37th National Games: गोव्याची संजना प्रभुगावकर प्रतिभाशाली जलतरणपटू आहे. ज्युनियर पातळीवर तिने कितीतरी राष्ट्रीय पदके जिंकली आहेत, मात्र सीनियर पातळीवर तिला पदके हुलकावणी देत होते. ती उणीव या सोळा वर्षीय जलतरणपटूने रविवारी घरच्या मैदानावर भरून काढली.
पूर्ण तंदुरुस्त नसतानाही तिने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या जलतरणात रौप्यपदक जिंकले, हे ‘पोडियम फिनिश’ तिच्यासाठी संस्मरणीय ठरले.
कांपाल येथील जलतरण तलावात रविवारपासून स्पर्धेतील जलतरण शर्यतींना सुरवात झाली. संजना २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सहभागी झाली.
२ मिनिटे ०८.८९ सेकंद वेळेसह संजनाने रौप्यपदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या धिनिदी देसिंघू हिने २ मिनिटे ०७.३२ सेकंद वेळेसह सुवर्ण, तर तेलंगणाच्या वृत्ती अगरवाल हिने २ मिनिटे ०९.४२ सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले.
नियमित सरावावर परिणाम
रौप्यपदक जिंकल्यानंतर संजनाने सांगितले, की ‘‘मागील काही महिन्यांपासून खांद्याची दुखापत सतावत आहे. गेले सहा महिने तिला नियमित सराव करता आला नव्हता, तसेच स्पर्धांतही सहभागी होता आले नाही.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला महिनाभराचा अवधी असताना मी गांभीर्याने सराव करू लागले. कारण मला गोव्यातील स्पर्धेत कोणत्याही परिस्थितीत खेळायचेच होते. आता मायभूमीत मी पहिले सीनियर राष्ट्रीय पदक जिंकू शकले याचा खूप आनंद झालाय. या पदकामुळे मी दुखापतीलाही विसरून गेलेय.’’
दुबईत घेते प्रशिक्षण
संजना वयाच्या सातव्या वर्षीपासून जलतरण करत आहे. गोव्यातील राज्य पातळीवरील स्पर्धा गाजविल्यानंतर तिने राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा गाजविण्यास सुरवात केली. आता ती दुबईत ॲक्वा नेशन स्पोर्टस अकादमीत प्रशिक्षण घेते.
त्याविषयी संजना म्हणाली, ‘‘कोविड काळात देशात जलतरण प्रशिक्षणावर मर्यादा आल्या. त्यामुळे काही काळ संयुक्त अरब अमिरातीत प्रशिक्षण घेण्याचे नियोजन ठरले. मला दुबईतील सुविधा भावल्या. त्यामुळे आईसह मी तेथेच मुक्काम हलविला. तो निर्णय फलदायी ठरला आहे.’’
देशातील राष्ट्रीय स्पर्धा, तसेच परीक्षा असतात तेव्हा ती भारतात येते. ठराविक कालावधीनंतर पुन्हा दुबईला जाते. तेथे जलतरण सरावात लक्ष केंद्रित करताना ‘होम ट्यूशन’द्वारे ती अभ्यासातही रमते.
‘‘हे पदक माझ्यासाठी खास आहे. भविष्यात आणखी पदके जिंकण्यासाठी आणि अथक परिश्रम कायम राखण्यासाठी मला हे पदक निश्चितच प्रोत्साहित करत राहील.’’
- संजना प्रभुगावकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.