37th National Games सरकारने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा राज्य सज्ज असल्याचे चित्र जरी वरवर निर्माण केले असले, तरी प्रत्यक्षात स्पर्धा आयोजनात प्रचंड विस्कळीतपणा असून तयारीत मोठी अनागोंदी दिसून येत आहे.
त्यामुळे 25 किंवा 26 ऑक्टोबरला उद्घाटन होणाऱ्या या स्पर्धेत त्रुटी राहण्याचे संकेत आहेत. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत सरकार स्पर्धेचे आयोजन कसे करणार, असा प्रश्न काही माजी क्रीडापटूंनी उपस्थित केला आहे.
‘‘खेळाडू आणि स्पर्धेसाठी गोव्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या निवासाची सोय अजूनही केलेली नाही. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये राज्यात पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याने ऐनवेळी हॉटेल आरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो,’’ असे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेशी संबंधित गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
‘‘ खरं म्हणजे, ही प्रक्रिया खूप आधीच व्हायला हवी होती; पण केवळ स्पर्धेचे कार्यक्रम घेऊन पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाने पायाभूत बाबींकडे लक्ष पुरविलेले नाही. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही.
स्पर्धेला दीड महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे या ठिकाणचे काम कधी करणार, हासुद्धा मोठा प्रश्न आहे,’’ असे हा क्रीडा अधिकारी म्हणाला. क्रीडामंत्र्यांनी स्पर्धा आयोजन, खेळाडूंचा सराव, त्यांच्यासाठी क्रीडा उपकरणे उपलब्ध करणे याकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम आयोजनांना जास्त महत्त्व दिले, जे चुकीचे आहे, असे एका क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
भाजप सदस्यांनाही दाद नाही
‘‘गोवा क्रीडा प्राधिकरणाला आम्ही खूप अगोदर स्पर्धा शिबिरे आणि क्रीडा उपकरणे खरेदीसाठी निधीसंदर्भात संयुक्त निवेदन दिले होते, पण हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.
आता तयारीसाठी खूप कमी वेळ आहे,’’ असे गोवा ऑलिंपिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता म्हणाले. एकंदरीत काही राज्य क्रीडा संघटनांच्या अध्यक्षपदी राजकारणी आहेत, ते सत्ताधारी भाजपचे सदस्य आहेत, तरीही त्यांना दाद देण्यात आली नाही.
ऐनवेळी क्रीडानगरीचा प्रस्ताव
कांपाल येथील मैदानावर जर्मन हँगर प्रणालीचा वापर करून तंबू उभारण्यात येतील. तेथे स्पर्धेची क्रीडानगरी साकारण्यात येईल, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. क्रीडानगरी साकारण्याचा हा प्रस्ताव ऐनवेळचा आहे.
यापूर्वी स्पर्धेच्या आयोजनात क्रीडानगरी प्रकल्प नव्हता, असे क्रीडा प्राधिकरणाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले. जर्मन हँगर प्रणाली वापरून उभारण्यात येणारे तंबू अल्पकाळासाठी आहेत, त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा मात्र होईल. ही रक्कम खेळाडूंसाठी वापरता आली असती, असे काहींचे म्हणणे आहे.
श्रीपादभाऊ प्रक्रियेपासून दूर
जूनमध्ये गोवा ऑलिंपिक आणि इतर संघटना पाठपुरावा करत होत्या. परंतु यासंदर्भातील फाईल प्रलंबित राहिली. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक हे गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष असूनही खेळाडूंच्या मागणीला न्याय मिळाला नाही.
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सुरवातीस जाणीवपूर्वक श्रीपाद नाईक यांना आयोजन प्रक्रियेपासून दूर ठेवले, असाही आरोप केला जातो.
क्रीडा वास्तू उभारणी नाहीच
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेनिमित्त गोव्यात नव्याने स्टेडियम उभारले, क्रीडा सुविधा निर्माण झाल्या; पण 37 व्या क्रीडा स्पर्धेमुळे एकही नवी क्रीडा वास्तू तयार झालेली नाही, याकडे काही दिवसांपूर्वी गुरुदत्त भक्ता यांनी लक्ष वेधले होते.
नवीन स्टेडियम, क्रीडा वास्तू उभारल्या असत्या, तर भविष्यात सुविधांच्या दृष्टीने क्रीडापटूंना त्या उपयोगी ठरल्या असत्या, असे भक्ता म्हणाले.
बॅडमिंटन स्पर्धा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये घेण्याचे ठरले; परंतु तेथील फ्लोअरिंगचे काम अजून सुरू झालेले नाही. भारताच्या बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही स्पर्धा उद्घाटनाच्या आठवडाभरापूर्वी घेण्याचे नियोजन आहे. आता कमी कालावधी असल्यामुळे ही स्पर्धा कांपाल येथील स्टेडियममध्ये हलविण्याची शक्यता आहे.
- संदीप हेबळे, सचिव, गोवा बॅडमिंटन संघटना.
गोवा क्रीडा प्राधिकरणाने सर्व संघटनांना निवासी शिबिरे घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी आखून दिला होता. आता वेळ खूप कमी असल्यामुळे ही शिबिरे ३० दिवसांची घ्यावी लागतील. सरकारने निधी लवकर पुरविला असता, तर खूप चांगले झाले असते. खेळाडूंना पुरेसा कालावधी मिळाला असता.
- गुरुदत्त भक्ता, सचिव, गोवा ऑलिंपिक संघटना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.