशी प्रथा तर पडणार नाही ना? असेही म्हटले जाऊ लागले आहे. ∙∙∙

दीपक ढवळीकर गेले तरी कुठे?

प्रियोळातील माजी आमदार दीपक ढवळीकर गेले कुठे? असा प्रश्‍न विरोधकांसह मगोचे कार्यकर्तेही विचारत आहेत. कारण जिल्हा पंचायत निवडणूक काळात मगो-भाजप युतीमुळे ते बेतकी-खांडोळ्यात फिरकलेच नाहीत. युतीच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्ष उमेदवार सुनील भोमकर निवडून आले आणि भाजप गटाला त्यांनी समर्थन दिले. परवा झालेल्या पंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रियोळात गोविंद गावडे समर्थक सुलक्षणा गावडे जिंकल्या, कारण आमदार गावडेही सक्रीय असून त्यांचे वर्चस्वही त्यांनी सिद्ध केले. पण मगोचे अध्यक्ष दीपकराव मतदारसंघात फिरकलेच नाहीत. भोम-अडकोणमध्ये शाणू भोमकर त्यांच्या समर्थनाशिवाय पंचपदी निवडून आले. कारण जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी सक्रिय असून त्यांनी आपल्या बंधुराजाला (शाणू) विजयी केले, यातच भोमकरांचे वर्चस्व वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. पण प्रियोळातून पुन्हा विधानसभेसाठी पाचव्यांदा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असूनही ढवळीकर सध्या गायब आहेत, त्यामुळे मतदारांना त्यांचा विसर पडला तर त्यांचे भवितव्य काय? अशी चर्चा जाणकारात सुरू आहे. ∙∙∙

‘हम भी कुछ कम नही!

फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रितेश आणि रॉय या दोघांनी फोंड्यात भव्य महिलादिन कार्यक्रम आयोजित केला. वास्तविक रवी नाईक यांनीच महिलादिन कार्यक्रमाचे मुख्यमंत्री असताना संयोजन केले आणि ते पुढे सुरूच राहिले. फोंड्यातही रवी पात्रांव महिलादिन मोठ्या प्रमाणात साजरा करायचे. आता त्यांच्या पश्‍चात त्यांच्या दोन्ही पुत्रांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि प्रचंड संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून रवी पुत्रांचे कौतुकही केले. त्यामुळे रवी पात्रांवानंतर त्यांचे दोन्ही पुत्र ‘हम भी कुछ कम नही!, या भूमिकेत दिसले, हे उल्लेख करण्यासारखे. ∙∙∙

वातावरणाचा आढावा, चहाचा आस्वाद!

आजारामुळे रस्त्यावर उघडपणे प्रचार करण्यास टाळणारे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सायंकाळी आपल्या खास मर्जीतील लोकांना घेऊन पणजीतील एका हॉटेलमध्ये बसून निवडणुकीच्या वातावरणाचा आढावा घेतला. यात दोन माजी उपमहापौर, एक माजी नगरसेवक, एक विद्यमान उमेदवार आणि स्वीयसहायकाचा समावेश होता म्हणे. जवळपास अर्धा-एक तास निवडणुकीच्या विषयावर चर्चा त्यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या, बुधवारी मतदान होणार आहे. प्रचारकाळात ज्यांच्याकडे प्रभागांची जबाबदारी दिली आहे, त्यांच्याकडून मोन्सेरात माहिती घेत होते. रस्त्यावर प्रचारासाठी न उतरल्याने ही कामे चोखपणे पार पाडण्याची जबाबदारी ओळखून सर्वजण प्रसारमाध्यमांपासून दूर राहिलेही. परंतु आता या बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली म्हणून कोणाकडे बोट दाखवले जाऊ नये म्हणजे मिळवले. ∙∙∙

आंदोलनातील ‘तो’ किस्सा!

