Goa Budget 2024: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा गुड फॉर नथींग असून, लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणांवरील कृती अहवालाने भाजप सरकार नापास ठरल्याचे दिसून येते असेही आलेमाव म्हणाले.
मोठी घोषणा शून्य पूर्तता हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे धोरण आहे. 2024-25 साठी 26,855.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प ‘गुड फॉर नथींग’ आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
तसेच, 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणांवरील कृती अहवालाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार नापास ठरले आहे. आर्थिक वर्षात केवळ 27.9 टक्के घोषणाच प्रत्यक्षात उतरल्या आहेत. 390 घोषणांपैकी केवळ 109 पूर्ण झाल्या, 279 पूढे चालीस लागणार आहेत आणि 2 सरकारने रद्द केल्या आहेत, असे आलेमाव म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत इव्हेंटमधून फ्री होऊन राजकोषीय व्यवस्थापनीकडे केव्हा लक्ष देणार? पैसे काढा आणि खर्च करा असा एक कलमी कार्यक्रम या भ्रष्टाचारी आणि बेजबाबदार सरकारचा झाला आहे. 2024-25 सालचा वार्षिक अर्थसंकल्प देखील अपयशी ठरेल, अशा शब्दात गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
दरम्यान, गुरुवारी अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 26,855 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात भांडवली खर्च 6,855 कोटी रुपये, महसुली खर्च 20 हजार कोटी, महसुली अधिक्य 1,704 कोटी रुपये आणि राजकोषीय तूट 3,149 रुपयांची असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.