goa assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: ‘युती’चे गुऱ्हाळ आणखी किती काळ?

दैनिक गोमन्तक

जवळ जवळ गेले वर्ष सव्वावर्ष राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांमध्ये युतीबाबत बोलणी चालू आहेत. त्यातून कधी सकारात्मक विचार बाहेर येतो, तर कधी नकारात्मक विचारांची फैरी झडते.

भाजपाने मात्र सुरुवातीपासून भाजपचे मिशन 2022 च्या निवडणुकीत (Goa Assembly Election) तब्बल 22 जागा काबिज करू असे ठरवून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली गोवाभर दौरे करू लागला आहेत. त्याला साथ देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) ‘सरकार तुमच्या दारी’ म्हणत सरकारी फौजफाट्यासह मतदार संघाचा दौरा करुन अनेक जुने व नवे प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत अनेक सवलती जाहीर करीत आहेत.

तोडीसतोड म्हणून आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) व तृणमूल काँग्रेस यांचे दिल्लीस्थित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही आश्‍वासनांची खैरात करीत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. या दोन्ही पक्षांचे जे पदाधिकारी गोव्यात येतात ते केवळ जीवाचा गोवा करण्यासाठी नव्हे तर विविध आकाराची आश्‍वासने देऊन गोव्याचे ‘मनोरंजन’ करीत आहेत. नशीब अजून कुठल्याही राजकीय पक्षाने ‘घाबरू नका, आम्ही तुम्हाला आकाशातील तारेदेखील आणून देऊ’ असे सांगितलेले नाही. कदाचित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (Film Festival) आलेले बॉलिवूडचे प्रसिध्द व सुंदर सिने तारे व तारकांचे चेहेर पाहून खूष झालेल्या गोवेकरांचा आता आकाशातील चांदण्या तारे यांचे दर्शन नको, अशी त्या पक्षनेत्यांनी आपली समजूत करून घेतली असती!

एकवेळ आपण वीज मोफत, पाणी मोफत, बेकारांना महागाई भत्ता, जीवनावश्‍यक वस्तूंचे दर नियंत्रणात, पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात हे आपण समजू शकतो, पण भंडारी जातीचा मुख्यमंत्री, ख्रिश्‍चन समाजाचा उपमुख्यमंत्री यापर्यंत आश्‍वासनांची खैरात करण्यात आली आहे. या सगळ्या आश्‍वासनांवर कढी करणारी गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे बंद असलेला व सर्वोच्च न्यायालयात पडून असलेला खाण व्यवसाय सहा महिन्यांत सुरू करू असे खाणपट्ट्यात जाऊन छातीठोकपणे सांगण्यात आले. गोव्यात आणि केंद्रात भाजप सरकार असूनही गेली अनेक दिवस जे शक्य झाले नाही ते ‘आप, सर्वांचा बाप’ बनून कसे काय करणार हे एक न सुटणारे कोडेच आहे.

मुख्य म्हणजे या आश्‍वासनांच्या गदारोळात पक्षांची ‘युती मात्र माती’ मोल होत आहे हे कोणी गंभीरपणे लक्षात घेतले नसावे! नाही म्हणायला भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे गोवा प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगो नेत्यांशी संपर्क साधून युतीबाबात चर्चा केली खरी, पण ढवळीकर बंधूनी त्यांची डाळ तर शिजू दिली नाहीच उलट भाजपाशी युती करणे म्हणजे आम्ही आत्महत्या करण्यासारखे आहे असे सांगत व यावेळी भाजप निवडणुकीत आमदारांची दुहेरी संख्या सुध्दा पार करणार नाही. असे भविष्य वर्तावित त्यांची भलावण केली. खरं तर, समविचारी मतांची विभागणी होणार नाही, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे आणि यात अशा मतांची विभागणी होऊ नये, यासाठी भाजपा सावध पवित्रा घेत आहे. याचे कारण म्हणजे पक्ष जास्त बळकट करण्याच्या नावाखाली भाजपाने खुर्चीची खुंटी बळकट केली खरी, पण आता त्या दहाही आमदारांना पक्षाचे तिकीट दिले. तर भाजपा पक्षाचे ‘बळ’‘कट’ होईल असे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटते आणि ते सर्वजण भाजपाच्या तिकिटावर नक्की निवडून येतील, असे दस्तुरखुद्द त्या दहाही जणांना वाटत नाही. त्याशिवाय घराणेशाहीचा प्रश्‍नही भाजपाला (BJP) डोईजड झाला आहे. यात सुयोग्य तोडगा काढण्यात पक्षश्रेष्ठी अपयशी ठरले तर आपण कुठल्या पक्षात जायचे, या प्रकाराने या जोडप्यांच्या राजकारणात (Politics) रंग भरू लागला आहे.

किरण कांदोळकर-कविता कांदोळकर या पती-पत्नीस तिकिटे मिळत नाहीत म्हणून त्यानी गोवा फॉरवर्डचा नाद सोडून तृणमूलची सोबत केली आहे. ‘राष्ट्रवादी’मध्ये चर्चिल आलेमांव व वालंका हे पिता -पुत्री त्या पक्षाला जड होऊ लागले आहेत. यातले कोण आपल्याला लाभतात याची दुसरे पक्ष चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहात आहेत. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षातील सगळ्याच आमदारांना परत तिकिटे मिळतीलच अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे विद्यामान भाजप आमदारही धास्ताहून गेले नाहीत, तरच नवल! त्यामुळे ते देखील इतर पक्षांची चाचपणी करु लागले तर त्यात आश्‍चर्य ते काय?

सगळेच विरोधी पक्ष भाजपाचा पराभव करायचा हाच आमचा एक कलमी कार्यक्रम आहे असे सांगत आहेत. पण युतीबाबत गंभीर होऊन खंबीर पावले उचलण्यास मात्र ते कचरत आहेत. म्हणून आतापर्यंत युतीच्या नावाखाली जे गुऱ्हाळ चालले तेवढे पुरे, काळ सोकावतो आहे. त्याकडे जितक्या लवकर व सूत्रबृध्दपणे युतीसाठी प्रयत्न कराल, वोही सिकंदर म्हणावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT