Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: तानावडेंची तत्परता

Khari Kujbuj Political Satire: भाजपमध्ये आल्यानंतर निष्ठा दाखवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचालनाचा सहारा काही जणांनी घेतला होता. त्यात काही मंत्री आमदारांचाही समावेश होता. संघाच्या गणवेशात संचलन करतानाची त्यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर चर्चेची ठरली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

तानावडेंची तत्परता

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. गणवेश परिधान करून यापूर्वी ते अनेक कार्यक्रम व संचलनातही सहभागी झालेले आहेत. शनिवारी म्हापशात संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम झाला. त्याला तानावडे पांढऱ्या शुभ्र कुर्ता पायजमा या पेहरावात उपस्थित होते. ते गणवेशात का आले नाहीत याची एक चर्चा नंतर ऐकू आली. काहींच्या म्हणण्यानुसार त्यांना अन्य कार्यक्रमासाठी जाण्यास गणवेश बदलण्यासाठी वेळ नसावा म्हणून ते गणवेशात आले नसावेत. धावपळीत असतानाही ते संघाच्या कार्यक्रमाला आवर्जून आल्याची चर्चाही ऐकू आली. तानावडे यांच्याविषयी संघ परिवारात चाललेली ही चर्चा तानावडे यांना सुखावून गेली असणार एवढे नक्की. ∙∙∙

ते मंत्री गेले कुठे?

भाजपमध्ये आल्यानंतर निष्ठा दाखवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचालनाचा सहारा काही जणांनी घेतला होता. त्यात काही मंत्री आमदारांचाही समावेश होता. संघाच्या गणवेशात संचलन करतानाची त्यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर चर्चेची ठरली होती. आपण पूर्वीपासून संघ शाखेवर कसे जात होतो याविषयी त्यांनी सांगितलेल्या कहाण्या अनेकांना अचंबित करून गेल्या होत्या. आता ते मंत्री व आमदार कुठे गेले हा प्रश्न खुद्द संघाच्या अधिकाऱ्यांना पडला नसला तर नवल. विजयादशमीच्या संचलनाकडे यापैकी बहुतेकांनी पाठ फिरवली होती. ते कुठेच दिसले नसल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वातावरण कूस बदलत असल्याचा हा परिणाम असावा असेही बोलले जाऊ लागले आहे. शनिवारी या आमदार, मंत्र्यांनी संचलनाला मारलेली दांडी राज्यभरात चर्चिली जात होती. ∙∙∙

दिगंबर आणि मोतीडोंगर

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना त्यांचे मोतीडोंगरशी असलेल्या संबंधांमुळे कित्येकवेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे. काल या मोतीडोंगरावर उभारलेल्या नव्या पोलिस चौकीचे उद्‍घाटन करताना कामत यांनी स्वतःच त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपण पहिल्यांदा नगरसेवक झालो तो याच मोतीडोंगरावरून. तेव्हापासून आपला या भागाशी जवळचा संबंध असून या वस्तीने आपली कधीही साथ सोडली नाही. जे कोण माझ्याबरोबर असतात त्यांना मी कधीच सोडत नाही. हा मोतीडोंगर चांगल्या कामांसाठी लोकांच्या लक्षात रहावा एव्हढीच आपली इच्छा आहे. कुणीही मोतीडोंगर फोडायचा प्रयत्न केला, तरी कुणी ते करू शकत नाही हेच कामत यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केलाच. ∙∙∙

अजय देवगणचा व्हिला ‘बुकिंग’वर

अजय देवगण आणि काजोल यांच्याकडे आता गोव्यातील एक आलिशान मालमत्ता आहे, ज्याचे नाव ‘व्हिला एटर्ना’ असे आहे. हा उत्कृष्ट व्हिला बॉलिवूड जोडप्याच्या भव्य जीवनशैलीची एक झलक देते, जे सहसा समुद्रकिनाऱ्याच्या बाजूच्या राज्याला भेट देतात तेव्हा येथे राहतात. या व्हिलामध्ये पाच बेडरूम, एक खासगी पूल आहे, जो सौंदर्यात्मक गॅझेबोशी जोडलेला आहे. व्हिलाचा मुख्य शयनकक्ष एका खासगी बागेत उघडतो, ज्यामध्ये एक शांत पाण्याच्या भिंतीचे कारंजे आहेत. पोर्तुगीज शैलीत बनवलेल्या या व्हिलामध्ये सर्व आधुनिक सुविधा आहेत. हा व्हिला म्हणे भाड्याने दिला जातो आणि त्यासाठी ५० हजार रुपये प्रति दिवसासाठी आकारले जातात. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिला पर्यटन खात्याकडे नोंद झाला आहे का? झाला नसेल, तर पर्यटन खात्याला अजय देवगण यांना नोटीस बजावावी लागेल. यापूर्वी पर्यटन खात्याने क्रिकेटपटू युवराज सिंगला राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदणी न करता ऑनलाइन होमस्टेसाठी मोरजी येथील आपला व्हिला ठेवल्याबद्दल नोटीस बजावली होती. अजयने ही नोंदणी केली नसेल, तर त्यांना पर्यटन विभागाकडे होमस्टेची नोंदणी गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, १९८२ अंतर्गत अनिवार्य आहे, हे त्यांच्या सल्लागाराने सांगितले नसावे का? ∙∙

बाबूंवर गुन्हा का नोंद नाही?

सुभाष वेलिंगकर यांना अटक करा अशी मागणी करून रस्त्यावर आलेल्या प्रतिमा कुतिन्हो आणि अन्य ५०० आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याच आंदोलनात अजूनही भाजप पक्षात असलेले बाबू आजगावकर यांनीही भाग घेतला होता, पण मडगाव पोलिसात बाबूंवर गुन्हा नोंद केलेला नाही. जो न्याय आपल्याला लागू होतो, तो बाबू आजगावकर यांना का लागू होत नाही याच प्रश्नाने प्रतिमाताईंना सध्या अस्वस्थ केले आहे म्हणे. ∙∙∙

माविनची कानडी

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना आपल्या मतदारांची नाडी व्यवस्थितपणे कळलेली आहे. राज्यात कोणीही कितीही भाषक अस्मितेच्या गोष्टी केल्या तरी आपल्या मतदारांना कोणती भाषा चांगली समजते हे त्‍यांना पक्के ठाऊक आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या प्रचार दौऱ्यात त्यांनी सर्रासपणे हिंदी भाषेचा उपयोग संवाद साधण्यासाठी केला होता. आता नवरात्रोत्सवात गरब्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्यांना त्यांनी कानडीत साद घातली आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कोणत्याही पक्षात गेले तरी जिंकून येण्याची क्षमता असलेल्या दोन - तीन नेत्यांत माविन यांचा त्यामुळेच समावेश होतो. गोव्याचे रूप आता कसे बदलत चालले आहे याचे दर्शन यानिमित्ताने घडले आहे. यापुढे मतदारांना लुभावण्यासाठी प्रादेशिक भाषेची अस्मिता नेत्यांना बाजूला ठेवावी लागणार असल्याची ही चाहूल आहे आणि भाषेवरून रणकंदन माजवणाऱ्यांसाठी हा इशारा पुरेसा ठरावा असाच आहे. ∙∙∙

उशिराचे शहाणपण

कदंब वाहतूक महामंडळाची १९८० मध्ये स्थापना झाली. तेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे निश्चित केले होते. आज ४० वर्षानंतरही महामंडळाचा पाय खोलातच आहे. आता रस्ते अपघात वाढल्यानंतर रस्त्यावरील दुचाकींची संख्या घटली पाहिजे याचा शोध सरकारने लावला आहे. त्यासाठी आधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे. पर्वरी हा भाग पणजीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. पणजी ते पर्वरी अशी सार्वजनिक व्यवस्था अजून नाही. रात्री उशिरा दोन महत्त्वाची शहरे जोडणारी बससेवाही नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता रस्ते अपघात कमी करण्याचे स्वप्न पाहता येणार नाही. सरकारला हे उशिराने शहापण सुचले असले तरी कदंबला ऊर्जितावस्था आणण्यासाठी बस मिळवण्यासाठी सरकार केवळ आयआयटी माजी विद्यार्थी संघटनेच्या भरवशावर राहणार की स्वतः हातपाय हलवणार अशी विचारणा आता यानिमित्ताने होऊ लागली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT