आपल्या मनासारखे नेहमी होणारच याची गॅरंटी नसते. आता हेच पाहा. राज्यातील चाळीसही आमदारांना व त्यांच्या समर्थकांना वाटते की त्यांच्या आमदारांना मंत्रिपद मिळावे. मंत्रिपद असल्यास मतदारसंघाचा, मतदारांचा आणि आमदारांचा विकास झपाट्याने होतो याचा अनुभव सगळ्यांनाच आहे. आता गोव्यात मंत्रिमंडळ बदल होणार अशी हवा आहे. मडगावच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी सरळ नसले तरी इंडायरेक्ट जाहीर केलेच आहे. आता काणकोणचे ‘श्रम धाम फेम’ आमदार व सभापती रमेश तवडकर यांनाही मंत्रिपद मिळणार अशी हवा असल्यामुळे समस्त काणकोणकर नसले तरी रमेश समर्थक खूष आहेत. मुख्यमंत्र्यांनी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे जाहीर कौतुक केल्यामुळे व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सुभाष यांना उत्कृष्ट मंत्री असे जाहीर प्रमाणपत्र दिल्यामुळे सांगेकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुभाष फळदेसाई यांना प्रमोशन देणार व चांगले खाते मिळणार म्हणून सुभाष समर्थक खूष आहेत. आता पाहुया कोणा कोणाला ‘अच्छे दिन’ येतात. ∙∙∙
राज्यात देश-विदेशातून पर्यटक येतात, या पर्यटकांचा ओढा अधिकतर किनारी भागात असतो. विदेशी पर्यटकांची संख्या घटली किंवा वाढली याचा खोलवर अभ्यास यंत्रणेने करणे आवश्यक आहे, परंतु जे विदेशी पर्यटक गोव्यात येतात, ते जे येथील व्हिडिओ तयार करतात. त्यातून येथील चांगल्याच गोष्टी चित्रित होतील, असेही नाही. गोव्यातील समस्यांही ते चित्रित करतात. सध्या बागा किनाऱ्यावर गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याच्या आणि गुटख्याची पाकिटे किनाऱ्यावर पडल्याचा दाखविणारा विदेशी पर्यटक महिलेचा व्हिडिओ येथील सर्वांचेच डोळे उघडणारा आहे. एका बाजूला एका नेटधारकाने आपल्या ब्लॉगवरून गोव्यातील पर्यटक कमी झाल्याचे वृत्त दिले आणि इकडे राज्याची बदनामी झाल्याचे म्हणत त्याच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात आले, परंतु किनाऱ्यावरील अस्वच्छतेवर केलेल्या त्या पर्यटक महिलेच्या व्हिडिओवर आता पर्यटन खाते काय पावले उचलणार आहे, हे काही दिवसांत दिसेलच. ∙∙∙
राज्यातील सरकारी कर्मचारी सुस्त होऊन काम करत असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. सरकारने रहिवासी, जाती प्रमाणपत्र यासारख्या सुविधांसाठी ऑनलाइन सेवा करून प्रक्रिया अधिक सुलभ केली. तरीदेखील काही कर्मचारी आपले काम योग्यरीत्या करत नसल्याने कामासाठी वारंवार जाऊन सांगण्याची वेळ जनतेवर आली आहे. खरे म्हणजे सरकारी कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाही. करदात्यांच्या पैशांनी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. याचा विसर त्यांना पडू नये. एखाद्याने आपल्याच कामासाठी वारंवार येऊन काम करून घेण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन ते केले जाईल याची खात्री केली पाहिजे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जनता जागृत होत असल्याने कर्मचाऱ्यांना थेट जाब विचारला जाईल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत. ∙∙∙
सरकारी काम आणि महिनोंमहिने वाट पाहात थांब अशी एक म्हण आहेच. सध्या गोव्यात ठिकठिकाणी रस्ते फोडून ठेवले आहेत. त्यामुळे गोवेकरांना या म्हणीची पदोपदी आठवण येऊ लागली आहे. कोलवा येथेही असाच रस्ता खणला असून लोकांचे लक्ष त्याकडे वेधण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बॅरीकेडही घातले आहेत. त्यावर एकाने ‘सावधान! आत सरकार झोपले आहे’ असा फलक लावून सर्वांचे या सरकारी अनास्थेकडे लक्ष वेधले आहे. म्हणतात ना ‘जब सरकार सोती है तब जनता को ही जागना पडता है!’ ∙∙∙
राज्यातच नव्हे, तर देशात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटिल व धोकादायक बनत चालली आहे. एखादी घटना घडली की सरकारला जाग येते. मात्र, त्याला दिवस उलटून गेल्यावर त्याचे सोयरसुतक कोणालाच राहत नाही. दीड वर्षाच्या मुलीचे कुत्र्यांनी चावे घेऊन लचके तोडले ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. या भटक्या कुत्र्यांना काही लोक रात्रीच्यावेळी रस्त्यावर उरलेसुरलेले अन्न आणून त्यांना खायला घालतात. ज्या ठिकाणी हे अन्न घातले जाते तेथे कुत्र्यांचा घोळका असतो. त्यामुळे अनेकदा हे कुत्रे अंगावर आल्यावर चालत जाणाऱ्यांची पळापळ सुरू होते. ते दुचाकीस्वारांच्या मागे लागून अपघातही घडले आहेत. कुत्र्यांना मारण्यास बंदी असल्याने त्यांचे निर्बीजीकरण केले जाते व त्यांना पुन्हा सोडून दिले जाते. मात्र, त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही तर अधिक कठीण होतो आहे. पशुसंवर्धन खाते किंवा त्या परिसरातील राजकारणी घटनेपुरता आवाज उठवतात व त्यानंतर हा आवाज कायमचा बंद होतो. कुत्र्यांनी चावे घेतलेल्या घटना घडत असल्या तरी सरकार केव्हा जागे होणार? ∙∙∙
काही राजकारण्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे दिसते. भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच डबल इंजिन सरकारचे गोडवे गाताना दिसतात आणि तसे करावेही. मात्र, केंद्रात वेगळा विचार आणि राज्यात दुसरा विचार असे झाले की ती हिपोक्रॉसी झाली नाही का? केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेला विरोध केला आहे. काँग्रेसने जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती, त्याला भाजपाने कडवा विरोध केला होता. आपल्या गोव्यात मात्र भाजपाचे नेते जातिनिहाय जनगणनेबाबत वेगळाच राग आवळताना दिसतात. भाजपचे ज्येष्ठ नेते दयानंद मांद्रेकर, भाजपा सोडून पुन्हा भाजपाच्या दरवाजावर असलेले किरण कांदोळकर, भाजपाचे इतर भंडारी समाजातील नेते राज्यात भंडारी समाजाची जनगणना करण्याची मागणी करतात. या मागणीवर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री कठोर का नाहीत. ज्याला पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विरोध आहे ती मागणी तुम्ही केलीच कशी असा दम भाजपाच्या माजी आमदारांना पक्षाध्यक्षांनी का दिला नाही? असे आम्ही नव्हे भाजपा कार्यकर्तेच विचारत आहेत. दामबाब ऐकताय ना? ∙∙∙
गोवा विद्यापीठाच्या जागेवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम बांधताना सरकारला भविष्यात हे स्टेडियम हद्दवादाचे कारण ठरेल असे वाटले नसेल. हे स्टेडियम बांबोळी म्हणजे ताळगाव मतदारसंघात येते की सांताक्रुझ मतदारसंघात येते याचा वाद सुरू झाला आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणालाही याची नीट माहिती नाही. आजवर ते स्टेडियम बांबोळीत आहे असे म्हणण्यात येत होते. मात्र, ते प्रत्यक्षात सांताक्रुझमध्ये येते असा दावा केला गेल्याने हद्दीचा वाद सुरू झाला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.