Goa Asgaon House Demolition Dainik Gomantak
गोवा

Asgaon Goa: तीन पोलिस अधिकारी निलंबित; दोन बाऊन्सर्ससह तिघांना अटक

Goa House Demolition Case: पीडितांकडून अन्‍यायकर्त्याशी तडजोड; जनाधाराचा विश्‍‍वासघात

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांनी मुंबईतील त्या दोषींकडून नुकसान भरपाई स्वीकारण्याचा निर्णय घेत घर मोडतोडीची तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली. आज या विषयाशी संबंधित तीन पोलिस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले असून दोन बाऊन्सर्ससह तिघांना अटक केली आहे.

आगरवाडेकर कुटुंबीयांवर झालेला आघात आणि या अन्यायाविरुद्ध संपूर्ण गोव्यातून पीडितांना सहानुभूती व मोठा पाठिंबा मिळाला होता. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सरकारमार्फत घर बांधून देण्याचे आश्वासन देऊनही घुमजाव करत तडजोड केल्यामुळे या प्रकरणातील हवाच गेली आहे.

तसेच स्थानिक आमदार दिलायला लोबो यांनी या प्रकरणाच्या कलाटणीमागील नेमके सत्य लोकांसमोर आलेच पाहिजे असे म्हणत, सरकारने गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाच्या तार्किक निष्कर्षापर्यंत जाण्याची मागणी केली आहे.

पीडित आगरवाडेकर यांनी तक्रार मागे घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गुन्ह्यासंदर्भात कुणी तडजोड केली असली तरी सरकार मात्र कोणतीही तडजोड करणार नाही.

गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांमार्फत चौकशी होईल. या प्रकरणाला जबाबदार असलेल्यांविरुद्ध १०० टक्के कारवाई होईल. सखोल चौकशी करून यामध्ये गुंतलेल्यांचा शोध घेण्याचे स्पष्ट आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्य सचिवांच्या चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई होईल. गोमंतकीयांचा वाढता पाठिंबा असतानाही आगरवाडेकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे तर्क-वितर्कांना ऊत आला असून, पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आगरवाडेकर कुटुंबीयांनी पैशांच्या अनुषंगाने होणारे आरोप फेटाळले आहेत.

पूजा शर्मा हिने आम्हाला फक्त घराची दुरुस्ती करून देतो आणि भाटकाराशी मालमत्तेसंदर्भात केलेले सेल-डीड रद्द करतो. पुन्हा या जमीन व्यवहारात लुडबूड करणार नाही, असे सांगितल्यानेच आम्ही तडजोडीला सकारात्मक प्रतिसाद दाखविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निष्काळजीपणाचा ठपका

आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोडप्रकरणी मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनी केलेल्या चौकशीअंती हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशल नाईक देसाई, उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि उपनिरीक्षक नितीन नाईक यांना निलंबित केले आहे.

हे प्रकरण हाताळण्यात झालेला निष्काळजीपणाचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. या घराची मोडतोड करताना पोलिसांनी बाऊन्सर्सना अटकाव करण्याऐवजी आगरवाडेकर कुटुंबीयांनाच पोलिस स्थानकात बसवून ठेवले तसेच वडील-मुलाचे अपहरण करूनही कोणतीच गंभीर दखल घेतली नाही.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे दिली होती. हा अहवाल कालपर्यंत देण्यास सांगितले होते. मात्र, तो तयार नसल्याने आज देण्यात आला. ही कारवाई पोलिस खात्यामार्फत झाली नसून खुद्द मुख्य सचिवांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

गुन्हा रद्द करणे अशक्य : ॲड. फेरेरा

कोणत्याही प्रकरणात ‘एफआयआर’ नोंदवला गेला की, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गुन्हा रद्द करता येत नाही, असे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी सांगितले. भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्याचे नाव समोर येऊ नये, यासाठीच गुन्हे मागे घेण्याची ही धडपड आहे. असा गुन्हा मागे घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एकदा एफआयआर नोंद केला की, तो रद्द करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते, असेही ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले.

कोट्यवधींचा व्यवहार?

