
भक्तांच्या भक्तीला मर्यादा नसतात, असे म्हणतात ते खरे. गोव्यात मंदिरात व गावात होणाऱ्या उत्सवाच्या वेळी देव देवतांना अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पुकारला जातो ज्याला ‘पावणी’ म्हणतात. उत्तर गोव्यातील एका मंदिरात सत्यनारायणाची पूजा होती. पूजा झाल्यावर पावणी झाली.त्या पावणीत एका दानशूर भक्ताने म्हणे सत्यनारायण पूजेचा नारळ चक्क दहा लाखांचा घेतला. याचा अर्थ पंचवीस रुपयांनी सुरू झालेला लिलाव दहा लाखांवर येऊन थांबला.धन्य तो भक्त ज्याने नारळ घेतला आणि धन्य ते भक्त ज्यांनी एवढी पावणी लावून धरली. ∙∙∙
बुडत्याला काडीचा आधार, अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे. गोव्यात रोमी लिपीलाही राजभाषेचा दर्जा द्या, असे म्हणणाऱ्या ग्लोबल लिपी अभियान यांचेही असेच झाले असावेसे वाटते. याचे कारण म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जो उर्दूचा वापर केला जात आहे त्याला दिलेली मान्यता. अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेत उर्दूतील माहिती फलक लावल्याने प्रशासनाने त्याला हरकत घेतली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कुठलीही भाषा त्या भागात प्रचलित असल्यास तिचा सूचना फलकावर वापर करणे कायदाबाह्य नाही, असा आदेश दिला. यामुळेच गोव्यातील रोमीवादींना हर्ष झाला आहे. महाराष्ट्रात जर उर्दू चालते, तर गोव्यात रोमी लिपीतील कोकणी का चालत नाही? असा त्यांचा प्रश्न आहे. एकंदरच सध्या ‘बुडत्या राेमीला उर्दूचा आधार’ मिळाला असेच म्हणायचे का? ∙∙∙
भाजपातर्फे सध्या राज्यांत मतदारसंघवार कार्यकर्ता मेळाव्यांची धूम सुरू आहे. तसाच एक मेळावा परवा मडगावात झाला व त्याला प्रतिसादही म्हणे जबरदस्त लाभला. दिगंबर पात्रांवाच्या भाजप्रवेशानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने अनेकांच्या नजरा त्याकडे खिळून होत्या. पण नेहमीप्रमाणे बाबांनी आपल्या संघटन कौशल्याची प्रचिती सर्वांनाच आणून दिली. पण मुद्दा तो नाही, तर प्रदेशाध्यक्ष दामू यांनी त्या मेळाव्यात घरभेद्यांना पक्ष सोडल्यास हरकत नाही, असा जो इशारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण बाबांच्या घरवापसीनंतर पक्षात जुने-नवे असे गट-तट अवश्य आहेत व प्रत्येकवेळी ते दिसतात. पण त्यांत घरभेदी कोण, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. दामूंचा हा इशारा जुन्या मंडळींना आहे की, हल्लींच्या काळांत पक्षात आलेल्यांना आहे, अशी चर्चा या मेळाव्यानंतर सुरु झाली आहे. म्हणजेच पक्षात सर्व काही आलबेल नाही, असेच तर दामूंना सुचवायचे नाही ना, असेही विचारले जात आहे. ∙∙∙
कला अकादमीच्या मंचावर ‘पुरुष’ नाटक जरी बंद पडले तरी गोविंदाचे ‘तो मी नव्हेच’ नाटक गाजले,अशा शब्दांत नाट्यप्रेमी मंत्री गोविंद गावडे यांना ट्रॉल करू लागलेत. शरद पोंक्षे यांच्या ‘पुरुष’च्या प्रयोगावेळी प्रकाश योजनेत बिघाड झाल्याने नाट्य रसिकांचा हिरमोड झाला होता. पदरमोड करून नाटक पहायला आलेल्यांना नव्या कोऱ्या कला अकादमीच्या प्रकाश योजनेने दगा दिल्याने दिग्दर्शक त्याच्या विरोधात बोलणारच. मात्र, ती कला अकादमीची चूक नव्हती दिग्दर्शक शरद पोंक्षे इतरांच्या प्रभावाखाली येऊन आरोप करतात, असे म्हणून मंत्री गावडे यांनी जी सारवासारव केलीय. ती निश्चितच योग्य नाही. गावडे साहेब चुकीची कबुली देण्यात मोठेपणा असतो. प्रत्येकवेळी ‘विक्टीम कार्ड’ खेळले की आपली सुटका होईल, असा चुकीचा समज करून घेणं बरं नव्हे. कला अकादमीचे आरोग्य ठीक नाही, हे सत्य स्वीकारा. उगाच ‘उलटा चोर कोतवाल को डॉंटे’ असे वागणे योग्य नव्हे. असे नाट्य प्रेमी म्हणू लागलेत. ∙∙∙
गोव्यात सध्या अनेक ठिकाणी साधन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून थोडा त्रास होत असला तरी चांगल्या कार्यासाठी कळ सोसण्याची तयारी लोकांनी दाखवली आहे. परंतु सरकारचा लाडका असलेला कंत्राटदार सध्या दाबोळी येथे काम करत असल्याने आता त्याच्या देखरेखीखाली काम केले जात आहे. येथे बॅरिकेड कोसळून एका मृत्यू झाला, तर आज जलवाहिनी तोaडून वास्कोवासीयांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य या थोर कंत्राटदाराने केले. अत्याधुनिक युगात जलवाहिनीच्या खालील माती काढल्याने हे कृत्य झाले. या कंत्राटदाराच्या आणखी एक तुरा जोडला गेला. आणखी किती काळ या व्यक्तीमुळे गोमंतकीयांची फरफट होणार देव जाणे, अशी चर्चा रंगली आहे. ∙∙∙
भंडारी समाजाचे नेते सर्व पक्षीय नेत्यांना जातनिहाय जनगणनेसाठी निवेदने देत फिरत होते. यावरून राजकीय वक्तव्यांमुळे भंडारी समाज हा सरकारवर नाराज असल्याचे चित्र तयार झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जे भंडारी समाजाचे आहेत, त्यांनी या नेत्यांना एकत्र आणले आणि मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली. सर्वजणांच्या चेहऱ्यावर हास्य असणारे छायाचित्र टिपले गेले. त्यातून जो संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचवायचा तो पोचवला गेला. त्यातून जनगणनेचा विषय पुढील वर्षांपर्यंत टोलावण्याच्या सरकारी प्रयत्नांना दामूंचा शिष्टाईरुपी हातभार लागला. ∙∙∙
राज्यात सध्या आमदार व मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात विविध विकासकामे सुरू केली आहेत. एखाद्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम असो किंवा कचरा सफासफाईचे काम असो. त्याचे उद्घाटन करायचे म्हटले की नारळ वाढवणे हे आलेच. या कार्यक्रमासाठी आमदार वा मंत्री आपल्यासोबत त्या परिसरातील पंचायत मंडळाच्या सदस्यांना तसेच स्थानिक लोकांना जमवले जाते. कामाच्या ठिकाणी एक दगड ठेवून त्याला फुलाचा हार घातला जातो व त्यानंतर सुरू होतो नारळ वाढवण्याचा कार्यक्रम. आमदार किंवा मंत्र्यांपासून ही नारळ वाढवण्याची स्पर्धाच सुरू होते. एका कामाच्या उद्घाटनासाठी सुमारे १० ते १५ नारळ वाढवण्यात येतात. त्यानंतर कोणी एका फटक्यात नारळ फोडला, यावरूनही त्यांच्यातच चर्चेला ऊत येतो. खरे म्हणजे सध्या नारळाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना एका कार्यक्रमासाठी मात्र अनाठायी अनेक नारळ वाढवले जातात. इतके नारळ एका कामाच्या उद्घाटनाला वाढवण्याची गरज आहे का? की नेत्यांना खुश करण्याचा तो भाग असतो. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.