नेवरा येथे प्रस्तावित रेल्वे स्टेशनचा वाद शमेल असे काही चिन्ह दिसत नाही. गोवा राज्य विधानसभेत जेव्हा हा विषय पोहोचला, तेव्हा रेल्वे स्टेशन येणारच असे लगोलग स्पष्ट झाले. कारण स्टेशन क्रॉसिंगसाठी येणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. आमदार वीरेश बोरकर यांनी हे स्टेशन कुणालाच नको अशी बाजू मांडली, तरी देखील क्रॉसिंगसाठी असे उत्तर वारंवार दिले गेले. त्यामुळे ग्रामस्थ विरोधात सरकार संघर्ष अटळ असून भाजप कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा गोची झाली आहे. नेवरा ग्रामसभेत देखील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन विरोधात आवाज उठवला. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्टेशनाचे विधानसभेत समर्थन केल्यानंतर हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्वलंत विषय होणार यात काहीच शंका नाही आणि भाजपला याचा त्रास नक्की होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ∙∙∙
राज्य सरकारातील उपसभापतींच्या हाती म्हापसा नगरपालिका आहे. नगरपालिकेत सत्ता असताना आणि आपल्या मर्जीतील व्यक्ती नगराध्यक्ष असताना तेथे काय चालते हे समजत नसेल, तर आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे ते अपयश म्हणावे लागेल. नगरपालिकेतील ज्या फाईल्स गायब झाल्या त्याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार केली, पण फाईल्स गायब झाल्या त्या नक्की कोणत्या फाईल्स होत्या, याची लेखी सर्व माहिती तक्रारीत दिली आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मडगाव नगरपालिका यापूर्वी अशाच फाईल्स गायब होण्याच्या घटनेने चर्चेत आली होती. आता म्हापसा नगरपालिकाही फाईल्स चोरीला गेल्याने चर्चेत आली आहे. खरेतर या फाईल्स गायब होण्याला जे कारणीभूत आहेत, त्यांना पोलिस खरोखर शोधून काढणार आहेत काय हा मूळ प्रश्न आहे. ∙∙∙
बहुतेक भागातील शिमगा संपून ढोल-ताशांचा ‘घुमचे कटर घूम’ शांत झाला आहे. मात्र, डिचोलीत आता राजकीय शिमगा सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षांचा अवधी असला, तरी भाजपने आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपचे ‘कमळ’च फुलणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी डिचोलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विश्वासानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये केवळ निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शिमगोत्सव संपला आणि आता राजकीय शिमगा सुरू झाला असल्याचे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙
सभापती रमेश तवडकर हे कधी कधी आपल्याला राजकारणातून बाहेर काढून कार्यकर्त्यांच्या भूमिकेत शिरतात. काहीजण त्याकडेही त्यांची राजकीय चाल म्हणूनच पाहतात ही गोष्ट वेगळी. कित्येकवेळा रमेश सर जे बोलतात त्यातून अस्सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त होते. काही दिवसांपूर्वी मडगावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना रमेश तवडकर यांनी सध्याच्या भाजपात जी स्थिती आहे ती मिक्स भाजी आणि खतखते असे म्हटले होते. हे वक्तव्य करून त्यांनी कुणावर बाण सोडला हे माहिती नाही, पण कित्येकांना त्यांचे ते भाषण ऐकून त्यांच्यातील जुना संघ कार्यकर्ता जागा झाला असे वाटल्याशिवाय राहिले नाही. काल विधानसभेत विजय सरदेसाई यांनीही या खतखत्याचा उल्लेख केलाच. सगळे सरकारच सध्या खतखते झाले आहे, असे सरदेसाई म्हणाले. ∙∙∙
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे सख्य अनेकवेळा जाणवत असते. तुयेतील इस्पितळ इमारतीचे उद्घाटन आणि तुयेतीलच इलेक्ट्रॉनिक्स सिटीचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी मंगळवारी विधानसभेत मिळवले. इलेक्ट्रॉनिक्स सिटीतील कौशल्य विकास केंद्र, अग्निशमन केंद्र वैगेरे सुविधांचा वापर लगेच सुरू करण्याची सरकार चाचपणीही करणार आहे. आरोलकर जणू हा प्रश्न काढतील आणि सरकार उत्तर देण्यासाठी तयार आहे असे चित्र आरोलकर यांनी तयार करून घेतले. आरोलकर यांनी सुदिन ढवळीकर यांच्यासोबत विधानसभा संकुलात येऊन मगोसोबत असल्याचे संकेत दिले आणि सरकारशी असलेली जवळीकही दडवली नाही. ∙∙∙
नेहमीप्रमाणे विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून राज्यातील गुन्हेगारी, जुगार तसेच ड्रग्ज या विषयावरून सरकारवर जोरदारपणे टीकेची झोड उठविली जाते. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचा तो आवडता विषय असतो. ते सरकारवर आरोप व टीका करत तोंडसुख घेतात. इतर विरोधकही त्यामध्ये सूर मिसळवत आपले मुद्दे मांडतात व सरकार कसे अपयशी ठरत आहे व पोलिस यंत्रणा कशी दिवसेंदिवस भ्रष्टाचारी बनत चालली आहे यावर प्रकाशझोत टाकतात. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री त्यावर उत्तर देत सर्व आरोप खोडून काढतात व राज्यात सर्व काही आलबेल आहे व पोलिस यंत्रणा कशी सक्रिय बनली आहे याचे गुणगान गातात. तसेच केलेल्या सूचनांवर आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. विधानसभेतील कामकाजावेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यातील आरोप - प्रत्यारोपांनी लोकांचे मनोरंजन होते. मात्र, त्यातून अखेर सकारात्मक असा उपायच निघत नाही. मागील विधानसभेत दिलेली उत्तरे पुन्हा पुढील विधानसभेवेळी त्यात अपडेट करून दिली जातात. या विधानसभेतील चर्चेतून लोकांचे मनोरंजन होते. पर्याय मात्र निघत नाही, अशी नागरिकांची भावना झाली आहे.∙∙∙
राजकारण्यांशी असलेली जवळीक काही फायद्याची ठरते तर काहीवेळा नुकसान करणारी. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या साथीदारांनाही असाच अनुभव यायला लागला आहे. पूर्वी व्हेंझीबरोबर त्यांचे तीन साथीदार अगदी सावलीसारखे वावरायचे. मात्र, व्हेंझींना अगदी जवळ असलेल्या एका साथीदाराच्या व्यवसायावर टाच आणण्यात आल्यावर त्यांचा दुसरा साथीदार अक्षरशः गायबच झाल्याचे सांगितले जाते. आणखी तिसऱ्या एका साथीदाराचा व्हेंझीच्या घरातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचीही म्हणे बोबडी वळली आहे. विरोधी पक्षातील आमदारांकडे असलेली दोस्ती एव्हढी महाग असते का?∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.