सरकारने घर बांधून देण्याचे वचन देऊनही आगरवाडेकर कुटुंबीय बिल्डरच्या शब्दावर विश्वास ठेवून तक्रार मागे घेण्यास तयार होते, याचा अर्थच हे प्रकरण दिसते तेवढे सोपे व सरळ नाही, या निष्कर्षावर पोलिस व सरकार आले आहे.

या प्रकरणात काही कोटींची देवघेव झाली असल्याचा संशय असून त्याला अमली पदार्थांचाही ‘कोन’ आहे, असाही संशय आहे. सूत्रांच्या मते, ज्या घरात आगरवाडेकर कुटुंब राहते, तेथे एक विदेशी नागरिक राहात असे व त्यालाच भाटकाराने भाड्याने ते घर दिले होते. हा विदेशी नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात असावा व त्याला हे पदार्थ पुरवठा करण्यासाठी अनेकजण तेथे ये-जा करीत.

परत जाताना या विदेशी नागरिकाने हे घर आगरवाडेकर यांना राहायला दिले असावे, अशी माहिती पुढे आली आहे. आमदार विजय सरदेसाई यांनीही या प्रकरणात ‘पुड्यां’चा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सूत्रांच्या मते, पूजा शर्मा जिने हे घर विकत घेतले होते, त्यांनी आगरवाडेकर यांना ‘सेटल’ केले होते का, तरीही आता त्यांना बिल्डरकडून दुप्पट पैसे द्यावे लागले का, आगरवाडेकर कुटुंब अशा ‘बनवेगिरी’त वाकबगार आहे का, एकूण किती कोटींची या प्रकरणात देवघेव झाली व शेवटी जी तडजोड झाली, त्यात आगरवाडेकर ते घर सोडण्यास तयार झाले का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून आमदार दिलायला लोबो यांनी हे प्रकरण धसास लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

दिलायला : आगरवाडेकर कुटुंबाने सर्वांनाच धरले गृहीत...

आगरवाडेकर कुटुंबीयांच्या भूमिकेविषयी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो म्हणाल्या, या अनपेक्षित प्रकारामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. आगरवाडेकर कुटुंबीयांनी सर्वांनाच गृहीत धरले. कारण गोमंतकीय भावनिकरित्या या प्रकरणात गुंतले होते. मात्र, आता पीडित कुटुंबच तडजोड करत असल्याने सर्वजण अस्वस्थ अन् दुःखी आहेत.

प्रिंशा आगरवाडेकर म्‍हणतात...

१) बुधवारी (ता. २६) रात्री ९च्या सुमारास पूजा शर्मा यांचा प्रतिनिधी म्हणून कुमार नामक व्यक्ती आमच्या घरी आली. त्याने पूजा शर्मा हिची बाजू मांडली. पूजा शर्माला म्हणे, आगरवाडेकर कुटुंब याठिकाणी वास्तव्य करीत असल्याची माहिती नव्हती.

२) बिल्डरनेच पूजा शर्माला म्हणे आसगावमध्ये एक मालमत्ता आहे, एवढेच काय ते सांगितले होते. त्यानुसार बिल्डरनेच सेल-डीडची कागदपत्रे तयार करून हा जमीन खरेदीचा व्यवहार पूर्णत्वास नेला होता.

३) पूजा शर्माच्या प्रतिनिधीने आम्हाला आश्वस्त केले की, घराच्या मोडतोडीमध्ये शर्माचा अजिबात हात नाही. झाल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करीत शर्मा हिने स्वखर्चातून आम्हाला पुन्हा घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.

४) पूजा शर्मा हिला लहान मुले आहेत. तशीच मला देखील मुले असून हा सारासार विचार करूनच पूजा शर्मा हिच्याविरुद्ध पोलिसांत केलेली घर मोडतोडीची तक्रार मी माघारी घेण्याचे ठरविले. मात्र, अपहरणाची तक्रार कायम असेल, असेही प्रिंशा यांनी माध्यमांना सांगितले.

५) राहिला प्रश्न विश्वासघाताचा, तर आम्ही कुणाचीही फसवणूक केलेली नाही. मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक आमदार, गोमंतकीय व माध्यमांचा भरीव पाठिंबा मिळाल्यामुळेच पूजा शर्मा हिने नमते घेतल्याचे प्रिंशा आगरवाडेकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT