पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमोन लेन’ नाईटक्लबमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या भीषण अग्नितांडव प्रकरणाच्या स्वेच्छा दखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कंपनीला अंतरिम भरपाई देण्याचा आदेश जारी केला आहे.
न्यायालयाने ‘बियिंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा अरपोरा एलएलपी’ला २५ पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची अंतरिम भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या भरपाईचा पहिला पाच लाख रुपयांचा हप्ता न्यायालयात जमा करण्यात आला आहे.
हा आदेश या दुर्घटनेत बळी पडलेल्या एकूण २५ जणांच्या कुटुंबीयांसाठी असून, त्यात २० कर्मचारी आणि पाच पर्यटकांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि निधीच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रकरणाची पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांचा दुसरा हप्ता ७ डिसेंबरपर्यंत, तर १० लाख रुपयांचा तिसरा व अंतिम हप्ता ७ फेब्रुवारीपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे.
सातत्याने पाठपुरावा!
६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री हडफडे येथील ‘बर्च बाय रोमोन लेन’ नाईटक्लबमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत २० कर्मचारी आणि पाच पर्यटक असे एकूण २५ जण होरपळून मृत्युमुखी पडले, तर सुमारे ५० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली असून, पीडितांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.