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांच्या वाढदिवसादिवशी कार्यालयात एका कार्यकर्त्याने एक किस्सा सांगितला. मडगावात लोहिया मैदानावर काही दिवसांपूर्वी मीराबाग बंधाऱ्याविरोधी आंदोलन झाले. सकाळी खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा हजर होते. त्यानंतर तेथे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर पोहचले, तेव्हा त्यांच्या सोबत युवक कॉंग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक व चिराग नायक हजर होते. आंदोलनकर्त्यासमोर भाषण करून पाटकर लगेच पणजीला निघाले, तेव्हा त्यांच्या सोबत आलेले अर्चित व चिराग हे सुद्धा निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी कॅप्टन विरियातो, सावियो डिसिल्वा व इतर आंदोलनकर्त्यांना मडगाव पोलिस स्टेशनवर आणले. तेथे संध्याकाळी उशिरा जेव्हा पाटकर आले, त्यावेळी परत अर्चित व चिराग तेथे हजर झाले म्हणे. शनिवारी रात्री पाटकर यांनी मीराबागवासींना घरी जाण्यासाठी मनधरणी केली, तेव्हा काहीजण उपस्थित होते. पण सकाळी उपस्थित असलेले युवा नेते यावेळी हजर नव्हते, हा किस्सा त्या कार्यकर्त्याने आवर्जून सांगण्याचे कारण काय? हे मात्र समजू शकले नाही. ∙∙∙

आग लावणारे हात अदृश्य

मीराबाग बंधारा हे खरे तर सगळ्यांसाठीच आता अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेले आहे. आता सरकारकडून होणाऱ्या जाहीर सादरीकरणानंतर तरी या समस्येवर तोडगा निघतो की काय? याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत. बंधारास्थळी जोपर्यंत आंदोलन सुरू होते, तोवर ठीक होते, पण ते आंदोलन मडगावात लोहिया मैदानावर का व कसे गेले. तसेच आंदोलक विधानसभेत कसे पोचले यावरील चर्चा मात्र आता वाढू लागली आहे. कारण आंदोलन सुरू करणे सोपे असते, पण त्यावर नियंत्रण ठेवणे, ही नेत्यांची कसोटी असते. कारण अशा आंदोलनातून काही जण आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात असतात. विधानसभेत आंदोलक गेल्याने त्याला वेगळीच दिशा मिळाली आहे. या लोकांच्या डोक्यात ती कल्पना कोणी भरवली ते आज ना उद्या उघड होणारच आहे, पण त्यातून एक वेगळी प्रवृत्ती तयार झाली आहे. कारण अशी आग लावणारे हात नेहमीच अदृश्य असतात, पण त्या आगीत समाज मात्र होरपळून जात असतो. ∙∙∙

राणे निर्णय घेणार?

माकडे तसेच इतर वन्यप्राण्यांकडून राज्यातील शेतीची होणारे नुकसान आणि त्याचा शेतकऱ्यांना बसणारा फटका रोखण्यात सरकारला अपयश येते, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये सातत्याने बोलतात. आपल्या मागण्यांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ‘केराची टोपली’ दाखवण्यात येत असल्यामुळेच आपल्याला हा विषय वारंवार सभागृहासमोर आणावा लागत असल्याचेच ते मंगळवारी सभागृहाला ते सांगत होते. हा विषय गंभीर असल्याने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही वनमंत्री विश्वजीत राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला. पण, आपल्या बदललेल्या शैलीत सर्वांच्या सूचना मान्य करून राणेंनी या विषयावर पडदा टाकला. आता शेट्येंकडून हा विषय अनेकदा आल्याने आणि ही कामे वन अधिकाऱ्यांची असल्याने राणे त्य‍ांच्याबाबतीत काय निर्णय घेणार? याकडे जनतेचे लक्ष असेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: 'अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ नसून राज्याचे आर्थिक नियोजन'! CM सावंतांनी ठणकावले; काल विधानसभेत काय घडले? वाचा..

Panaji Municipal Elelction: पणजी महानगरपालिकेवर कुणाची सत्ता? निर्णय होणार मतपेटीत बंदिस्त; 48 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT