Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; आता गोव्यात राजकीय शिमगा !

Khari Kujbuj Political Satire: दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्ष काँग्रेसवर टीकेची संधी सोडत नाही. आप नेत्या आतिशी या गोव्यात आल्या आणि विधानसभेला एकला चलोचा नारा दिला.

Sameer Panditrao

आता गोव्यात राजकीय शिमगा !

शिमगा सरला तरी कवित्व उरते, अशी एक म्हण आहे. एका बाजूने आपल्या राज्यात ग्रामीण भागातील मांडावर शिमग्याची धूम सुरू झाली असून दुसऱ्या बाजूने राजकीय शिमगाही सुरू झाला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी गोव्यात येऊन काँग्रेस पक्ष विश्वास ठेवण्यासारखा राजकीय साथी होऊ शकत नाही, असे वक्तव्य करून एका राजकीय शिमग्याच्या धोलावर बडी मारली आहे. आता ‘आप’ने राजकारणात ‘एकला चलो’ म्हणत वाटचालीचा निश्चय केल्यामुळे भाजपा मात्र खुश असणारच. ∙∙∙

काँग्रेसची सावध पावले!

दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्ष काँग्रेसवर टीकेची संधी सोडत नाही. आप नेत्या आतिशी या गोव्यात आल्या आणि विधानसभेला एकला चलोचा नारा दिला. परंतु आप च्या स्थानिक नेत्यांना अजूनही तसे वाटते का? तर तेवढ्या मजबूतपणे पक्ष २०२७ च्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो का, हे त्यांना निश्चित माहिती किंवा त्याची कल्पना आली असावी. लोकसभेला आपने काँग्रेसला साथ दिली. दक्षिण गोव्यात लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार आपमुळेच निवडून आला असे आप नेत्यांना वाटत आहे. दिल्ली निवडणुकीनंतर आप नेत्यांचे सूर बदलले तरी काहींच्या मते भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आतिशी यांनी जरी भूमिका मांडली तरी अजून दोन वर्षे मांडवी, झुआरीतून बरेच पाणी वाहून जाणार आहे. तोवर समीकरणे बदलतीलही. आतिशींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली विधाने पाहता त्यातून बोध घेता येतो. त्यांनी अजिबात अतातायीपणा न दाखवता सावध पावले टाकली आहेत असेच दिसते. ∙∙∙

म्हणे, परब खरे बोलले!

रिवोल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी आमदारांच्या महिला दीन कार्यक्रमावर भाष्य करत नवा वाद निर्माण केला, असे लोक बोलतात. पण ते परब यांचे कौतुकही करतात. परब यांनी म्हटलेय की ‘आमदारांसमोर काही महिला नाचतात, केवळ आपल्या मुलांना नोकरी मिळावी म्हणून!’ या वक्तव्यावर राज्यभर जोरदार चर्चा सुरू झालीय. परब यांच्या या विधानामुळे महिला मतदारांना आणि आमदारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांविषयी आत्मचिंतनाची वेळ आली आहे, असे अनेकांचे मत आहे. काहींचे म्हणणे आहे की, महिलांनी एकत्र यावे, पण आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. मात्र, सध्यस्थिती पाहता चित्र वेगळेच असल्याचे लोक बोलू लागलेत. ∙∙∙

बांधकामांवर खरेच नियंत्रण येणार?

गोव्यात हल्ली मोठ्या प्रमाणात इमारत संकुले उभी रहाताना दिसत आहेत. केवळ शहरांतच नव्हे तर शहरालगतच्या पंचायत विभागातही अशी बांधकामे उभी ठाकत आहेत. काही जण या बाबत दिल्लींतील रिअल इस्टेटवाल्यांचे नाव घेतात. तर दुसरीकडे गावांतील व शहरातील रहिवासीही तेथील पायाभूस सुविधांवर अशा मोठ्या प्रमाणातील बांधकामांमुळे ताण येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील ग्रामसभांतही अशा बांधकामांचा मुद्दा उपस्थित होऊन अगोदर पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापन सुधारा व नंतरच मोठाल्या इमारत प्रकल्पांना मंजुरी द्या, अशी मागणी लोक करतात. पंचायती व पालिका अशा प्रकल्पांना मान्यता नाकारतात पण नगरनियोजन खाते त्यांना मान्यता देते. त्यामुळे बांधकाम करणाऱ्यांचे फावते अशी उदाहरणे आहेत. दक्षिणेत व उत्तरेत पीडीए आहेत व त्यांवर त्यांच्या कक्षेतील आमदार सदस्य असतात पण तरीही केवळ शेंकडोच्या संख्येतील सदनिकांनाच केवळ मंजुरी दिली जात नाही तर ती देताना सेट बॅक , पार्किंग व्यवस्था यांचा विचार होत नाही, असे प्रश्‍न त्यांतून उपस्थित होतात. ∙∙∙

तिसरा जिल्हा अन् एसटी आरक्षण

काणकोणसहीत केपे, सांगे व धारबांदोडा या तालुक्याचा समावेश तिसऱ्या जिल्ह्यात करण्याचे घाटत आहे. तसेच विधानसभेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित झाल्यास हे यापैकी काही मतदार संघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांची गोची होणार आहे. केपेही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव झाल्यास फळदेसाईंच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. मात्र, या सर्व भानगडीत धारबांदोड्याचे आमदार गावकर, काणकोणचे आमदार तथा सभापती डॉ.रमेश तवडकर यांचे आसन शाबूत राहणार आहे. फळदेसाई आपले राजकीय वजन वापरून सांगे मतदारसंघ अनारक्षित ठेवण्यास यशस्वी होतात की, सांगे मतदारसंघात कोण बाजी मारेल, यांची चर्चा सुरू झाली आहआे.∙∙∙

दोन सीमांचा राखणदार!

राज्यातील जी काही देवस्थाने आहेत, त्यातील बोडगेश्वर, वेताळेश्वर, खाप्रेश्वर ही देवस्थाने गावांच्या सीमांचे राखणदार म्हणून ओळखले जातात. पर्वरीत श्री खाप्रेश्वराच्या घुमटीशेजारील वड महामार्गाला अडथळा येत असल्याने न्यायालयीन आदेशानुसार हटवला. खाप्रेश्वर मूर्तीही विधिवत हटवून दुसरीकडे मंदिर बांधू, असे सरकारने जाहीर केले. आता सरकारने दोन ठिकाणी खाप्रेश्वर स्थापनेचा निर्णय घेतलाय. यामुळे वडाकडेही खाप्रेश्वर मूर्तीसाठी जागा मिळेलच. परंतु जिथे मंदिर उभारणीचा निर्णय सरकारने घेतला, तिथेही ते उभारले जाईल, त्यामुळे खाप्रेश्वराच्या रुपाने दोन ठिकाणी राखणदार मिळणार आहे, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

‘खाप्रेश्वर’ पोहचला संसदेत

गेले आठ -दहा दिवस पर्वरी उड्डाणपुलासाठी स्थलांतरित केलेल्या पुरातन वटवृक्षाचा मुद्दा सर्वत्र चवीने चघळला जात आहे. त्या वडालगतच्या खाप्रेश्वराचा विषय तर दक्षिण गोवा खासदारांनी लोकसभेतही उपस्थित केला. मात्र, त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, काय ते मात्र त्यांनी उघड केले नाही. सध्या गोव्यात या मुद्यावरून समाजमाध्यमात उलट सुलट मते व्यक्त होताहेत. महत्वाचे म्हणजे अशी श्रध्दास्थाने हमरस्त्यालगत असावीत का, या मुद्द्यावर देव न मानणारेही बोलताहेत. एकाने तर न्यायालयाने वडाच्या स्थलांतराचा आदेश दिला होता, खाप्रेश्वराचे नव्हे, असा मुद्दा उपस्थित करून चर्चा वेगळ्याच दिशेने वळविली. कोणी जर खाप्रेश्वराचे स्थलांतर करू नये वा त्याला हात लावू नये म्हणून न्यायालयात गेले असते तर कदाचित त्याबाबत वेगळा आदेश असता. पण कोणी ती तसदी घेतली नाही व त्याचा नेमका लाभ संबंधित यंत्रणेने घेतल्याचे दिसते. पण एक खरे की, या एकंदर प्रकरणात खाप्रेश्वर संसदेत पोहचला व कामकाजात त्याची नोंद झाली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT