किशोर पेटकर
37th National Games: पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात बुधवारी गोव्याच्या बॉक्सर्सचा सोनेरी जोश पाहायला मिळाला. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमानांनी बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझसह एकूण नऊ पदके जिंकून या खेळातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
बॉक्सिंगच्या अखेरच्या दिवशी गोव्याचे सहा बॉक्सर अंतिम फेरीतील रिंगणात होते. त्यापैकी दोन वेळची माजी जागतिक युवा विजेती साक्षी चौधरी (लाईट फ्लायवेट 50 किलो), पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळणारा रजत (लाईट मिडलवेट 71 किलो) व गौरव चौहान (सुपर हेवीवेट 92+ किलो) यांनी प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखत सुवर्णपदक जिंकले.
आकाश गुरखा (लाईट वेल्टरवेट 63.5 किलो), लोकेश (लाईट हेवीवेट 80 किलो) व महिलांत सनामाचा चानू (मिडलवेट 75 किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोशन जमीर (51 किलो), साई आयुष (92 किलो) व निहारिका (60 किलो) यांना मंगळवारी उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्याने ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
रंगतदार लढतीत रजतची बाजी
लाईट मिडलवेट गटात गोव्याचा रजत आणि सेनादलाचा आकाश यांच्यातील लढत चांगलीच रंगली. आकाश हा गतविजेता असल्याने त्यांच्याकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते, मात्र २२ वर्षीय रजतने पहिल्या फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त बॉक्सिंग करत अनुभवी प्रतिस्पर्ध्याला नमविले.
दोघांनी तोडीस तोड बॉक्सिंग केल्याने निकालासाठी बाऊट रिव्ह्यूचा आधार घ्यावा लागला, त्यात गोव्याच्या बॉक्सरचे पारडे भारी ठरले. ‘‘माझी ही पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. त्यामुळे सीनियर गटातील या पहिल्या सुवर्णपदामुळे आनंद द्विगुणित झालेला आहे.
माझा प्रतिस्पर्धी दोन वेळचा राष्ट्रीय विजेता, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला होता. साहजिकच त्याच्याविरुद्ध जिंकणे सोपे नव्हते. बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमविल्यामुळे माझा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे,’’ असे रजतने सांगितले.
रजत हा हरियानातील हिस्सार जिल्ह्यातील असून त्याचे वडील सरकारी शिक्षक आहेत. कुटुंबात बॉक्सिंग खेळणारा तो एकमेव सदस्य आहे. गोव्याच्या संघ शिबिरात तो मागील सहा महिन्यांपासून आहे.
साक्षी लौकिकास जागली
दोन वेळची माजी युवा जागतिक विजेती असल्यामुळे लाईट फ्लायवेट गटात साक्षी सुवर्णपदासाठी प्रमुख दावेदार होती. तिने मध्य प्रदेशच्या मलिका हिला सावरण्याची अजिबात संधी दिली नाही.
हरियानातील भिवानी येथील साक्षीने लढत जिंकल्यानंतर सांगितले, की ‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माझे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
यापूर्वी मी ज्युनियर, युवा, सीनियर राष्ट्रीय पातळीवर कितीतरी पदके जिंकलेली आहेत, तरीही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आनंदित होणे स्वाभाविकच आहे.’’
पुढील महिन्यात नोएडा येथे राष्ट्रीय सीनियर महिला बॉक्सिंग स्पर्धा होत आहे, तेथेही सुवर्णपदक जिंकण्याचे उद्दिष्ट तिने बाळगले आहे. गोव्याकडून खेळताना मिळालेल्या सहकार्याबद्दल साक्षीने आभार व्यक्त केले.
गौरवचे जबरदस्त बॉक्सिंग
सुपर हेवीवेट गटात गोव्याचा गौरव चौहान आणि चंडीगडचा सावन गिल यांच्यातील अंतिम लढत उत्कंठावर्धक ठरली. दोघेही तुल्यबळ होते. तीन फेऱ्यांच्या या लढतीत गौरवने जोरदार आक्रमण केले, त्याचवेळी सावनही योग्य प्रत्युत्तर दिले. परिणामी बाऊट रिव्ह्यूनंतर गोव्याच्या बॉक्सरला सुवर्णपदक मिळाले.
‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी गोव्याचा आभारी असून सुवर्ण जिंकून विश्वास सार्थ ठरविल्याचे समाधान वाटते. हे पदक मी पालकांना अर्पित करत आहे.’’
- रजत, गोव्याचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर
गोव्याच्या बॉक्सरच्या अंतिम लढती
पुरुष
लाईट वेल्टरवेट: आकाश गुरखा पराभूत वि. मनीष कौशिक (सेनादल) १-४
लाईट मिडलवेट: रजत वि. वि. आकाश (सेनादल) ४-३ बाऊट रिव्ह्यू
लाईट हेवीवेट: लोकेश पराभूत वि. संजय (सेनादल) ०-५
सुपर हेवीवेट: गौरव चौहान वि. वि. सावन गिल (चंडीगड) ४-३ बाऊट रिव्ह्यू
महिला
लाईट फ्लायवेट: साक्षी चौधरी वि. वि. मलिका (मध्य प्रदेश) ५-०
मिडलवेट: सनामाचा चानू पराभूत वि. सवीती बूरा (हरियाना) ०-५
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.