BJP |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics Latest News: ‘भाजप है तो मुमकीन है’ 'खरी कुजबुज'

इफ्फीत आयनॉक्समसोर ‘एल’ आकाराची रेड कार्पेट सध्या वादाचा मुद्दा आहे

दैनिक गोमन्तक

Goa Politics : इफ्फीत आयनॉक्समसोर उभारण्‍यात आलेल्‍या ‘एल’ आकाराची रेड कार्पेट सध्या वादाचा मुद्दा बनली आहे. रेड कार्पेटच्‍या मध्यभागी आयनॉक्सच्या स्क्रीन एक ते चारकडे येजा करण्यासाठी मार्ग ठेवला आहे.

परंतु या रेड कार्पेटवरून कोणी महनीय व्यक्ती येणार असेल, तर हा मार्ग अगोदरच पाच ते दहा मिनिटे बंद केला जातो. त्यामुळे प्रतिनिधींना आयनॉक्सच्या तीन व चार या स्क्रीनकडे जाण्यासाठी ईएसजीच्या बाहेर येऊन पश्‍चिमेकडील मार्गावरून यावे लागते. त्यावरून अनेकदा तेथील खासगी सुरक्षारक्षकांशी प्रतिनिधींचे खटके उडू लागले आहेत.

अशाच एका प्रतिनिधीने ‘असा मार्ग ठेवण्यापेक्षा या ठिकाणी पूल उभा करायचा होता, म्हणजे त्याखालून लोकांना येजा करणे शक्य झाले असते’ असे म्‍हटले तर दुसऱ्या एकाने ‘भाजप है तो सब मुमकीन है’ म्हणत नियोजनाची टर उडविली.

पेडणे पालिकेत दारूचा घमघमाट!

पेडणे पालिका कार्यालयातील एक कर्मचारी दररोज कामावर दारू ढोसून येतो. त्यामुळे अन्‍य कर्मचाऱ्यांना या उग्र वासाचा मारा सहन करत काम करावे लागते. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, रस्त्यावर साफसफाई करताना अगोदरच आम्हाला दुर्गंधी सहन करावी लागते.

त्‍यानंतर काही काळ कार्यालयात कामासाठी आलो तर या दारुड्या कर्मचाऱ्याचा त्रास. आम्‍ही जावे तरी कोठे आणि करावे तरी काय, असा उद्विग्न सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला आहे. आता पालिका मंडळानेच हा अंतर्गत प्रश्‍‍न सोडवावा, अशी कुजबूज पालिकेत सुरू आहे म्‍हणे.

आयजीच्‍या जीवावर बायजी उदार!

खाणी लवकरच सुरू होणार असल्‍याचे वृत्ताने खाणपट्ट्यात खुशीच वातावरण आहे. मात्र खाणी सुरू करण्यासाठी सरकारने कार्यवाही सुरू केली असली तरी ज्यांच्‍याकडे खाणींचा ताबा होता, त्यांच्याकडून खाण अवलंबितांना अनेकबाबतीत देणे येणे आहे.

उदाहरण द्यायचेच झाले तर भाडेपट्टीवर जमिनी घेऊन काही खाण कंपन्यांनी खनिजमाल साठविण्यासाठी प्लॉट तयार केले, काही ठिकाणी जेटी उभारल्या. पण ज्यांच्या जीवावर हे खाणमालक अरबपती झाले, त्या सर्वसामान्य भूमिपुत्रांना मात्र ते विसरले. 2012 मध्ये खाणी बंद झाल्यानंतर जमिनी घेतलेल्या भाडेकरूंना एक पैसाही आम्‍ही देणे नाही, असे हे खाणमालक सांगत आहेत.

आता तुमचा कोट्यवधींचा खनिजमाल आम्ही आमच्या जमिनीवर ठेवला आणि खाणी बंद झाल्याबरोबर तुम्ही हात वर करता काय, असा सवाल या भूमिपुत्रांकडून उपस्‍थित केला जात आहे. मुख्यमंत्री साहेब, ऐकताहात ना?

सुदिनरावांचा ‘साधा’ वाढदिवस!

मंत्री सुदिन ढवळीकरांचे नेहमीच काही तरी वेगळेच असते. ते आपला वाढदिवस जाहीररीत्या कधी साजरा करीत नाहीत. एरवी राजकारणी म्हटल्यावर वाढदिवसावर जास्त भर देतात.

निवडणूक जवळ आली रे आली की वाढदिनाचे भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून मतदारांना दिपवून टाकतात. पण सुदिनरावांचे तसे नाही. त्यांचा वाढदिवस हा कुटुंबापुरता मर्यादित असतो. आतापर्यंत त्यांनी कधी आपला वाढदिवस जाहीररीत्या साजरा केलेला कुणी पाहिलेला नाही.

तेही खरेच म्हणा. उगाचच वाढदिनाचा बाऊ करून इतरांना खर्चात घालणे त्यांना आवडत नाही. सुदिनराव वाढदिन साजरा करीत नाही म्हटल्यावर त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते मात्र हिरमुसतात. पण एका अर्थाने ते बरोबर आहे, नाही का?

‘त्या’ बाईची कुंकळ्‍ळी भक्ती!

कुंकळ्‍ळी बाहेरील एका बाईने कुंकळ्‍ळीत येऊन तेथील एनआयटी प्रकल्पावर एका न्यूज चॅनलवर बोलताना टीका केली. ही बाब काही स्वाभिमानी भाजप कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नाही.

‘कुंकळ्‍ळी एनआयटीत स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तसेच हा प्रकल्प स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे, सरकारने कुंकळ्‍ळीकरांना फसविले’ असे बरेच काही त्या समाजसेवी बाई चॅनेलच्या कॅमेऱ्यापुढे बडबडल्या.

कुंकळ्‍ळीकरांच्‍या समस्यांवर बोलणाऱ्या या बया कोण? वास्कोहून कुंकळ्‍ळीत येण्याचे कारण काय? असे प्रश्न स्थानिक विचारत आहेत. नको तिथे नाक खुपसल्यामुळे सध्‍या ती बाई ट्रोल होऊ लागली आहे.

पत्रकार कक्षात आगंतुक पाहुणे!

इफ्फीच्या उद्‍घाटन समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेल्या डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष दिला होता. शिवाय ‘बी’ सीरियलच्या पासवर ‘प्रेस’ म्हणून लिहिण्यात आले होते. परंतु ज्या लोकांना हे पास देण्यात आले नव्‍हते, ते लोकही सर्रासपणे प्रसारमाध्यमांच्या कक्षेत पहिल्या काही रांगा अडवून बसले होते.

ही मंडळी कोणातरी राजकारण्यांकडून पास घेऊन आलेली होती. त्यात काही व्यावसायिकही होते. काही पत्रकारांनी पहिल्या रांगांमध्‍ये बसलेल्या अशा लोकांना हटवा म्हणून संबंधितांना सांगितले. तेथील प्रतिनिधींनी ध्वनिक्षेपकावरून त्यांना पाठीमागे जाऊन बसण्यास विनंती केली.

पण ही मंडळी काही हलली नाही. सरकारी पाहुणे असल्यासारखे ती तेथेच बसून राहिली. ही एक प्रकारची दादागिरीच नव्‍हे का?

ईएसजी सदस्य फक्त नावालाच!

गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीकडे नेहमीच बोट दाखविले जाते. सत्तेवर असलेल्‍या सरकारच्‍या मर्जीतील मंडळींनाच या मंडळावर घेतले जाते, असे बोलले जाते.

परंतु यावर्षी ज्या काही सदस्यांची वर्णी या मंडळावर लागलेली आहे, त्यातील अनेकजण नाराज आहेत. काहींना इफ्फीपूर्वीच्या बैठकांनाही साधे बोलविण्यात आले नाही. शिवाय त्‍यांना इफ्फीचे पासही देण्यात आलेले नाहीत. या सदस्यांकडे त्यांच्या काही समर्थकांनी पासबाबत विचारणा केली, तेव्हा त्‍यांना म्‍हणे तोंड लपवावे लागले. ‘आम्हाला कोणी विचारतच नाही.

नावालाच आमची निवड झालेली आहे’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्‍यातील काही सदस्यांनी आपल्‍या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली आहे म्‍हणे. मनोरंजन संस्थेच्‍या कार्यकारिणीवर निवड होऊन काय फायदा, असा प्रश्‍न त्यांना पडलेला आहे.

सीसीटीव्‍ही ठरले शो-पीस?

राजधानी पणजीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था हाताळण्‍यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्‍यात आलेले हे महागडे कॅमेरे कधी सुरू होतील याची प्रतीक्षा लोकांना लागून राहिली आहे.

कॅमेरे सुरू करण्याचा खरोखरच मनसुबा आहे की, हे देखील ‘पांढरा हत्ती’ ठरतील, असा प्रश्‍‍न सध्‍या विचारला जात आहे. कॅमेरे सक्रिय झाल्यास त्‍याचे अनेक फायदे होतील. पण सध्या तरी ते शो-पीस असल्यासारखे ठेवलेले आहेत, अशी कुजबूज सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT