Goa Assembly Session 2023: वन विभाग, आरोग्य विभाग, नगरनियोजन खात्याविषयीच्या विविध मुद्यांवर बोलताना या खात्यांचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एनजीओंवर टीका केली. विशेष करून त्यांनी गोवा फाऊंडेशनचे नाव घेत टीका केली. सरकार विकास करू इच्छिते पण काहीजण त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप एनजीओंवर केला. यातील काहीजण तर गोव्यातील देखील नाहीत, असेही राणे म्हणाले.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज गोंधळातच संपले. त्यापुर्वीच्या पाच मिनिटात आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सभापतींना त्यांचे म्हणणे रेकॉर्डवर घेण्यास सांगितले.
सभापती महोदय सगळे सारखे आहेत. छोटा बाबा, बडा बाबा, सगळे सारखे आहेत, अशा शब्दांत आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगास यांनी मंत्री विश्वजीत राणे यांना डिवचले.
व्हिएगस म्हणाले की, गोवा फाऊंडेशन ही एक अत्यंत आदर असलेली संस्था आहे. या संस्थेविषयी लोकांना आदर आहे. या संस्थेतील लोक आदरणीय आहेत. त्यामुळे मंत्री विश्वजीत राणे यांनी या एनजीओ बाबत जी काही वक्तव्ये केली ती मागे घ्यावीत. गोवा फाऊंडेशनबाबत जे काही बोलले गेले आहे ते कामकाजातून वगळावे.
त्यावर राणे म्हणाले की, तुम्हाला गरज असेल त्यांची (एनजीओ) आम्हाला गरज नाही. व्हिएगस पहिल्यांदाच निवडून आले आहेत. मी 16 वर्षांपासून आमदार आहे. मी जे काही बोललो ते रेकॉर्डमधून काढण्याची गरज नाही. एनजीओ गोव्याची वाट लावत आहेत. सभागृहाची ताकद एनजीओंच्या हाती देऊ नका.
त्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केवळ गोवा फाऊंडेशन या एनजीओमुळेच गोवा सरकारला मायनिंग उद्योगांतून 45 हजार कोटी रूपये मिळाले आहेत. राज्याला मिळालेला इतका मोठा महसूल महत्वाचा नाही का? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, राणे यांनी रिजनल प्लॅन तयार करायला 10 वर्षे लागली, असे वक्तव्य केले होते. त्यावर विजय सरदेसाई यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रीमंडळात विश्वजीत राणे मंत्री होते, अशी आठवण करून दिली.
त्यावर राणे यांनी पुराव्यानिशी बोला असे सांगत विजय सरदेसाई स्वतः टाऊन प्लॅनिंग मंत्री होते. पण त्यांनी अभ्यास केला नाही, अशी टिपण्णी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.