Goa Adivasi Bhavan Dainik Gomantak
गोवा

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाची प्रक्रिया ‘जीएसआयडीसी’कडून सुरू! 60 कोटींचा प्रकल्‍प होणार 2 वर्षांत

Goa Adivasi Bhavan: गेल्‍या काही वर्षांपासून रखडलेल्‍या पर्वरी येथील आदिवासी भवन प्रकल्‍पाची प्रक्रिया राज्‍य साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) सुरू केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या काही वर्षांपासून रखडलेल्‍या पर्वरी येथील आदिवासी भवन प्रकल्‍पाची प्रक्रिया राज्‍य साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) सुरू केली आहे. या प्रकल्‍पासाठी सल्लागार निवडण्‍यासाठी लवकरच निविदा जारी केल्‍या जाणार आहेत. सुमारे ६० कोटींचा हा प्रकल्‍प पुढील दोन वर्षांत उभारला जाणार असल्‍याची माहिती ‘जीएसआयडीसी’च्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

राज्‍यातील अनुसूचित जमातींची (एसटी) आदिवासी भवनाची मागणी पूर्ण करण्‍यासाठी राज्‍य सरकारने पर्वरी येथील २,२०० चौरस मीटर जागा आदिवासी कल्‍याण खात्‍याला दिली होती. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्‍कालीन आदिवासी कल्‍याणमंत्री गोविंद गावडे यांच्‍या उपस्‍थितीत या प्रकल्‍पाचे भूमिपूजनही केले होते.

परंतु नंतरच्‍या काळात या जमिनीवर कोमुनिदादने अधिकार दाखवत मामलेदारांच्‍या न्‍यायालयात धाव घेतली. तेथे या प्रकरणाच्‍या सुनावण्‍या सुरू झाल्‍यामुळे आदिवासी भवन प्रकल्‍प चार वर्षांपासून रखडलेला आहे.

या प्रकल्‍पावरून गेल्‍या काही महिन्‍यांत माजी मंत्री गोविंद गावडे आणि माजी सभापती तथा विद्यमान मंत्री रमेश तवडकर यांच्‍यात शाब्‍दिक चकमक सुरू झाली होती. आदिवासी भवन राज्‍यात उभारले जाऊ नये, यासाठी काहीजण प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांना शोधून काढणे गरजेचे आहे, असे वक्तव्‍य करीत गावडे यांनी तवडकर यांच्‍यावर अप्रत्‍यक्षरीत्‍या निशाणाही साधला होता.

दरम्‍यान, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गत पावसाळी अधिवेशनाआधी गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून वगळले आणि काहीच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्‍या रमेश तवडकर यांच्‍याकडे आदिवासी कल्‍याण खात्‍याचा ताबा दिला आहे.

मंत्रिपद मिळाल्‍यास सर्वप्रथम आदिवासी भवनाचा विषय मार्गी लावण्‍याची हमी तवडकर यांनी यापूर्वीच दिलेली होती. त्‍यामुळे ते यासंदर्भात कशापद्धतीने पावले उचलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच, प्रकल्‍पाचे काम करणाऱ्या ‘जीएसआयडीसी’ने प्रकल्‍पाची प्रक्रिया सुरू केली असल्‍याचे तेथील अधिकाऱ्याने सांगितले. सुमारे ६० कोटींचा हा प्रकल्‍प दोन वर्षांत उभारण्‍याचे ध्‍येय ठेवण्‍यात आले आहे.

कायदेशीर गुंताही लवकरच सुटणार!

कोमुनिदादच्‍या ॲटर्नीने नियोजित जागेवर केलेला दावा आणि याबाबत मामलेदार न्‍यायालयात सुरू असलेला खटलाही लवकरच संपुष्‍टात येणार आहे. कोमुनिदाद प्रशासकांनी संबंधित ॲटर्नींना खटला मागे घेण्‍याच्‍या सूचना दिलेल्‍या असून पुढील सुनावणीवेळी खटला मागे घेण्‍याची हमी ॲटर्नींनी दिली आहे. त्‍यामुळे या प्रकल्‍पासमोरील कायदेशीर प्रश्‍‍नही लवकरच निकाली निघणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: 'नागरिकांच्या आरोग्याला कोणी वाली आहे की नाही'? चिंबलवासियांचा प्रश्न; कचऱ्याची गंभीर समस्या

Ravi Naik: मगो, कॉंग्रेस व भाजप या गोव्यातील 3 प्रमुख पक्षांच्या चिन्हावर निवडून येणारे एकमेव नेते 'रवी नाईक'

Opinion: दिवाळी म्हणजे काय, 'नरकासुर का?' असे एकाने विचारले; लोप होण्याच्या मार्गावरील वारसा

Horoscope: अद्भुत त्रिग्रही योग! 'या' राशींना दिवाळीत मिळणार आनंदवार्ता; सुटणार मोठी समस्या

C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

SCROLL FOR NEXT