Goa Congress: गोव्यातील भाजप सरकार हे एकमेव सरकार आहे ज्याला राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि लोकायुक्त यांच्याकडून “भ्रष्टाचाराचे प्रमाणपत्र” मिळाले आहे. कॅबिनेट मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी आपल्या सहकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला आहे.
पंचायत आणि नगरपालिका निवडणुकीतील भाजप सरकारच्या असंवैधानिक कारभारावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.
गोव्यातील भाजप सरकारच्या या यशाबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली आहे.
मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
भाजपचा ‘विकसित भारत’ हा कोकणी भाषेतील ‘घर मोडून माटोव घालप’ या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे आहे.
भाजपने मडगाव बसस्थानक बंद करुन तेथील लहान व्यापाऱ्यांवर अन्याय केला आहे असे ते म्हणाले. तसेच मडगाव येथील बसस्थानकाचे स्थलांतर करून मंडप उभारल्याने नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे अमित पाटकरांनी लक्ष वेधले.
मडगावातील "विकसीत भारत" रॅलीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेदांता, जेएसडबल्यू व अदानी सारख्या भांडवलदाराना गोवा सरकारचे मागील कित्येक वर्षाचे देय फेडण्याचा आदेश देतील की त्यांचे देय माफ करण्याची घोषणा करतील? असा खोचक सवाल अमित पाटकर यांनी केला.
गोव्यावर आज 36000 कोटीचे कर्ज आहे, त्यामुळे प्रत्येक गोमंतकीयांवर 2.20 लाखांचा बोजा आहे. यावरुन केंद्रातील मोदी सरकारचा गोव्याला भक्कम पाठींबा मिळत असल्याचा दावा फोल ठरत असल्याचे अमित पाटकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.