पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात होऊ घातलेल्या आगामी पंचायत निवडणुकांचे कारण देत विधानसभा अधिवेशनाचा हा कालावधी कमी केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे अधिवेशन 25 ऐवजी 10 दिवसांचे होणार आहे. हे अधिवेशन आता 11 जुलैपासून 22 जुलैपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे.
आठव्या गोवा विधानसभेच्या पहिले पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. मात्र ते जास्त काळ चालणार असल्याचीही चर्चा होती. आठवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी घेणे क्रमप्राप्त होते. याशिवाय दोन अधिवेशने सहा महिन्यांच्या आत घेणे गरजेचे असल्याने 29 आणि 30 मार्च रोजी अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन यावर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे 29 मार्चला अभिभाषण झाले होते.
दरम्यान पंचायत निवडणुका वेळेतच घ्या असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने राज्य सरकारपुढे विधानसभा अधिवेशनाबाबत वेगळाच पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यात सुप्रीम कोर्टात दाद मागूनही कोर्टाने सरकारला कोणताही दिलासा न देत दिलेल्या मुदतीतच पंचायत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सरकारने अगोदरच जाहीर केलेल्या 11 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंतच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज कमी करून ते 10 दिवसात गुंडाळावे लागणार आहे. कारण पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर विधानसभा अधिवेशनाचे कामकाज घेता येणार नाही अशी स्पष्ट माहिती ॲड. जनरल देविदास पांगम यांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशन 10 दिवसात गुंडाळणार हे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.